विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन संसदभवनाचा शिलान्यास करत असतानाच देशात राजकीय भूकंप घडताना दिसतोय. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अत्यंत प्रभावी टक्कर देण्यासाठी यूपीए अर्थात संयुक्त पुरोगामी लोकशाहीच्या चेअरमनपदी मोदींचे “राजकीय गुरू” शरद पवारांच्या निवडीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पवारांच्या चेअरमनपदावर निवडीसाठी गांधी परिवार एक पाऊल मागे घेण्याच्या तयारीत असल्याची बातमी झी २४ तासने दिली आहे. sharad pawar latest news
शरद पवार हे सध्याच्या यूपीए चेअरपर्सन सोनिया गांधींची जागा घेऊ शकतात. महाराष्ट्रात शरद पवारांनी घडवून आणलेल्या महाविकास आघाडीप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याला बळकटी देण्यासाठी दस्तुरखुद्द मोदींनी गुरू मानलेल्या पवारांनाच थेट त्यांच्या विरोधात खडा करण्याची ही अत्यंत मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. पवार जर यूपीएचे चेअरमन झाले तर तेच यूपीएच्या वतीने देशाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकतात. sharad pawar latest news
भाजपविरोधी देशव्यापी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत आहे. हा अत्यंत प्रभावी राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, असल्याची चर्चा आहे. अर्थात शरद पवार ही निवड स्वीकारणार का याकडे महाराष्ट्रासह देशातील सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली यूपीए अधिक बळकट करून मोदी – शहांच्या नेतृत्वाखालील भाजपला टक्कर देत त्याला सक्षम पर्याय देण्यासाठी हे मोठे पाऊल उचण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणूक हरून देखील शरद पवार यांनी चमत्कार करून दाखवला आहे. मतदारांचा कौल नसताना देखील त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत भाजपला विरोधी पक्षात बसवले आहे. अगदी तसेच शरद पवार हे यूपीएतील घटक पक्षांचे नेतृत्व करू शकतात, त्यामुळे ही देशाच्या राजकारणात भूकंप घडविणारी मोठी राजकीय खेळी मानली जात आहे.
या निमित्ताने पवारांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पुन्हा पल्लवित होऊ शकते. पवारांचा परवाच १२ डिसेंबरला ८० वा वाढदिवस आहे. यूपीएचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्यासाठी हा सर्वोत्तम राजकीय मुहूर्त आहे. लोकसभेची निवडणूक २०२४ मध्ये होणार आहे. शरद पवार हे वयाच्या ८४ व्या वर्षी पंतप्रधानपदाचे उमेदवार बनून यूपीए आघाडीचे नेतृत्व करू शकतात आणि मोदींच्या नेतृत्वाला टक्कर देऊ शकतात, अशी महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App