8 मार्च 2019 चा निर्णय; 1 जानेवारी 2022 ची तोंडाची वाफ!!
प्रतिनिधी
मुंबई : जनतेच्या पैशावर स्वतःच्या जाहिराती करणे मला मान्य नाही. आम्ही केवळ तोंडाच्या वाफा दवडत नाही, तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपचे वाभाडे काढत काल 1 जानेवारी 2022 रोजी मुंबईतील 500 स्क्वेअर फुटांच्या घरांच्या मालमत्ता कर माफीची घोषणा केली होती.Mumbai property tax waiver
या घोषणेवरून मोठे राजकारण सुरू झाले असून मनसेने सकाळीच मुंबईत मराठी माणसाची घरीच उरली नाहीत, तर कर माफी कुणाला देता?, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे वाभाडे काढले आहेत. भाजपने देखील याच मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना घेरले असून जो निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने 8 मार्च 2019 रोजी घेतला होता, तोच निर्णय 1 जानेवारी 2022 या दिवशी जाहीर करून श्रेय का लाटता?, असा सवाल भाजपने केला आहे.
मुंबईतून मराठी माणूस हद्दपार, तर घरच नाही तर कर कोणाचा माफ करणार?; मनसेचा खोचक सवाल
भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भातली एक जंत्री शेअर केली असून त्यामध्ये मालमत्ता कर माफीचा निर्णय मुंबई महापालिकेने 6 जुलै 2017 रोजी ठराव करून घेतला होता. तसेच 8 मार्च 2019 रोजी त्यावेळेच्या फडणवीस मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब करून तो जाहीर केला होता, असे स्पष्ट नमूद केले आहे. त्यावेळी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वचनपूर्ती बद्दल देवेंद्र फडणवीस सरकारचे अभिनंदन करणारे ट्विटही केले होते. याचा दाखला भाजपने आपल्या ट्विटमध्ये दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटा काढताना आम्ही तोंडाच्या वाफा दवडत नाही, असे म्हटले होते. त्यावर 8 मार्च 2019 रोजी घेतलेला निर्णय 1 जानेवारी 2022 रोजी पुन्हा जाहीर करणे यालाच तोंडाच्या वाफा दवडणे असे म्हणतात, अशा शब्दांत भाजपने देखील मुख्यमंत्र्यांना टोला हाणला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App