नाशिक : Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे निष्ठावंतांची मात्र त्यांच्या राष्ट्रवादीतून वजाबाकी झाल्याचेच चित्र समोर आले आहे.Sharad Pawar
शरद पवार देशातले सगळ्यात मोठे “राजकीय हवामान तज्ञ” म्हणून ओळखले जातात. त्यांचे समर्थक त्यांना “चाणक्य” म्हणतात. “डाव टाकण्यात”, “करेक्ट कार्यक्रम” करण्यात पवार माहीर असल्याचे त्यांचे पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर वगैरे जिल्ह्यातले समर्थक सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याबरोबर घेऊन गेल्यानंतर 84 वर्षांच्या पवारांनी स्वतः मैदानात उभे राहून नवा पक्ष उभा करून तो सावरला. लोकसभा निवडणुकीत 8 खासदार निवडून आणले.
त्या वेळेपासूनच शरद पवारांचे स्वतंत्रपणे बेरजेचे राजकारण सुरू झाले, पण त्यातही लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या कालावधीत त्यांनी “ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात” याच स्वरूपाचे डाव टाकून अजितदादांच्या राष्ट्रवादीतले महत्त्वाकांक्षी नेते आपल्या पक्षात आणले. पण पवारांच्या बेरजेच्या राजकारणाचे हे प्रयोग त्यांच्या निष्ठावंतांच्या पचनी पडले नाहीत.
इंदापुरात निष्ठावंतांचे बंड
पवारांनी हर्षवर्धन पाटलांना हातातले कमळ सोडून तुतारी घ्यायला लावली, पण इंदापुरातले पवार समर्थक त्यामुळे भडकले. प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, भरतशेठ शहा आणि दशरथ माने यांनी बंडाचा झेंडा फडकवला. एरवी पवारांच्या बेरजेच्या राजकारणाला बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाची विरोध करायची हिंमत नव्हती, ती हिंमत इंदापुरातल्या 4 पवार निष्ठावंतानी दाखवली.
शिंगणेंची पुतणी भडकली
सिंदखेड राजा मधून राजेंद्र शिंगणे यांना शरद पवारांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून खेचून आपल्या पक्षात आणले, पण त्यामुळे आधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेली त्यांची पुतणी गायत्री शिंगणे भडकली. कारण तिच्या महत्त्वाकांक्षेला पवारांनी धक्का दिला. त्यामुळे तिने ताबडतोब अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून हातात घड्याळ बांधले. गायत्री शिंगणे हे सिंदखेडराजा मधले तरुण नेतृत्व मानले जाते. तिच्यासारखी तरुण नेता पवारांच्या पक्षातून बाहेर पडणे ही पक्षासाठी वजाबाकी ठरली आहे.
जुन्नर मधून निष्ठावंतांचा आवाज
जुन्नर मध्ये अतुल बेनके यांचे तळ्यात मळ्यात सुरू असताना काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर हे पवारांच्या आधीपासून संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच त्यांनी शरद पवारांच्या पक्षाशी संधान बांधले होते. कारण अतुल बेनके त्यावेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीत कायम होते. परंतु, मध्यंतरी त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादीत चलबिचल झाली. शरद पवारांचे तुतारी चिन्हावरचे नेमके उमेदवार कोण अतुल बेनके की सत्यशिल शेरकर??, असा सवाल तयार झाला.
पण त्या पलीकडेही जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादीत मोठा ट्विस्ट आला. सत्यशील शेरकरांना काँग्रेस मधून राष्ट्रवादीत घेऊन त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी पवारांच्या दोन निष्ठावंत शिलेदारांनी केली. शेरकर यांच्या ऐवजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे आणि मोहित ढमाले यांनी जुन्नर मधून दंड थोपटायची तयारी चालवली.
संदीप नाईकांना निष्ठावंतांचा विरोध
भाजपचे उमेदवार आणि नवी मुंबईतले नेते गणेश नाईकांचे पुत्र संदीप नाईक यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, पण त्यांच्या प्रवेशालाच नवी मुंबई जिल्ह्यातल्या पवारांच्या पक्षाच्या 13 तालुका अध्यक्षांनी ठाम विरोध दर्शविला होता. खुद्द पवारांसमोर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी संदीप नाईक यांना पक्षात घेऊ नका, असे थेट सांगितले होते.
– राजकीय महत्त्वाकांक्षा “मॅनेज” होईनात
शरद पवारांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत जेव्हा बेरजेचे राजकारण केले, तेव्हा कुठले स्थानिक ज्येष्ठांचे किंवा तरुणांचे आवाज फारसे विरोधात उठलेले आढळले नव्हते. किरकोळ कुणी आवाज उठवले, तर पवार आणि त्यांचे समर्थक ते “आवाज” “मॅनेज” करत असत. माध्यमांपर्यंत “विरोधी आवाज” पोहोचू देत नसत.
परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार ज्या मतदारसंघात बेरजेचे राजकारण करायला गेले, त्या प्रत्येक मतदारसंघांमधून निष्ठावंतांचे वजाबाकीचे आवाज उठले. अनेक निष्ठावंतांनी थेट पवारांना सुनवायला देखील कमी केले नाही, हे सगळे माध्यमांसमोर घडले किंवा माध्यमांमध्ये पोहोचले. आपल्याच समर्थकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा “मॅनेज” करताना पवारांना अवघड होत चालल्याचे चित्र उघड दिसायला लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App