विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरही पक्षाने तिला विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त आमदार करण्याची तयारी दाखवली होती. इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा तिला पक्षात येण्याबाबत गळ घातली होती. मात्र सुप्रिया सुळे आणि बाळासाहेब थोरात या दोन्ही बड्या नेत्यांच्या विनंत्या ऊर्मिलाने नाकरल्याची माहिती पुढे आली आहे. दिव्य मराठीने ही बातमी दिली आहे. urmila matondkar latest news
२०१९ च्या लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी ऊर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मध्य मुंबईतून तिने निवडणूक लढवली. त्यात तिचा पराभव झाला. मुंबई काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांची पदाधिकारीपदी वर्णी लावण्याची तिने विनंती केली होती. मात्र ती पूर्ण झाली नाही. सप्टेंबर २०१९ मध्ये ऊर्मिलाने काँग्रेस सोडली. महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल नामनियुक्तच्या १२ जागांची शिफारस करण्यात येणार होती. त्यासाठी आघाडीतील तीन पक्ष ४-४ सदस्यांचा शोध घेत होते. त्यात काँग्रेसने ऊर्मिलास संधी देण्याची तयारी दाखवली होती. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वत: ऊर्मिलास फोन करून तशी विचारणा केली होती. मात्र ऊर्मिलाने त्यास ठाम नकार दिला.
त्यानंतर तिच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसने संपर्क साधला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या ऊर्मिलासाठी आग्रही होत्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी ऊर्मिला आणि तिचा काश्मिरी पती मोहसीन अख्तर यांच्याशी त्याबाबत दोन वेळा प्रत्यक्ष चर्चा केली होती. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद ऊर्मिलास दिले जाईल, असा शब्द पाटलांनी दिला होता. मात्र ऊर्मिलाने “सांगते’ म्हणून राष्ट्रवादीचा “निरोप” घेतला.
urmila matondkar latest news
सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी कंगना रनौत उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यावर टीका करत होती. तेव्हा ऊर्मिलाने ठाकरे कुटुंबीयांची बाजू उचलून धरली. त्या घटनेने ऊर्मिला शिवसेनेच्या नजरेत भरली. काँग्रेसच्या बारभाई कारभारात निभाव लागणार नसल्याचे तिने ओळखले. राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना चांगली असा तिला वाटले अन् सेवादलाच्या संस्कारात वाढलेल्या ऊर्मिलाने शिवसेनेने दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारली. ऊर्मिलास मोठ्या राजकीय आकांक्षा आहेत. तिने मुंबई कार्यक्षेत्र निवडले आहे. म्हणून शिवसेनेची निवड केल्याचे सांगितले जाते.
मुंबई मनपा निवडणुकीत होऊ शकते मदत
राजकीय पक्षांना स्टार कॅम्पेनरची गरज असते. असे स्टार्स पक्षांना पैसे देऊन आणावे लागतात. शिवसेनेला ऊर्मिलाच्या रूपाने मोठी स्टार कॅम्पेनर मिळाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ऊर्मिलाची प्रचारासाठी शिवसेनेला मोठी मदत होऊ शकते.
शिवसेना हिंदुत्ववादीच
शिवसेना हिंदुत्ववादीच आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे इतर धर्मांचा तिरस्कार करणे नव्हे. धर्म आस्थेचा विषय असून तो वेशीवर ऊहापोहाचा नाही, असे तिने भाजपचे नाव न घेता बजावले. मला हिंदू धर्म चांगला माहिती आहे. मी योगाची प्रशिक्षक आहे, असा दावा तिने केला. देशात विषारी माहौल तयार केला जात आहे, अशी टीका तिने भाजप व नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली.
राजकारणातील ही घुसमट संपवण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करणार असल्याचे तिने सांगितले. आपल्याला आवडत नाहीत अशा चित्रपटांवर किंवा कलाकारांवर बंदी घालण्याच्या आपण विरोधात आहोत, अशी तिने भूमिका मांडली. आपण काँग्रेस त्यागली असली तरी सोनिया गांधी व राहुल यांच्याविषयी आपल्याला आदर असल्याचे ऊर्मिलाने सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मराठी मनामनांत असलेला आदर कोणीही संपवू शकणार नाही, असा दावा ऊर्मिलाने केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App