विशेष प्रतिनिधी
मुंबई : आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. आपण पुढील काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार असून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे. पुढील निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, असा निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा बिर्ला मातोश्री सभागृहात संपन्न झाला. यावेळी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, माजी मंत्री अमित देशमुख, यशोमती ठाकूर, अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी.एम. संदीप, कुणाल चौधरी, बी. व्ही. व्यंकटेश, प्रदेश कार्याध्यक्ष खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, गणेश पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शायरीने केली, ”सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, असे म्हणत त्यांनी भाषणला सुरुवात केली, ते म्हणाले की, विरोधी पक्ष भाजपा सक्षम नाही म्हणूनच त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, काँग्रेसमधील नेत्यांना भाजपात प्रवेश दिला. आपल्याला संघटना बांधायची आहे, आपल्याकडे नेतृत्व आहे पण कार्यकर्त्यांची एकएक कडी जोडायची आहे, कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे. लढाईतील आयुधे बदलली आहेत, रस्त्यावर उतरून लढावे लागेल.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवून राज्यात पहिल्या क्रमांकाच पक्ष बनला पण विधानसभा निवडणुकीत मात्र यश आले नाही. विरोधकांनी मतांची चोरी करून सरकार बनवले. आता पुन्हा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागी विजय मिळवा. नाना पटोले यांनी चार वर्षात पक्षासाठी चांगले काम केले. आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मजबूत बनेल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App