जंगलामध्ये दोन बलाढ्य सिंह किंवा वाघ एकमेकांशी जेव्हा टक्कर घेतात तेव्हा जंगलातले शाकाहारी प्राणी आपापल्या आश्रय स्थानांमध्ये लपून राहतात, पण कोल्ह्या – लांडग्यांसारखे प्राणी मात्र यातला कोण जिंकतो आणि आपल्याला त्या जिंकण्यातला वाटा कसा मिळतो?, याकडे लांबून आशाळभूतपणे पाहत असतात. मुंबईसह महाराष्ट्रातील 16 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये नेमके हेच चित्र आता दिसायला सुरुवात झाली आहे. ज्यावेळी “कमळाबाई” विरुद्ध “पेंग्विन सेना” या दोन बलाढ्य सेनांची टक्कर होईल, तेव्हा सुसुताईंचा पक्ष आणि भाईंचा पक्ष यांची काय अवस्था होईल??, याची चर्चा सध्या तरी कोणती माध्यमे करताना दिसत नाहीत. ही माध्यमे कमळाबाईंचे ओरिजिन शोधण्यात मग्न आहेत. बाळासाहेबांची भाषणे धुंडाळण्यात त्यांचा वेळ चालला आहे. त्यामुळे “कमळाबाई” विरुद्ध “पेंग्विन सेना” यांच्या टकरीचा परिणाम काय होईल??, याचा विचार करायला त्यांना वेळ मिळालेला दिसत नाही.With great fight between Shivsena and BJP NCP and Congress will suffer heavy losses in Mumbai municipal elections
कमळाबाई नावाचे जुने अस्त्र
शिवसेनेच्या ठाकरे गटाने सामनातून गेल्या काही दिवसांपासून पुन्हा “कमळाबाई” नावाचे अस्त्र बाहेर काढून भाजपला रोज झोडायला सुरुवात केली आहे. आजही कमळाबाई म्हणून त्यांनी भाजपला डिवचले आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आम्हाला “कमळाबाई” म्हणून चिडवता तर तुम्हाला “पेंग्विन सेना” म्हणून चिडवले तर चालेल का??, असा खोचक सवाल केला आहे. उद्धव ठाकरे हे आशिष शेलारांच्या पत्राला उत्तर देण्याच्या फंदात पडलेले नाहीत. पण सामनातून मात्र “कमळाबाई” शब्दाचा वार त्यांनी सुरूच ठेवलेल्या दिसतो आहे. त्यामुळे भविष्यात भाजपचे नेते सुद्धा शिवसेनेच्या ठाकरे गटावर “पेंग्विन सेना” म्हणून तुटून पडणार हे उघड आहे. अर्थातच “कमळाबाई” आणि “पेंग्विन सेना” यांच्यात मुंबई महापालिकेत जबरदस्त टक्कर होणार हे उघड आहे. ही टक्कर आपल्याला 2017 च्या निवडणुकीत देखील दिसली होती. त्यावेळी तर शिवसेना अखंड होती. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होती, तरी देखील मुंबई महापालिकेसाठी भाजप विरुद्ध शिवसेना जोरदार टक्कर झाली. या दोघांमध्येच मुंबई महापालिका अक्षरशः संख्यात्मक पातळीवर वाटली गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासह बाकीच्या किरकोळ पक्षांची अक्षरशः धुळधाण झाली होती.
2022 मध्ये देखील “कमळाबाई” आणि “पेंग्विन सेना” यांच्या याच टकरीची पुनरावृत्ती होताना दिसणार आहे. अशा वेळी सुसुताईंचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाईंचा पक्ष काँग्रेस यांची पुन्हा 2017 चीच अवस्था होते की काय??, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पवारांचे मनसूबे तरीही…
मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेऊन मला तुम्ही पाहिजे तिथे आणि पाहिजे तेव्हा प्रचाराला बोलवा. मी तुम्हाला ताकद देण्यासाठी तिथे प्रचाराला येईन. तुम्ही आपापसात मजबुतीने उभे राहा. आवश्यक तिथे युती – आघाडी कुठे करायची ते सांगा. आपण त्याप्रमाणे निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली होती. खासदार सुप्रिया सुळे या प्रचाराची आघाडी संभाळतील. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत तोळामासा आहे. त्या पक्षाला बळ देण्याचे मनसुबे पवारांनी रचले आहेत. पण कितीही प्रयत्न केले तरी राष्ट्रवादी काँग्रेस वाढून वाढून किती वाढणार??, हा खरा प्रश्न आहे.
काँग्रेस स्वबळावर लढणार
पवारांनी राष्ट्रवादीचा वाढवण्याचे मनसूबे रचण्यापूर्वी भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अर्थातच त्यांची तयारीही “जोरदार” आहे, पण त्यामुळेच जेव्हा ठाकरे गट आणि भाजप एकमेकांवर जबरदस्त तुटून पडून प्रचंड घमासान उभे करतील, तेव्हा त्या राजकीय वादळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कितपत टिकतील??, याविषयी शंका आहे. यावेळी ठाकरे गट जरी एकाकी असला तरी त्यांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड ही मराठा संघटना उभी असेल, तर भाजपच्या फौजेमध्ये शिंदे गट आणि मनसे देखील दाखल झाली असेल. अशा दोन्ही परस्पर विरोधी पण हिंदुत्वाशी जवळीक सांगणाऱ्या राजकीय शक्ती एकमेकांशी टक्कर घेतील तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची अवस्था 2017 सारखीच झाल्यास नवल वाटायला नको.
वाताहत अटळ
म्हणूनच वर उल्लेख केल्याप्रमाणे कमळाबाई आणि पेंग्विन सेना खऱ्या अर्थाने एकमेकांना भिडले, तर सुसुताईंचा पक्ष आणि भाईंचा पक्ष त्यांची काय अवस्था होईल?? याचा विचार करून त्यांच्या पक्षांच्या नेत्यांची मने धास्तावले आहेत. तिथे ना पवारांचा मनसूबा आणि बळ कामाला येणार आहे, ना राहुल गांधींचे आटा लिटर मध्ये मोजण्याचे भाषण कामाला येणार आहे!! दोन बलाढ्य हिंदुत्ववादी शक्तींच्या टकरीत या दोन तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांची वाताहत अटळ आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App