विशेष प्रतिनिधी
पुणे : शास्त्रज्ञ म्हणून काम करताना महिला – पुरुष वेगळे असे काही नसते. सोपविलेली जबाबदारी आणि त्यातील आव्हानात्मक कामावर फोकस केला की, कामाला न्याय देता येतो असा अनुभव आहे. कारण इस्त्रो मध्ये स्त्री – पुरुष समानता आहे तिथे आम्ही माणूस म्हणून आपले ज्ञान, योगदान देतो, असे प्रांजळ मत इस्त्रोच्या शास्त्रज्ञ माधवीताई ठाकरे यांनी व्यक्त केले. There is no gender discrimination, there is gender equality
लोकविकास मंडळाच्या वतीने पुण्यात काल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला संमेलन बी.एम.सी.सी.च्या मैदानात भव्य मांडता मध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी चांद्रयान मोहिमेत योगदान देणाऱ्या माधवीताई ठाकरे यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. पश्चिम महाराष्ट्र प्रांत संमेलन सहसंयोजिका ॲड. अपर्णा नागेश पाटील या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
तू अष्टरूपा, तू विश्वरूपा !! ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना होती. संमेलनाची सुरुवात वेदपठण आणि शंखनादाने करण्यात आली. यावेळी कथक नृत्याद्वारे विघ्नहर्ता गणेश वंदन आणि देवीस्तवन सादर करण्यात आले.
माधवी ठाकरे पुढे म्हणाल्या की, इस्त्रोत महिला आणि पुरुष समानता आहे. जरी 8 तासांचा जॉब असला, तरी आम्ही 24 तास उपलब्ध असतो. तशीच मनाची तयारी करून या उपक्रमात, देशाच्या मोठ्या योजनेत योगदान देतो. मोठी आव्हाने स्वीकारायची असल्यास आपल्याला योगदान द्यावेच लागते. चांद्रयान मोहिमेच्या आधीच्या अपयशाने खचून न जाता धीराचे शास्त्रज्ञ आमच्या सर्वांच्या सोबत होते. त्यामुळेच कोविडसारखे आव्हान सुद्धा आम्ही पेलत दिवस रात्र काम केले. मी चंद्रावरील हालचाली टिपणाऱ्या कॅमेराच्या निर्मितीत योगदान देऊ शकले. सोपे आणि कठीण काहीच नाही फक्त आपण ते मनापासून केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. 26 जानेवारीचा दिल्लीतील चित्ररथ तयार करण्यात माधवीताई यांचा पुढाकार होता.
यावेळी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष पदमश्री निवेदिताताई भिडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. भारतीय महिलांना समान वागणूक होती आणि आजही आहे. महिलांना कमी / दुय्यम स्थान आपल्याकडे कधीच नव्हते.आपल्या वेद ऋचा महिलांनी लिहिलेल्या आहेत. ईश्वर प्रत्येकात आहे. ईश्वराचा अंश आपण प्रत्येक जन आहोत,हेच आपली संस्कृती मानते.
सध्या मात्र मी – माझे, स्व केंद्रित जगणे सुरु झाले आहे. आपला साधा हाताचा अंगठा असा वागू लागला तर ? आपल्याला नाही चालत ना ! तसेच आपणही व्यक्ती म्हणून कुटुंबाचा भाग आणि कुटुंब समाजाचा भाग आहोत. मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे हे विसरून चालणार नाही असे सांगत ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना आणि त्याचे मोलाचे महत्त्व त्यांनी सांगितले.
पाश्चात्य चिंतनात मात्र महिलांना समान दर्जा स्थान दिलेले दिसत नाही. त्यामुळे परदेशात स्त्री मुक्तीची चळवळ आली. आपल्याकडे समानता आहेच, परकीय आक्रमणामुळे आपल्याला काही गोष्टी नियोजनपुर्वक करायला लागल्या,इतकेच. भारतीय चिंतन ,संस्कृती संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
संमेलनाच्या संयोजिका संपदा खोले यांनी प्रास्ताविक केले, तर दुसऱ्या सत्रात ‘महिलांची सद्यस्थिती समस्या व उपाययोजना ‘ या विषयावर गट चर्चा झाली. यात उपस्थित सर्व महिला उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्या महिलांच्या समस्या व त्यावरचे उपाय याची यावेळी चर्चा झाली.
लाठीकाठी आणि मल्लखांब यांचे उत्साहवर्धक प्रात्यक्षिके यावेळी झाली.
समारोप सत्रात प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री विभावरी देशपांडे उपस्थित होत्या .त्यांनी आपला प्रवास त्यामागील प्रेरणा, संकल्पना आणि यशाची कल्पना याचे वेधक चित्र समोर उभे केले. स्त्रीने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेच पाहिजे तसेच आपले वैचारिक,आर्थिक आणि निर्णय स्वातंत्र्य स्वतःच स्वतःला दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
समारोप सत्रात बोलताना ज्ञान प्रबोधिनीज इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीच्या प्रज्ञा मानस संशोधिका संचालक सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका श्रीमती अनघाताई लवळेकर यांनी आपण भारताच्या विकासात साध्या सोप्या मार्गाने आपले योगदान छोट्या कृतीतून कसे देऊ शकतो यावर भाष्य केले.
पूर्वांचलातील मुलींनी पारंपारीक वेषात केलेल्या पसायदानाने संमेलनाचा समारोप झाला. पुण्यातील हजारो महिलांनी या संमेलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. संमेलनाच्या सहसंयोजिका सौ. गौरीताई देशपांडे, सौ. विद्याताई देशपांडे आणि सौ. मंजुषा कुलकर्णी यांनी संमेलनाचे उत्तम नियोजन केले त्यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App