विशेष प्रतिनिधी
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी पाच रुपयात शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने सवलतीचा पाच रुपये दर येत्या जूनपर्यंत लागू राहणार आहे
राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळी वितरीत करण्याचे अन्न, नागरी पुरवठा विभागाने ठरवले असल्याचे महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मात्र संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’च्या काळात या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची याची कोणतीही व्यवस्था न केल्याने हा निर्णय म्हणजे केवळ बोलाचा भात आणि बोलाची कढी ठरण्याची शक्यता शासकीय अधिकारीच व्यक्त करु लागले आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 14 एप्रिलपर्यंत देशभर ‘लॉकडाऊन’ आहे. या कालावधीत गोरगरीब व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांत जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे.
या साठी शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरू करण्यासाठी १ एप्रिलपर्यंत विलंब न करता जिल्हाधिकारी आणि नियंत्रक शिधावाटप यांनी आपल्या जिल्ह्यात क्षेत्रात तातडीने शिवभोजन केंद्र सुरू होण्यासाठी नव्याने शिव भोजनालय सुरू करावीत, असे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण देणे, जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे, भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App