विशेष प्रतिनिधी
मुंबई : कार्यकाळ संपत आलेल्या 56 राज्यसभा सदस्यांच्या जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होईल. महाराष्ट्रातील 6 जागांचा यात समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी ही घोषणा केली. विधानसभा सदस्यांच्या मतदानातून ही निवड होईल.Election on 6 seats of Rajya Sabha in Maharashtra, victory of Grand Alliance on 5 seats is easily possible
महाराष्ट्रातून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन (भाजप), अनिल देसाई (उद्धवसेना), विद्या चव्हाण (राष्ट्रवादी) व कुमार केतकर (काँग्रेस) यांचा कार्यकाळ संपत आहे. आंध्र (३), बिहार (६), गुजरात (४), कर्नाटक (४), मध्य प्रदेश (५), तेलंगण (३), उत्तर प्रदेश (१०), प. बंगाल (५), ओडिशा (३), राजस्थान (३) व छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल व उत्तराखंड या राज्यातील प्रत्येकी एक अशा ५६ जागा रिक्त होत आहेत.
महाराष्ट्रात 288 आमदार आहेत. त्यामुळे 6 खासदारांसाठी प्रत्येकी 48 मतांचा कोटा आवश्यक असेल. सध्या भाजपकडे 104 आमदार आहेत. महायुतीतील मित्रपक्ष शिंदे सेना (40), अजित पवार गट (40), भाजप व शिंदेसेना समर्थक 20 अपक्ष असे एकूण 204 हून अधिक आमदारांचे बळ महायुतीकडे आहे. त्यामुळे त्यांचे 4 खासदार सहज विजयी होऊन 12 ते 15 आमदारांची मते शिल्लक राहू शकतात. भाजप, शिवसेना व अजित पवार गटाकडून जोर लावून अजून काही अपक्ष, छोट्या पक्षांची मते मिळवण्याचे प्रयत्न केले जातील. गेल्या वेळी भाजपने काँग्रेसची काही मते फोडली होती. तोच ‘पॅटर्न’ पुन्हा राबवला तर महायुतीचा पाचवा उमेदवारही निवडून येऊ शकतो.
उद्धवसेना, शरद पवार गटाला फटका
काँग्रेसकडे 45, तर उद्धव सेना-शरद पवार गटाकडे 15-15 आमदार आहेत. इतर छोटे पक्ष गृहीत धरले तरी मविआकडे 80 पेक्षा जास्त मते नाहीत. त्यामुळे आघाडीचे 2 उमेदवारही निवडून येणे अशक्य आहे. मित्रपक्षांच्या मदतीने काँग्रेसचा एकच खासदार निवडून येऊ शकतो. पक्षफुटीमुळे उद्धवसेना व शरद पवार गटाला मात्र प्रत्येकी एक जागा गमवावी लागू शकते.
भरत गोगावले, अनिल पाटील यांचा व्हीप ठरेल पुन्हा कळीचा मुद्दा सहा जागांसाठी सहाच अर्ज आले तर निवडणूक बिनविरोध होईल. मात्र एका जागेसाठी 2 उमेदवार उभे राहिले तर मात्र मतदान घेतले जाईल. त्या वेळी प्रत्येक पक्ष व्हीप काढेल. शिवसेनेत भरत गोगावलेंचा व्हीप वैध की सुनील प्रभू यांचा यावरून खल सुरू आहे. यापैकी कुणाचा व्हीप मानायचा हा वाद पुन्हा उद्भवू शकतो. राष्ट्रवादीतही प्रतोद अनिल पाटील की जितेंद्र आव्हाड हा वाद आहेच. त्यामुळे व्हीप उल्लंघनाचा मुद्दा पुन्हा न्यायालयापर्यंत जाऊ शकतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App