भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना आदेश काढून उद्या म्हणजे 7 मे 2025 रोजी नागरी संरक्षणाचे Mock drill करायला सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात Mock drill या संकल्पनेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून काही अतिउत्साही लोक त्याचा वाट्टेल तो अर्थ लावून सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत आहेत. त्यातून भारतात काही उतावळ्या सोशल मीडियावीरांनी तर Mock drill म्हणजे युद्धाची घोषणा, असा परस्पर अर्थ लावून त्या संदर्भात वेगवेगळ्या बेजबाबदार पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल केले आहेत.
वास्तविक Mock drill म्हणजे नागरी संरक्षणाचा सराव युद्धाची घोषणा बिलकुल नव्हे कारण कुठलाही देश विशेषत: भारतासारखा जबाबदार देश अशी युद्धाची घोषणा Mock drill करून करीत नसतो, त्या उलट युद्धापूर्वी देशातल्या नागरिकांची मानसिक तयारी व्हावी, त्यांनी स्वतःचे संरक्षण स्वतः करण्याच्या दृष्टीने काही प्रशिक्षण घ्यावे, अशी व्यवस्था करत असतो. ही व्यवस्था करणे म्हणजेच Mock drill होय. कुठलेही युद्ध फक्त सीमांपुरते लढले जाते असे नाही. त्याचे परिणाम देशांतर्गत होत असतात आणि त्याचा नागरिकांच्या सर्वसामान्य जीवनावरही दुष्परिणाम होत असतो. हा दुष्परिणाम टाळणे केवळ सैन्य दले अथवा पोलीस दलाची जबाबदारी नसते, तर ती सर्व सामान्य नागरिकांचीही असते. हे समजावून सांगण्यासाठीच Mock drill अर्थात नागरी संरक्षणाचा सराव केला जातो. यात युद्धातील हल्ल्याच्या वेळी विशिष्ट काळजी घ्यायला शिकवले जाते. नागरिकांना आपले आत्मरक्षण कसे करावे, आपण जिथे असू तिथे सुरक्षित जागी शांतपणे कसे पोहोचावे, हे समजावून सांगितले जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या नागरी सुरक्षा संघटना, एनसीसी, एनएसएस यांच्यासारख्या विद्यार्थी संघटना यांचा आवर्जून समावेश केला जातो.
त्यातही सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराच्या काळात Black out ही साधी सोपी गोष्ट उरलेली नाही. कारण Black out मध्ये कोणत्याही स्थितीमध्ये प्रकाशाचे कुठलेही सिग्नल शत्रू राष्ट्रांच्या विमान यंत्रणांना मिळता कामा नयेत, अशी व्यवस्था करावी लागते. सध्याच्या मोबाईल युगात तशी व्यवस्था करणे जवळपास अशक्य आहे. कारण जगातील सगळी मोबाईल यंत्रणा ही विशिष्ट सिग्नलवर चालते आणि ते सिग्नल बंद झाले, तर संपूर्ण यंत्रणा बंद पडू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध काळात Black out कसे करायचे, त्यावेळी शांतता आणि संयम कसा पाळायचा, मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची, हे देखील Mock drill मध्ये सांगितले जाणे अपेक्षित आहे.
– युद्धाची घोषणा नाही
पण या सगळ्या गंभीर सरावाविषयी भारतीय जनमानस तयार करण्याऐवजी Mock drill म्हणजे युद्धाची घोषणा करणे, असा अर्थ लावून काही अतिउत्साही युट्युबर्स आणि सोशल मीडियावीरांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ज्या अर्थी भरत सरकारने देशातल्या 244 जिल्ह्यांमध्ये Mock drill करायला सांगितलेय, त्या अर्थी भारत कधीही युद्धाची घोषणा करून पाकिस्तानवर आक्रमण करेल, असा ढोल पिटायला सुरुवात केली आहे, जो अक्षरशः खोटा आहे. Mock drill करून किंवा असा जाहीर ढोल पिटून भारत केव्हाही युद्धाची घोषणा करणार नाही. पाकिस्तानला हव्या त्या वेळेत आणि हवी तिथे कोणतीही कारवाई करणार नाही, तर भारतीय सैन्याने ठरविलेल्या वेळेनुसार आणि ठरविलेल्या टार्गेटनुसारच कारवाई करेल. त्यासाठी Mock drill वगैरे जाहीर सराव करत बसणार नाही, ही बाब प्रत्येक भारतीय नागरिकाने लक्षात घेतली पाहिजे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App