विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभेच्या लातूर मतदारसंघाची जबाबदारी पार पाडल्यानंतर माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची बीड लोकसभेच्या निरीक्षकपदी तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मतदारसंघात मराठा समाजाकडून होणारा विरोध लक्षात घेता तो थोपवण्यासाठी निलंगेकरांना खास बीडच्या मोहिमेवर धाडण्यात आले आहे. Sambhaji Patil Nilangekar to help Pankaj Munde
लातूर लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तातडीने निलंगेकर यांना बीडला रवाना होण्याचे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी दिले. एवढेच नाही तर आता 11 मे म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघातील प्रचार संपेपर्यंत निलंगेकर यांना बीडमध्येच मुक्काम ठोकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार निलंगेकर सक्रीय झाले असून बीडमध्ये त्यांनी निरीक्षक म्हणून कामाला सुरुवात केली आहे.
बीड मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. पंकजा मुंडे यांना प्रचारादरम्यान काही भागात आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजाचा विरोध सहन करावा लागत आहे. आपण मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी वारंवार स्पष्ट केली आहे.
पंकजा मुंडे यांची लढत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्याशी होत आहे. बीड मतदारसंघातील अंबाजोगाईमध्ये नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यासाठी शरद पवारांची अंबाजोगाईत सभा झाली. महायुतीसाठी बीडची जागा निवडून येणे महत्वाचे आणि मुंडे बहिण-भावाच्या प्रतिष्ठेची आहे.
अशावेळी महायुतीला कोणत्या समाजाची नाराजी परवडणारी नाही. ती मतांच्या रुपातून व्यक्त होऊ नये, यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. संभाजी पाटील निलंगेकर आणि मुंडे कुटुंबाचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. संभाजी पाटील निलंगेकर मराठा समाजाचे असून त्यांचा चांगला प्रभाव आहे.
हे लक्षात घेता बीड लोकसभेच्या निरीक्षकपदी त्यांनी निवड करण्यात आल्याची चर्चा आहे. बीडची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी तातडीने बीड गाठले आणि पंकजा मुंडे यांची भेट घेऊन मतदार संघाचा आढावा घेतला. आता या भागात ते मराठा मते पंकजा मुंडे यांच्यासाठी कसे खेचून आणतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App