दुसऱ्या नॅरेटिव्हचा धोका, महायुतीत कोण घालते बिब्बा??, वेळीच ओळखा आणि कठोर उपाय योजा!!, असे सांगायची वेळ महायुतीतल्या नेत्यांच्या विशेषतः प्रवक्त्यांच्या वक्तव्यांमधून आली आहे. आधीच महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसलेला पराभवाचा फटका, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली नॅरेटिव्हच्या फटक्याची कबुली आणि त्यानंतर झालेला भाऊ तोरसेकर एपिसोड यामुळे भाजप बॅकफूटवर आहे. याचा अर्थ तो कायमच बॅकफूटवर राहील, असे समजण्याचे कारण नाही, पण याच दरम्यान महायुतीतल्या घटक पक्षांनी विशेषतः भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी ज्या कुरापती सुरू केल्यात, त्यातून दुसऱ्या नॅरेटिव्हचा धोका उत्पन्न झाला आहे आणि तोच वेळीच ओळखून त्यावर कठोर उपाय योजना करण्याची गरज आहे. BJP must nail ajit pawar’s NCP before assembly elections
महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप यांची नैसर्गिक युती, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अनैसर्गिक जोडणी ही वस्तुस्थिती आहे. अजित पवारांनी किंवा प्रफुल्ल पटेल यांनी किंवा अगदी सुनील तटकरेंनी ही वस्तुस्थिती लपवली नाही, पण भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा फायदा घेणेही सोडले नाही. प्रफुल्ल पटेल यांनी आपली मुदत संपण्यापूर्वी राज्यसभेची खासदारकी खिशात घालून घेणे, सुनेत्रा पवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होऊन देखील महायुतीच्या उमेदवार म्हणून अजितदादांनी त्यांनाच राज्यसभेत पाठविणे आणि त्यापलीकडे जाऊन विधान परिषदेच्या जागांवर दावा सांगणे असले प्रकार अजितदादांच्या राष्ट्रवादीने सुरू केलेत. हा राष्ट्रवादीच्या मूलभूत राजकीय प्रवृत्तीचा भाग आहे.
आपले उपद्रवमूल्य दाखवून मित्र पक्षाला सतत टोचून सत्तेचा जास्तीत जास्त वाटा खेचून घेणे आणि स्वपक्षाचे भांडवलीकरण करत राहणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची मूलभूत प्रवृत्ती आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळामध्ये ही वारंवार दिसली देखील आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने चाप लावेपर्यंत राष्ट्रवादीतील ही प्रवृत्ती काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातही सातत्याने उफाळून येत होती. नंतर ती ठाकरे – पवार सरकारच्या काळात सतत उफाळली, पण शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात सुरुवातीला या राष्ट्रवादी ओरबाडी प्रवृत्तीला थोडा चाप बसला होता.
पण लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या महायुतीतल्या समावेशाचा भाजप किंवा शिवसेना यांना काही फायदा झाला नाही. अजित पवारांचा संघटनात्मक पातळीवर किंवा प्रत्यक्ष मतदानात कुठलाही प्रभाव पडला नाही. त्यांना आपल्या पत्नी सुनेत्रा पवारांना निवडून आणता आले नाही, पण राष्ट्रवादीच्या मुळातल्या ओरबाडी प्रवृत्तीतून त्यांनी सुनेत्रा पवारांची राज्यसभेची सीट मात्र पक्की करून घेतली.
हे सगळे प्रकरण इथपर्यंतच थांबले असे नाही, तर त्या पलीकडे जाऊन गेल्या काही दिवसांमध्ये अमोल मिटकरी नावाचे प्रवक्ते महायुती बिब्बा घातला जाईल, अशी वक्तव्य सातत्याने करत आहेत. अमोल मिटकरींना सुपारीच दिली गेल्याच्या बातम्या सोशल मीडियात भरपूर चालल्या आहेत. त्याकडे थोडे दुर्लक्ष केले, तरी अमोल मिटकरींच्या वक्तव्यांमधील वस्तुस्थिती लपत नाही. मग ती चंद्रकांतदादा पाटलांना उलट प्रत्युत्तर देण्याचे असो, किंवा संजय शिरसाट आणि प्रवीण दरेकर यांना गप्प बसा म्हणण्याची असो, अमोल मिटकरींची “दादागिरी” महायुतीच्याच गळ्याला नख लावताना दिसत आहे आणि इथे महाराष्ट्रातल्या दुसऱ्या नॅरिटीचा धोका उत्पन्न झाला आहे, तो म्हणजे हे सगळे उघड दिसत असूनही म्हणजेच राष्ट्रवादीची अमोल मिटकरीकृत “दादागिरी” दिसत असूनही भाजपचे नेते त्याला चाप लावायला तयार नाहीत. अजितदादांना ते सुनवायला तयार नाहीत, किंबहुना अजितदादांना ते पट्ट्यात घ्यायला तयार नाहीत. हा नॅरेटिव्ह तयार होण्याचा धोका भाजपला विधानसभेत फटका देऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 केवळ राज्यघटना बदलण्यासाठी हव्यात हा नॅरेटिव्ह चालला. त्याचा भाजपला स्वबळावरचे बहुमत गमावण्या इतपत फटका बसला, पण भाजपने सत्ता गमावली नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेवढा करिष्मा गमावलेला नव्हता. पण महाराष्ट्रात ही स्थिती नाही. महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी हे कोणताही चेहरा समोर न ठेवता निवडणुकीला सामोरे जाण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना महायुती जशीच्या तशी निवडणुकीला सामोरे जाईल किंवा नाही याविषयी देखील दाट संशय आहे.
अशा स्थितीत अजितदादांना महायुतीच्या सत्तेच्या वळचणीचे लाभ देऊन त्यांच्याकडून त्यांच्याच पक्षातल्या प्रवक्त्यांकडून भाजपवर शरसंधान साधून घेणे आणि त्याला चाप न लावणे हा भाजपसाठी गंभीर धोका ठरू शकतो. इथे भाजपच्या नेतृत्वाने आपल्या संख्याबळाचा वरचष्मा निर्णायकपणे दाखवल्याशिवाय अजितदादांची राष्ट्रवादी वठणीवर येण्याची शक्यता कमी आहे. महायुतीच्या सत्तेच्या वळचणीचे जेवढे म्हणून लाभ देता येणे शक्य आहे, तेवढे लाभ भाजप आणि शिवसेना यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला दिले आहेत, पण त्यांच्याकडून तेवढा “रिटर्न” मिळालेला नाही, हे लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेना यांनी दुसऱ्या नॅरेटिव्हचा धोका नेमकेपणाने वेळीच ओळखून कठोर उपाय योजना करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्रातल्या नेतृत्वाची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या भाजप मधल्या नेतृत्वाला साथ मिळण्याची खरी गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App