विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रविकांत तुपकर यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारसोबत आज ११ झालेली बैठक सकारात्मक झाली आहे. बहुतांश मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत, हे आमच्या आंदोलनाचे यश आहे परंतु आम्ही पूर्णपणे समाधानी नाही, रिझल्ट मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे रविकांत तुपकर ( Ravikant Tupkar ) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या बैठकीत रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या मांडल्या.
या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, सोयाबीन- कापसाची दरवाढ किती आवश्यक आहे हे आम्ही बैठकीत राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले.सोयाबीन – कापसाच्या दरवाढीबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्यसरकारचे एक शिष्टमंडळ दिल्लीला जाईल केंद्र सरकारशी चर्चा सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी सकारात्मक निर्णय घेवू, असा शब्द सरकारतर्फे अजित पवार यांनी दिला. सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी राज्यसरकार केंद्र सरकारशी बोलायला तयार झाले हे आमच्या आंदोलनाचे यश असल्याचे तुपकरांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे बाकी आहेत.
या दोन्ही योजनांचे पैसे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतो, असा शब्द राज्य सरकारच्या वतीने ना. अजित पवार यांनी दिला असल्याचे तुपकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीबाबत मात्र सरकार सकारात्मक नाही, असेही तुपकर म्हणाले. शेडनेटच्या संदर्भात नुकसान भरपाई बाबत आता लवकरच स्वतंत्र धोरण आणणार असल्याचेही ना. पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ आणि विलंब करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचेही आश्वासन या बैठकीत उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी दिले. १५ सप्टेंबरपर्यंत राज्यातले खरीपाचे आणि ३० सप्टेंबरपर्यंत सगळ्या कंपन्या रब्बीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील तसेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई आचारसंहिता लागण्यापूर्वी देण्याचा शब्द या बैठकीत देण्यात आला.
अमरावती – नागपूर पट्ट्यात संत्रा मोसंबीची मोठी गळती झाली आहे, त्याचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन ना. पवार यांनी दिले. केंद्र सरकारकडे घरकुलाचे अनुदान, तुषार सिंचन, कृषी अवजारांचे अनुदान तसेच इतर विविध योजनांचे अनुदान थकलेले आहे त्याबाबतीत देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा यांच्या भेटीत चर्चा करु असा शब्दही राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविकांत तुपकरांना दिला.
सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्तीमार्ग रद्द करण्याची अधिसूचना लवकरच काढण्याचा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी यांनी दिला असून जंगली जनावरांच्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंडची योजना कॅबीनेटमध्ये आणू तसेच शेतमजुरांसाठी स्वतंत्र मजुर महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, यानंतर पेरणीपूर्ण पिककर्ज उपलब्ध करून न देणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करू असाही शब्द यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App