विशेष प्रतिनिधी
Uddhav Thackeray : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना आणि भाजपा महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. भाजपला 105 जागा आणि शिवसेनेला 56 जागा असे 161 जागांचे बहुमत महायुतीला मिळाले. पण आपल्याशिवाय भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, हे दिसताच उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षा जागी झाली आणि त्यांनी तत्व, परंपरा, विचारधारा, संस्कृती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राचा कौल धाब्यावर बसवून, फक्त मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेस – राष्ट्रवादीशी संधान साधले. आज नाही तर भविष्यात कधीही सत्ता मिळणार नाही, हे पक्के ठाऊक असलेल्या कॉंग्रेस राष्ट्रवादीने उद्धव यांना घोड्यावर बसवले. उद्धव यांना ना धड सरकार चालवता आले, ना पक्ष टिकवता आला. पण महाराष्ट्राच्या राजकारणात चिरंतन टिकणारी अस्थिरता उद्धव यांनी निर्माण केली.
मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. दगाबाजी केली. आणि आज त्याच दगब्जीची फळे उद्धव यांना भोगावी लागत आहेत. पक्ष संघटना किंवा सरकार यांचे नेतृत्व करण्याची कोणतीही क्षमता नसलेल्या उद्धव यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पदोपदी अपमानित करण्याचे धोरण सुरु ठेवले आहे. महाविकास आघाडीत सध्या उद्धव ठाकरे हीच कमजोर बाजू आहे. शिवाय उद्धव यांनी परतीचे दोर कापून टाकले आहेत. त्यामुळे “चार हाणा, पण बाजीराव म्हणा” अशी वेळ उद्धव यांच्यावर आली आहे. म्हणूनच उद्धव तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात आहेत.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपद सांभाळत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. सरकार तर त्यांना चालवता येत नव्हतेच, शिवाय उद्धव यांना संसदीय शिष्टाचार देखील माहिती नव्हते. प्रश्नावर त्यांची अजिबात मांड नव्हती. त्यामुळेच “घरात बसून महाराष्ट्र सांभाळला” अशा फुशारक्या ते मारीत. अडीच वर्षाच्या काळात ते अवघे काही तास मुख्यमंत्री कार्यालयात गेले होते. विधिमंडळात विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देण्याचे सौजन्य देखील उद्धव यांनी कधी दाखवले नाही. त्यांचा आवाका इतका कमी होता की, त्यांचे तब्बल 8 मंत्री आणि 40 आमदार त्यांच्या बाजूने नाहीत हे त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत कळले नाही.
उद्धव यांच्या मर्यादांवर शरद पवार यांनी “लोक माझे सांगाती” या पुस्तकात मार्मिक भाष्य केले आहे. “दोन वर्षात उद्धव ठाकरे काही तास मुख्यमंत्री कार्यालयात गेले. ही बाब आमच्या अनुभवी लोकांच्या पचनी पडणारी नव्हती” अशा शब्दात शरद पवार यांनी उद्धव यांची हजेरी घेतली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाबतीत सर्वात कमकुवत कामगिरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आहे. या निवडणुकीत ज्या घडामोडी घडल्या त्यातून हेच स्पष्ट होते की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी स्वतःच्या विस्तारासाठी उद्धव ठाकरे यांचा वापर करून घेतला आहे. उद्धव यांच्या बाजूची मते कॉंग्रेस राष्ट्रवादीला मिळाली पण कॉंग्रेस राष्ट्रवादीची मते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळाली नाहीत. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीने जी दगाबाजी केली त्याचीह्क पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होण्याच्या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे प्रचंड बिथरले आहेत.
Nagpur Mihan : नागपूर मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास शासनाचे प्राधान्य
मुख्यमंत्रीपदाचा वाडगा घेऊन उद्धव यांच्या सारख्या दिल्लीवाऱ्या सुरु आहेत त्या या भीतीमुळेच. सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे उंबरे झिजवून उद्धव यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिष्ठेचा देखील बळी दिला आहे. बाळासाहेब मातोश्रीवर बसून देशाचे राजकारण चालवायचे. जगभरातले बडे बडे नेते मातोश्रीवर हजेरी लावायचे. बाळासाहेब कुणाच्या घरी गेलेले कधीही दिसले नाहीत. तो बाळासाहेबांचा करिष्मा होता. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपायी तो धुळीस मिळवला आहे.
मुख्यमंत्रीपद हीच उद्धव यांची महत्वाकांक्षा आहे, हे लपून राहिलेले नाही. आणि म्हणूनच ते मोठ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. आणि त्यांच्या या भेटींच्या सत्रामुळे कॉंग्रेसचे राज्यातील नेते अस्वस्थ झाले आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव यांच्या भूमिकेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
कॉंग्रेस आणि गांधी परिवाराचे निष्ठावंत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याची परंपरा नाही, असे थेट सांगून उद्धव यांच्या शिडातील हवाच काढून घेतली आहे. ज्याच्या पक्षाला जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनीही उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तशीच भूमिका घेतली आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी (शरद पवार) गटात वाहत असलेल्या वार्यांची दिशा पाहून संजय राऊत यांनीही आपली तलवार म्यान केली आहे.
सत्ता मिळण्याची आशा होती तेव्हा उद्धव हे कॉंग्रेस राष्ट्रवादीसाठी महत्वाचे होते. पण आता उद्धव ठकारे हे महाविकास आघाडीच्या गळ्यातील लोढणे झाले आहे. आणि त्यामुळेच मिळतील तेथे उद्धव यांना चेपाण्यास कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव यांनी आपल्या पक्षातून चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर केली त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि विशाल पाटील निवडून देखील आले.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पाठींबा दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी परस्पर आपले स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज भरला आणि नार्वेकर निवडून आले. शरद पवार यांच्या उमेदवाराला त्यामुळे नामुष्की पत्करावी लागली. पवार यांनी घडल्या प्रकारावर जाहीर नाराजी व्यक्त केली. अलीकडेच मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे यांनी उद्धव यांच्यावर टीका केली. मला अडकवण्याचा उद्धव यांचा डाव होता, असा थेट आरोप जरांगे यांनी केला. यामागे शरद पवार यांची चाल असल्याचे मानले जात आहे.
उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने न मिळणारी सत्ता तब्बल अडीच वर्षे उपभोगली. आपापले पक्ष भक्कम केले. रसद जोडली. उद्धव यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्यांना पालख्या वाहाव्या लागल्या. पक्ष उद्धव ठाकरे यांचा फुटला. लोकसभा निवडणुकीत उद्धव यांची मते कॉंग्रेस राष्ट्रवादीने खेचून नेली. बदल्यात उद्धव यांना कटोरा दिला. आता विधानसभेच्या तोंडावर उद्धव यांना अधिकाधिक कमजोर करून जास्तीच्या जागा पदरात पाडून घ्यायच्या हा कॉंग्रेसचा डाव आहे आणि त्या डावाला शरण जाण्याशिवाय उद्धव यांना अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more