विशेष प्रतिनिधी
ठाणे : Rupali Chakankar शहापूर येथील शाळेत घडलेल्या अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह प्रकाराची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संबंधित शाळेला भेट देत पालकांशी संवाद साधला. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी, मुलींच्या मानसिकतेचा विचार करून त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, तसेच शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने शाळा पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.Rupali Chakankar
शाळेच्या स्वच्छतागृहात रक्त आढळल्यानंतर मुख्याध्यापिकांनी महिला सफाईगारामार्फत सर्व मुलींची अपमानजनक पद्धतीने शारीरिक तपासणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी ही घटना उघड केली. त्यानंतर महिला आयोगाने तत्काळ दखल घेतली.Rupali Chakankar
रूपाली चाकणकर यांनी आज शहापूरमध्ये भेट दिली असता, त्यांनी पालकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. शिक्षण विभाग व पोलिसांकडूनही या प्रकरणाचा आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षण विभागाला सादर करण्यात आला आहे. तथापि, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सोमवारपासून पर्यायी शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शाळेच्या तपासणीदरम्यान तक्रार निवारण समिती नसणे, सखी सावित्री समिती फक्त नोंदपुस्तिकेपुरती मर्यादित असणे यांसारख्या गंभीर त्रुटीही उघड झाल्या आहेत. संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून, शिक्षण विभागाला तातडीने पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिस तपासात आतापर्यंत ८ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून ५ जण अटकेत आहेत. त्यांना १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित ३ जणांची चौकशी सुरू आहे. दोन विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल झाला असून उर्वरित दोन विश्वस्तांनाही आरोपी करावे, अशी पालकांची मागणी आहे. यावर उद्या पोलिस, पालक आणि शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.
तपास पूर्ण करून दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्याचे निर्देश चाकणकर यांनी दिले. तसेच, ज्या मुलींना या प्रकाराला सामोरे जावे लागले, त्यांच्यासाठी बालकल्याण समितीमार्फत समुपदेशनाची व्यवस्था तातडीने करावी, असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App