उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांत भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. भरभक्कम बहुमतात सत्ताधारी असूनही भाजपमधून एका पाठोपाठ एक बडे नेते बाहेर पडताना दिसत आहेत. ते आपापल्या ट्विटर हँडलवर भाजपमधून बाहेर पडण्याची कारणे एकाचढ एक देत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्यांच्या राज्यात हे सगळे घडते आहे ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गेल्या तीन दिवसात अक्षरशः मौन धारण करून बसले आहेत.In the last three days in Uttar Pradesh, the BJP has been facing a setback
पण ते मौनात का गेले आहेत? योगी बोलत का नाहीत? ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्व बरोबर बैठकांना मागून बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. राज्यात मोठमोठे राजकीय भूकंप होत असताना योगी दिल्लीतून हलायला तयार नाहीत. उलट बैठकांचा कालावधी वाढतच चालला आहे. याचे राजकीय रहस्य काय आहे?
पक्षातून बाहेर पडणारे नेते बेरोजगारी, दलित ओबीसींवर अन्याय, पिछड्या समाजाकडे दुर्लक्ष अशा स्वरूपाचे आरोप करत आहेत. या आरोपांना योगी आदित्यनाथ यांच्यासारखे सर्वात प्रभावी मुख्यमंत्री प्रत्युत्तर का देत नाहीत? की त्याच्या मागेही काही राजकीय रहस्य दडले आहे?, याचे उत्तर गेल्या तीन दिवसांत मिळालेले नाही. गेल्या तीन दिवसांत भाजप सोडून गेलेल्यांची नुसती यादी जरी बघितली तरी त्याचे राजकीय गांभीर्य आपल्या लक्षात येते.
आतापर्यंत
1.स्वामी प्रसाद मौर्य 2.भगवती सागर 3.रोशनलाल वर्मा 4.विनय शाक्य- 5.अवतार सिंह भाड़ाना 6.दारा सिंह चौहान 7.बृजेश प्रजापति 8.मुकेश वर्मा 9.राकेश राठौर 10.जय चौबे 11.माधुरी वर्मा 12.आर के शर्मा 13. बाला अवस्थी 14 धर्म सिंह सैनी
या बड्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी पक्ष सोडला आहेत. तरी देखील योगी आदित्यनाथ तस्साच की मस्स झालेले नाहीत. याचे रहस्य काय आहे? योगी आदित्यनाथ यांनी “नरसिंह रावी मौन” धारण केले आहे का? दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव अनेकदा काँग्रेसमधल्या अंतर्गत वादामध्ये मौन धारण करून बसायचे. शरद पवार, अर्जुन सिंग नारायण दत्त तिवारी यांच्यासारखे दिग्गज नेते त्यांच्या विरोधात बंडखोरीचे सतत पवित्रे घ्यायचे. अर्जुन सिंग आणि नारायण दत्त तिवारी हे तर पक्षाबाहेर पडले देखील होते. तरी देखील नरसिंह रावांच्या मौनात सूतराम आणि अजिबात खंड पडायचा नाही. नरसिंह राव आपल्या पद्धतीने राज्य करायचे आणि बड्या नेत्यांच्या बंडखोरीच्या बातम्या सतत वाढल्या की काँग्रेस कार्यकारणीकडून आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून घेत एकाच राजकीय झटक्यात या “बंडोबांचे” ते “थंडोबा” करून टाकायचे…!!
योगी आदित्यनाथ यांनी याच पद्धतीचे “नरसिंह रावी मौन” धारण केले आहे का? मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपमध्ये याच पद्धतीचे “नरसिंह रावी मौन” धारण करण्याची आणि “सौ सोनार की एक लोहार की” या पद्धतीने राजकीय तुकडा पाडायची पद्धत विकसित झाली आहे का?? मोदी आणि अमित शहा यांची कार्यपद्धती लक्षात घेता यात तथ्यांश जरूर आहे. मोदी आणि अमित शहा कोणत्याही बंडखोर नेत्यावर कधीही प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसले नाहीत. स्वतःहून जे बाहेर पडतात त्यांना त्यांनी सुखनैव बाहेर पडून दिल्याचे आत्तापर्यंत दिसले आहे.
गुजरात मध्ये विजय रुपाणी यांचे अख्खे मंत्रिमंडळ पंतप्रधान मोदींनी बिनबोभाट बदलले. रूपाणी यांच्यासकट त्यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला मंत्रिपदी ठेवले नाही. तरी देखील तिथे बंडखोरीचा “ब्र” देखील कोणी उच्चारला नाही. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशातील घडामोडींबाबत मोदींच्याच पावलावर पाऊल टाकत आहेत का? ज्यांना जायचे ते जाऊ द्या. तसेही 70 ते 80 आमदारांचे तिकीट कापायचेच आहे. स्वतःहून जे बाहेर गेले त्यांच्या राजकीय भवितव्याची काळजी भाजपने करायचे कारण नाही. “अँटी इन्कमबन्सी” नावाचा फॅक्टर आमदारांची तिकिटे कापून जर भागणार असेल तर कशासाठी बोलून तोंडाची वाफ दवडायची?? त्यापेक्षा राजकीय कृतीच करून दाखवायची!!, हा योगी आदित्यनाथ यांचा होरा आहे का??
कदाचित या निवडणुकीत अनुभव येईल. निवडणुकीत त्याचा कदाचित परिणाम दिसेल आणि मग पक्षातून बाहेर पडणारे कितीही धक्का देणारे आमदार आणि मंत्री असले तरी योगी आदित्यनाथ यांची “राजकीय शॉक अब्सॉर्ब” करण्याची कपॅसिटी लक्षात येईल. पण यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App