विशेष प्रतिनिधी
मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला मंगळवारी अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मिहीरसह एकूण 12 जणांच्या मुसक्या आळण्यात आल्या आहेत. यात त्याला घटनेनंतर पळून जाण्यात मदत करणाऱ्या आई व बहिणीचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. आरोपीची आज वैद्यकीय चाचणी केली जाईल. त्यानंतर त्याला इतर आरोपींसह न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.Main accused Mihir Shah arrested in Worli hit and run case, 12 people including his mother and sister who helped him are detained
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मिहीर शाह याला शहापूर येथून अटक करण्यात आली आहे. मिहीर शाहवर दारुच्या नशेत भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून एका महिलेचा बळी घेतल्याचा आरोप आहे. त्याच्या कारने वरळीतील अॅट्रिया मॉललगत एका दुचाकीला धडक दिली होती. त्यात आपल्या पतीसह घरी जाणाऱ्या कावेरी नाखवा नामक महिलेचा मृत्यू झाला होता. मिहीर शाह हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे.
कशी घडली होती घटना?
यासंबंधीच्या वृत्तानुसार, कावेरी या आपले पती प्रदीप नाखवा यांच्यासोबत रविवारी पहाटे क्रॉफर्ड मार्केट येथे मासे आणण्यासाठी गेल्या होत्या. दोघेही दुचाकीवरून वरळीच्या दिशेने येत असताना मिहीर याने आपल्या कारने त्यांना मागून धडक दिली. त्यानंतर प्रदीप हे मिहीरच्या कारच्या बोनेटवर आदळून डाव्या बाजूला पडले. तर कावेरी यांना मिहीरने तसेच तब्बल दीड किलोमीटरपर्यंत फरपटत नेले. त्यांनतर वांद्रे येथील कलानगर परिसरात त्याने आपली कार थांबवून पळ काढला. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.
वडिलांचा गुन्हा चालकावर लोटण्याचा प्रयत्न
या अपघाताप्रकरणी आता अनेक खुलासे समोर येत आहेत. कावेरी नाखवा यांना धडक दिल्यानंतर आरोपी मिहीर याने आपले वडील राजेश शाह यांना फोन केला होता. त्याने त्यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितल्यानंतर राजेश यांनी त्याला पळून जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच हा अपघात चालक राजऋषी बिडावत याने केल्याचे सांगण्याची सूचनाही केली होती. पोलिस तपासात त्यांचा हा डाव उघकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी राजेश शाह यांना अटक केली होती. कोर्टाने सोमवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App