विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र लाडकी बहिणी योजना ( ladki bahin yojana ) सुरू करून शिंदे – फडणवीस सरकारने त्यांच्या खात्यांमध्ये दरमहा 1500 रुपये टाकायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत 1 कोटी 59 लाख महिलांच्या खात्यांमध्ये विशिष्ट रकमा जमा झाल्या आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महायुतीसाठी ही योजना “गेम चेंजर” ठरेल, असे दावे – प्रतिदावे केले जात आहेत.
मात्र, महाविकास आघाडीचे अध्वर्यू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात महायुतीसाठी अनुकूल ठरेल, असे वाटत नाही, असे परखड मत व्यक्त केले. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी लाडकी बहिणी योजना महायुतीसाठी लाभदायक ठरणार नाही, असा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांनी लाडकी बहीण योजनेची स्तुती केली, पण महाराष्ट्रात महिला भगिनी असुरक्षित आहेत. त्यांची असुरक्षितता त्यांना दिसली नाही, अशा टोला पवारांनी मोदींना देखील हाणला.
मात्र, महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे वाभाडे काढताना पवारांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसलाच टोला हाणल्याचे दिसून आले. कारण महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेविरुद्ध कोर्टात गेलेल्या काँग्रेसवाल्यांनी हरियाणात मात्र लाडक्या बहिणींना दरमहा 2000 रुपये देण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात केली. महाराष्ट्रात लाडकी बहिणी योजना लोकप्रिय ठरते, ती जर या राज्यात “गेम चेंजर” ठरते, तर हरियाणा देखील ती तशीच “गेम चेंजर” ठरू शकेल, असा काँग्रेसचा होरा आहे. म्हणूनच काँग्रेसने हरियाणा मध्ये महिलांच्या खात्यात दरमहा 2000 रुपये भरण्याची घोषणा केली. इतकेच नाहीतर गॅस सिलिंडर साठी 500 रुपये देण्याचा देखील वचननाम्यात समावेश केला.
पण शरद पवारांनी वापरलेल्या लॉजिक नुसार जर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना महायुतीसाठी फायदेशीर ठरणार नसेल, तर हरियाणात काँग्रेससाठी तरी ती कशी काय फायदेशीर ठरू शकेल??, असा सवाल तयार झाला आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेवरून महायुतीला ठोकता – ठोकता पवारांनी अप्रत्यक्षपणे हरियाणाच्या बाबतीत काँग्रेसलाच ठोकून काढल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more