विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत नागपूर हिंसाचारावर भाष्य करताना ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. विशेषतः त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व अनिल परब यांना चांगलेच धारेवर धरले. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. तुमचे साहेब मोदींकडे जावून त्यांची माफी मागून आलेत. तुमचाही इतिहास मला ठावूक आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका, असे ते म्हणालेत.
एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नागपूर येथील हिंसाचाराच्या मुद्यावर विधान परिषदेत निवेदन केले. पण मध्येच ते ठाकरे गटावर अक्षरशः तुटून पडले. त्याचे झाले असे की, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काही दिवसांवर एकनाथ शिंदे यांच्यावर केंद्राच्या नोटीसीला घाबरून भाजपसोबत पळून गेल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाचा धागा पकडत शिंदे म्हणाले, या लोकांनी सत्तेसाठी औरंगजेबी विचार स्वीकारले. पण आम्ही तुमचा टांगा पलटून टाकला. हे करायला वाघाचे काळीज लागते. लांडगा वाघाचे कातडे पांघरून वाघ होत नाही. तो लांडगाच राहतो. त्यासाठी वाघाचे काळीज लागते.
डिवचत नाही, तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही
एकनाथ शिंदे म्हणाले, ये शेर का बच्चा है. आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. आम्ही लढून जिंकू किंवा लढून शहीद होऊ या निर्धाराने निवडणूक लढली. अनिल परब तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कोण नोटिसीला घाबरून कुठे गेले हे मला माहिती आहे. मी कमरेखाली वार करत नाही. तुम्हाला नोटिस आल्यानंतर तुम्ही कुठे गेला होता हे ही मला माहिती आहे. मला जोपर्यंत कुणी डिवचत नाही, तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही. सचिन अहिर तुम्हाला बरेच काही माहिती आहे. मी खुर्चीसाठी काहीच केले नाही. मी स्वतः अमित शहा आणि नरेंद्र मोदींना फोन करून सांगितले तुम्ही सांगाल तो निर्णय मला मान्य असेल.
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली
एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना या लोकांनी देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा कट रचला होता. यांनी औरंग्याचे विचार घेतले, मात्र मी बाळासाहेबांना सोडले नाही. त्यामुळे माझ्यासोबत 60 लोक आले. मी हिंदुत्वाचे सरकार आणले. तुम्हाला फक्त 20 लोक निवडून आणता आले. यावरून जनतेचा कौलही आमच्याच बाजूने असल्याचे स्पष्ट होते.
एक अंदर की बात सांगतो ह्यांचे प्रमुख मोदींना भेटायला गेले आणि मला वाचवा म्हणून माफी मागू लागले. अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला गेला होतात आणि तिथे जावून माफी मागितली. त्यानंतर राज्यात माघारी येऊन पलटी मारली.
नागपूरची घटना दुर्दैवी आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेनचे थडगे होऊ नये म्हणून त्याला समुद्रात टाकले. त्यामुळे औरंग्याबाबत तुम्हाला काय प्रेम आहे? काँग्रेस काळात हे थडगे झाले आहे. त्यामुळे संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हवीच कशाला? असा सवालच एकनाथ शिंदेंनी यावेळी विरोधकांना उद्देशून केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App