विशेष प्रतिनिधी
मुंबई : OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही, तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी एक उपसमितीही स्थापन करण्यात येईल, असे लेखी आश्वासन राज्य शासनाने दिल्यानंतर वडिगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी मागील 10 दिवसांपासून सुरू असलेले त्यांचे उपोषण शनिवारी (22 जून) सोडले. मात्र राज्य शासनाच्या या निर्णयानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आक्रमक झाले. काहीही झालं तरी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच, अशी त्यांनी भूमिका घेतली. यासर्व पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. Raj Thackeray’s attack on Sharad Pawar
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांसोबत राज ठाकरे यांनी बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जातीय राजकारणाच्या मुद्द्यावर शरद पवारांना घेरले. राज्यात ज्या पद्धतीने जातीय तेढ वाढत आहे. राज्यकर्त्यांकडून एका समाजाला आश्वासन दिलं तर दुसरा समाज नाराज होत आहे. हे सर्व पाहता मी गेले काही वर्षे भाषणातून आणि मुलाखतीतून सांगत आलो आहे, जातीपातीतून काही होणार नाही. सर्व पुढारी जातीमध्ये द्वेष पसरवून मत हातात घेतील. पण समाजाच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जड जाणार आहे, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरे म्हणाले की, काल एका व्हिडीओमध्ये मी पाहिलं की, लहान मुलं जातीवरून एकमेकांशी बोलत आहेत. मी याआधीच बोललो होतो की, जातीचं प्रकरण शाळ-महाविद्यालयापर्यंत जाणार आहे. हे विष याआधी महाराष्ट्रात कधी नव्हतं. जातीपातीचं विष कालवणारे जे लोकं आहेत, त्यांना महाराष्ट्राने दूर ठेवलं पाहिजे. अगदी आवडता पक्ष किंवा व्यक्ती असली तरी त्यांना दूर ठेवलं पाहिजे. मी नेहमी सांगत आलो आहे की, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जशा गोष्टी सुरू आहेत, तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल. जातीपातीवरून महाराष्ट्रात रक्तपात होईल, अशी भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
राजचा याआधीही पवारांवर निशाणा
गुढीपाडव्यानिमित्त 2022 च्या मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित सभेत बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला होता. काही लोकांना जात ही गोष्ट हवी आहे, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. त्याआधी प्रत्येकाला जातीचा अभिमान होता. मात्र, 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा यांनी (शरद पवार) दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीपातीच्या राजकारणावरून निशाणा साधला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App