विशेष प्रतिनिधी
दिल्ली : PM Narendra Modi at Shanghai Summit :शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतंकवाद आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या देशांवर जोरदार टीका केली. अप्रत्यक्षपणे पाकिस्तान आणि चीन यांना आतंकवादाच्या मुद्द्यावरून त्यांनी खडेबोल सुनावले.
या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आतंकवाद ही जागतिक समस्या असून, ती केवळ एखाद्या देशाच्या सुरक्षेशी संबंधित नसून संपूर्ण मानवजातीसाठी धोका आहे, असे ठामपणे सांगितले. आतंकवादाबाबत कोणतीही दुहेरी भूमिका स्वीकारता येणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आतंकवादाचे समर्थन कोणत्याही स्वरूपात खपवून घेतले जाणार नाही, असे नमूद केले. पाकिस्तान आणि चीनचे नेते उपस्थित असताना मोदी यांनी त्यांच्या समोर आतंकवादाच्या मुद्द्यावर स्पष्ट शब्दांत सुनावले.
पंतप्रधान म्हणाले, “आतंकवाद हा कोणत्याही एका देशापुरता मर्यादित नसून, तो मानवतेसाठी एक गंभीर आव्हान आहे. कोणताही देश किंवा समाज यापासून सुरक्षित नाही. आतंकवादाबाबत दुहेरी भूमिका स्वीकारण्याला कोणताही आधार नाही.”
मोदी यांच्या भाषणाचा रोख प्रामुख्याने चीनवर होता, असे दिसते. पाकिस्तान आपल्या दहशतवादी कृत्यांसाठी कुप्रसिद्ध आहेच, परंतु चीन एकीकडे आतंकवादाला विरोध करत असल्याचे दाखवतो, तर दुसरीकडे पडद्याआड पाकिस्तानला मदत करतो. पंतप्रधानांनी या दुहेरी भूमिकेवर अचूकपणे बोट ठेवले.
त्यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत या भ्याड कृत्याची निंदा केली आणि ही मानवतेसमोरील समस्या असल्याचे अधोरेखित केले. या दुखद घटनेत भारताच्या पाठीशी उभे राहणाऱ्या मित्रराष्ट्रांचेही त्यांनी आभार मानले. तसेच, अल-कायदा या दहशतवादी संघटनेसह सर्व प्रकारच्या आतंकवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
भारताची त्रिसूत्री धोरणे
पंतप्रधानांनी SCO शी संबंधित भारताच्या धोरणाचे तीन मुख्य आधारस्तंभ सांगितले: सुरक्षा (Security), संपर्क (Connectivity) आणि संधी (Opportunity). या त्रिसूत्रीवर भारताची SCO मधील भूमिका आधारित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सुधारणांची गरज
पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय संघटनांच्या संरचनेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. ग्लोबल साउथच्या संकल्पनेवर विशेष भर देत, संयुक्त राष्ट्रांच्या 80 व्या वर्धापनदिनानिमित्त त्यामध्ये सुधारणा व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आतंकवादाविरुद्ध एकजुटीला यश
पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या एकजुटीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. परिषदेनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात सर्व राष्ट्रप्रमुखांनी आतंकवादाचा तीव्र शब्दांत निषेध केला. निवेदनात म्हटले आहे की, SCO चे सर्व सदस्य देश आतंकवाद, फुटीरता आणि अतिरेकी विचारसरणीविरुद्ध लढण्यासाठी कटिबद्ध आहेत. सीमापार दहशतवाद रोखण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी सर्व देश एकत्रितपणे प्रयत्न करतील, असेही निवेदनात नमूद आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App