विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात आली. शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात हेल्मेट बंधनकारक आहे. पुण्यासह सोलापूर, नाशिक मध्ये सुध्दा हेल्मेट सक्तीचा आग्रह प्रादेशिक परिवहन विभागाने धरला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश काढले आहेत. Now limited helmet enforcement in Pune; Collector’s order
पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व सर्व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी ही सक्ती लागू होणार आहे.
दरम्यान, डॉ. देशमुख यांनी आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, वाहन अपघातात दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. कार चालकांच्या तुलनेने दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट जास्त आहे. जितके दुचाकी वाहन चालक रस्ते अपघातात दगावतात, त्यापैकी सुमारे ६२ टक्के व्यक्तींना डोक्याला इजा झाल्यामुळे मृत्यू येतो.
मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्याने वाढते, असे या आदेशात म्हटले आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार ४ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरून प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. शासकीय नियमांचे पालन करणे हे शासकीय अधिकारी यांचे आद्यकर्तव्य आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयात येताना जाताना अथवा कोणत्याही अन्य कामासाठी दुचाकी वाहन वापरतांना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे, असे डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.
आदेशात नमूद केले आहे की दुचाकी वापरतांना हेल्मेट घातलेले नसल्यास संबंधीत अधिकारी/कर्मचारी/नागरीक हे मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहतील. मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १२९ चे उल्लंघन केल्यास त्याची गंभीर नोंद घेण्यात येईल असे आदेश देण्यात येत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App