जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांची वेचून हत्या केली. त्यांना धर्म विचारला. कलमा पढायला लावला. पॅन्ट काढून त्यांचा धर्म तपासला आणि मग त्यांना गोळ्या घातल्या. या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध झाला. अमेरिका आणि इराण तसेच रशिया आणि युक्रेन ही एकमेकांची शत्रू राष्ट्र देखील भारताच्या पाठीशी उभी राहिली. सगळ्यांनी एकमुखाने पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. भारताच्या बाजूने सगळे जग उभे राहिले. Pahalgam attack
असे असले तरी भारतातल्या काही बौद्धिक दिवाळखोरांनी मोठी अक्कल पाजळून पहलगाम मधल्या इस्लामी जिहादी दहशतवादी हल्ल्याची तुलना मणिपूर मधल्या जातींच्या हिंसाचाराशी केली. शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या तोंडी तर थेट पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा असीफ यांची भाषा आली. ख्वाजा असीफ यांनी भारतातल्या हिंदुत्ववादी सरकारवर पहलगाम हल्ल्याचा ठपका ठेवला. तशाच भाषेत संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागितला. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी पहलगाम मधल्या जिहादी हल्ल्याची तुलना मणिपूर मधल्या जातींच्या हिंसाचाराशी केली. मणिपूर मध्ये हिंसाचार झाला, त्यावेळी मोदी सरकार झोपले होते. त्यांनी तिथे कुठलीच परिणामकारक कारवाई केली नाही. त्यांनी मणिपूर जळू दिले, वगैरे मुक्ताफळे काँग्रेसी प्रवक्त्यांनी उधळली. आंतरराष्ट्रीय समस्या उद्भवतात तेव्हा देशांतर्गत वादविवादाचे प्रश्न त्यात घुसडायचे नसतात हे भान उबाठा आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांना राहिले नाही.
पण प्रत्यक्षात पहलगाम मधला इस्लामी जिहादी दहशतवादी हल्ला आणि मणिपूर मधला जातींचा संघर्ष यात मूलभूत फरक आहे, हे वास्तव भारतातले बौद्धिक दिवाळखोर विसरले.
पहलगाम मधला दहशतवादी हल्ला आणि मणिपूर मधला हिंसाचार यापैकी कुठल्याच गोष्टींचे, कुठल्याच निकषांवर समर्थन करण्याचे काहीच कारण नाही. पहलगाम मधला दहशतवादी हल्ला आणि मणिपूर मधला हिंसाचार दोन्ही निषेधार्हच आहेत. पण दोन्ही ठिकाणच्या वेगवेगळ्या घटनांची एकमेकांशी तुलना करायचे काही प्रयोजन नाही.
– मणिपूर मधला हिंसाचार
मणिपूर मधला हिंसाचार हा भारतातल्या दोन जातींच्या वैराचा परिणाम होता. मैतेई आणि कुकी या जातींमधले सामाजिक वैर तिथल्या सत्ताधाऱ्यांनी आणि मिशनऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी वर्षानुवर्षे जोपासले. त्याला खतपाणी घातले. त्याचा दुष्परिणाम मणिपूर मधल्या हिंसाचारात झाला. त्या हिंसाचाराला वेगवेगळ्या देशांमधल्या गुप्तहेर संघटनांनी शस्त्रास्त्रे पुरवून चिथावणी दिली म्हणून मणिपूर पेटले. मणिपूर मधल्या हिंसाचारावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मोदी सरकारने तिथे भारताचे माजी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना राज्यपाल पदावर पाठवले. भल्लांनी तिथे दोन महिन्यांत दोन जमातींमधला वाद आटोक्यात आणून शांतता प्रस्थापित करायला सुरुवात केली. कारण भल्लांना मणिपूर मधल्या “बाह्य शक्तींना” कसे आवरायचे, हे केंद्रीय गृहसचिव म्हणून “पक्के” माहिती होते त्यांनी तिथे “पक्की” उपाययोजना करून “बाह्य शक्तींच्या” वेसणी आवळल्या म्हणून मणिपूर शांत झाला.
पण या वस्तुस्थितीकडे भारतातल्या बौद्धिक दिवाळखोरांनी पाठ फिरवली आणि पहलगाम मधल्या हत्याकांडाची तुलना मणिपूर मधल्या हिंसाचाराशी केली.
– पहलगाम मधला हल्ला
वास्तविक आता पहलगाम मधल्या हल्ल्याचे धागेदोरे उलगडत चाललेत. त्याचे गांभीर्य वाढलेय. पाकिस्तानने पूर्ण तयारीनिशी हा हल्ला केल्याचे टप्प्याटप्प्याने उघड होत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जुन्या मोडस ऑपरेंडीने केलेला हा हल्ला नसून पाकिस्तानी लष्करातले कमांडोज जम्मू-काश्मीरमध्ये घुसले आणि त्यांनी पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला करून त्यांना मारले. त्यांना काश्मीर मधल्या दोन दहशतवादी साथीदारांनी हा हल्ला करताना साथ दिली, हे आता उघड झालंय. जम्मू काश्मीर पोलिसांनी हल्लेखोरांचे स्केचेस जारी केलेत.
पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर याने ओव्हरसीज पाकिस्तानी कॉन्फरन्स मध्ये हिंदू विरोधी भाषण केले आणि त्यानंतर तीन ते चार दिवसांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून मारले, हा सहज घडलेला “योगायोग” नाही. त्यामागे मोठे कारस्थान आहे आणि ते भारताने सर्जिकल स्ट्राइक किंवा एअर स्ट्राइक केला, तर त्याला तोंड देण्याची तयारी ठेवून पाकिस्तानने अंमलात आणले आहे. पहलगाम मधला दहशतवादी हल्ला आणि मणिपूर मधला हिंसाचार यातला हा मूलभूत फरक आहे. दोन्ही घटनांची आंधळी तुलना अस्थानी आणि अयोग्य आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App