विशेष प्रतिनिधी
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महाराष्ट्र एटीएसवर गंभीर आरोप करताना खळबळजनक खुलासा केला आहे. “२४ दिवस अमानुष मारहाण झाली. ‘मोदी, योगी आणि मोहन भागवत यांची नावे घेतली तरच मारहाण थांबवू’ असे एटीएस अधिकारी म्हणत होते. हा तपास नसून राजकीय सूड होता,” असे त्यांनी ठामपणे म्हटले. Sadhvi Pragya Singh Thakur
यूपीए सरकारच्या काळात भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठीच हा कट रचला गेला, असा आरोप करत त्यांनी सांगितले की, “शारीरिक व मानसिक अत्याचार करत मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांची नावे घेण्यास भाग पाडले गेले. हा केवळ माझ्यावरचा हल्ला नव्हता, तर संपूर्ण सनातन संस्कृती व राष्ट्रवादी विचारधारेवरचा हल्ला होता.”
या आरोपांना काही साक्षीदारांच्या कोर्टात दिलेल्या जबाबांनीही पुष्टी दिली आहे. साक्षीदार मिलिंद जोशीराव यांनी न्यायालयात सांगितले की, एटीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी त्यांना देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच नेत्यांची नावे घेण्यास भाग पाडले. माझ्यावर सात दिवस दबाव टाकण्यात आला. मी नावे घेण्यास नकार दिला तेव्हा मला त्रास दिला,” असे त्यांनी कोर्टात सांगितले.
माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, वरिष्ठ अधिकारी परमबीर सिंग यांनी त्यांना “मोहन भागवत यांना अटक करा” असे सांगितले होते.
मालेगाव स्फोटात सहा जणांचा मृत्यू व ९० हून अधिक लोक जखमी झाले होते. प्रकरणाची प्राथमिक चौकशी एटीएसने केली होती, मात्र नंतर ती NIA कडे सोपवण्यात आली. न्यायालयाने आपल्या निर्णयात तपासातील गंभीर त्रुटी, छेडछाड केलेले पुरावे आणि बळजबरीने घेतलेले जबाब यांचा उल्लेख केला. साध्वी प्रज्ञा यांनी हा निकाल केवळ वैयक्तिक न्याय नव्हे तर अध्यात्मिक व राष्ट्रवादी विचारधारेचा विजय असल्याचे म्हटले. “सत्याचा विजय झाला आहे. भारताच्या आत्म्याच्या विरोधात रचलेल्या कटाचा हा पराभव आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App