विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील ज्योतिर्लिंगाना वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात हे लक्षात घेवून श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा.मंदिर परिसरातील सुरू असलेली कामे गतीने करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करा.या परिसरात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ठ दर्जाच्या सेवा सुविधा तयार करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
वर्षा निवासस्थान येथे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास सादरीकरणाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग व्ही.राधा,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, .नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी,सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल या बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी येणा-या सध्याची भाविकांची व भविष्यातील संख्यानुसार दर्शन रांगांचे नियोजन, यात्रा उत्सव कालावधी हे लक्षात घेवून मंदिर परिसरात प्रतिक्षा कक्ष,पिण्याच्या पाण्याची सोय, निवासाची व्यवस्था, अंतर्गत रस्ते, परिसर साफसफाई करणे, माहिती फलक, पर्यटक स्वागत कक्ष, पार्कींग व्यवस्थापन, आपत्कालीन यंत्रणा, तिकीट कक्ष, आरोग्य सुविधा, उपहारगृह यासह पर्यटन वाढीला चालना देणारे उपक्रम या भागात प्रामुख्याने राबवा.स्थानिक नागरिक व प्रशासनाला विचारात घेवून येथील कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था काटेकार असावी यासाठी खबरदारी घेण्यात यावी.अत्याधुनिक यंत्रणा तसेच कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने एकात्मिक सुरक्षा प्रणाली विकसित करा.जेणेकरून तात्काळ आपत्कालीन परिस्थीतीत नागरिकांना मदत मिळेल.मंदिर व्यवस्थापनासाठी काटेकोर नियम असणे गरजेचे आहे.पर्यावरण संवर्धन व रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विभागानेही येथील प्रस्तावित कामे गतीने करावीत.आज सादर झालेल्या आराखड्यांना उच्चस्तरीय समितीकडून मंजूरीनंतर निधी मिळेल.पुरातत्व विभागाकडून घेण्यात येणा-या मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या अधिका-यांसोबत एक वेगळी बैठक आयोजित करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
राज्यातील ज्योतिर्लिंगाच्या विकास आराखड्याची प्रभावी व तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी नियुक्त असलेले अधिकारी यांनी यावेळी विकास आराखड्यांचे सादरीकरण केले. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा व श्री क्षेत्र भीमाशकर विकास आराखडा कुंभमेळा २०२७ चे सादरीकरण सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथचे सादरीकरण वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर विकास आराखडा सादरीकरण अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी केले.
या बैठकीला नियोजन विभागाचे प्रधानसचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के. एच. गोविंदराज, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, वित्त विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, पर्यटन विभागाचे सचिव संजय खंदारे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह,सचिव बांधकामे आबासाहेब नागरगोजे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज नाशिक – त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग दूरदृश्यप्रणालीव्दारे नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकात पुलकंडवार,छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर इतर विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App