बरे सत्य बोला, यथातथ्य चाला…!!

जितीन प्रसादांसारखे तरूण नेते काँग्रेस सोडून चाललेत. ज्येष्ठ नेते त्यावर सत्य बोलत आहेत… आणि तरूण नेते यथातथ्य चालत आहेत… काँग्रेस श्रेष्ठी मात्र स्थितप्रज्ञ आहेत. young leaders in the congress thinks that they have no political future in the party


शाळेमध्ये असताना सकाळचे राष्ट्रगीत आणि प्रार्थना झाली की दैनंदिन सुविचार सांगायची पध्दत होती. त्यात “बरे सत्य बोला, यथातथ्य चाला,” हा सुविचार सांगितल्याचे आठवतेय… पण आज हा सुविचार पुन्हा आठवायचे कारण काँग्रेसमधल्या काही शेलक्या घडामोडी आहेत.

काँग्रेसचे ४७ वर्षांचे तरूण नेते जितीन प्रसाद हे काँग्रेस सोडून भाजपवासी झाले. आणि त्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांकडे बारकाईने पाहिले तर वर उल्लेख केलेला सुविचार कोणालाही आठवल्यावाचून राहणार नाही, याची खात्री वाटते. या सुविचाराचा अर्थ काय आहे…??, तर नेहमी खरे बोलावे आणि त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करावा, असा त्याचा साधा अर्थ आहे. काँग्रेसचे नेते आज तेच तर करत आहेत. फक्त फरक एवढा आहे, की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते “सत्य बोलत आहेत” आणि काँग्रेसचे तरूण नेते “यथातथ्य चालत आहेत”…!!

जितीन प्रसाद हे ४७ वर्षांचे तरूण काँग्रेस सोडून भाजपला जवळ करतात. त्यावेळी व्यक्त झालेल्या तरूण नेत्यांच्या आणि ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रियांमधला फरक आपल्याला या सुविचाराच्या विभागणीचा प्रत्यय आणून देतो.

जितीन प्रसाद यांचे काँग्रेस सोडून निघून जाणे हे ज्येष्ठ नेते हरीष रावत यांना काँग्रेसच्या तोंडावर मारलेली चपराक वाटते, तर दुसरे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना ते पक्षाचे दुर्दैव वाटते. काँग्रेसने जितीन प्रसादांना आणि त्यांच्या वडिलांना खासदारकी दिली. मंत्रीपद दिले. वर्षानुवर्षे सत्तेचे सुख दिले. पण आज जितीन प्रसाद हे पक्ष सोडून गेलेत, हे आमचे दुर्दैव आहे, असे खर्गे म्हणाले आहेत. ते अक्षरशः खरे आहे. खरोखरच प्रसाद पितापुत्रांना काँग्रेस पक्षाने सत्तेची पदे आणि संधी दिलीच आहे… पण हा “सत्य बोला” या सुविचाराचा भूतकाळ झाला.

आता “यथातथ्य चाला” या सुविचाराचा भविष्यकाळ पाहू… काँग्रेसच्या तरूण नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून आणि कृतीतून हा भविष्यकाळ दिसून येतो.काँग्रेसच्याच तरूण नेत्यांना पक्ष सोडून जाण्याची प्रक्रिया आता ही राजकीय अपरिहार्यता वाटते आहे. एकेकाळी राहुल गांधी यांच्या बरोबर नाव जोडले गेलेल्या उत्तर प्रदेशातल्या बंडखोर आमदार आदिती सिंग यांची प्रतिक्रिया पाहा. जितीन प्रसाद यांनी योग्यच केले. त्यांचा त्या पक्षात सन्मान होईल. काम करण्याची संधी मिळेल, असे आदिती सिंग म्हणाल्या आहेत. हे देखील तेवढेच खरे आहे.

जितीन प्रसादांनी स्वतःच भाजप प्रवेशाच्या वेळी हेच तर उघडपणे सांगितले आहे. ज्या पक्षात राहून आपल्या जिल्ह्यातल्या, प्रदेशातल्या जनतेचे हित संभाळता येत नाही, त्या पक्षात राहून करायचे काय?, हाच तर परखड सवाल जितीन प्रसादांनी केला आहे. त्यात between the lines वाचण्याची अजिबात गरज नाही. याचा अर्थ उघड आहे. काँग्रेसमध्ये राहून आपल्याला राजकीय भवितव्यच नसेल, तर त्या पक्षात राहून करायचे काय??, असा हा परखड सवाल आहे. आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे या सवालाचे उत्तर नाही. काँग्रेस श्रेष्ठी या सवालाचे उत्तर देऊ इच्छित नाहीत.

मग पक्षातल्या तरूण नेत्यांनी करायचे काय…?? आपापला राजकीय मार्ग चोखाळण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरतो का…?? हे लक्षात घेऊनच जितीन प्रसादांनी आपला राजकीय भवितव्याचा मार्ग निवडला आहे.

खरे बोलणाऱ्या हरीष रावत, मल्लिकार्जून खर्गे यांच्यामध्ये आणि जितीन प्रसादांसारख्या तरूण नेत्यांमध्ये मोठा फरक आहे. या दोन्ही नेत्यांचे राजकीय कर्तृत्व सिध्द झालेले आहे. त्यांना राजकीय आयुष्यात जी काही सत्तापदे मिळवायचीत ती मिळवून झाली आहेत. किंवा अजून थोडेफार मिळवायचे राहिले आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते पक्ष संघटना नीट चालावी, यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे मानायलाही हरकत नाही.

पण जितीन प्रसाद, ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, आदिती सिंग, सचिन पायलट या नेत्यांचे तसे नाही. त्यांच्या समोर अजून २५ – ३० वर्षांचे राजकीय आयुष्य आहे. हे सगळे स्वतंत्र प्रतिभेचे आणि विशिष्ट वकूबाचे नेते आहेत. कदाचित स्वतंत्र पक्ष उभारून आपण काही ठसा उमटवू शकणार नाही, याची त्यांना जाणीव आहे. म्हणून तर ते दुसऱ्या प्रबळ राजकीय पक्षाच्या पर्यायाने भाजपच्या राजकीय आश्रयाला जात आहेत.

काँग्रेस पक्षाने या नेत्यांना काहीच दिले नाही, असा त्यांचाही बिलकूल दावा नाही. उलट काँग्रेसने त्यांना राजकीय ओळख मिळवून दिली, हे सगळे तरूण नेते उघडपणे कबूल करतात. पण त्यांच्या पुढच्या राजकीय भवितव्याचे काय…?? या सवालाचे उत्तर त्यांना जर काँग्रेस पक्षात आढळत नसेल, तर त्यांनी करायचे काय…?? आपली राजकीय कारकीर्द तशीच खुंटून ठेवायची की ती संपवूनच टाकायची…?? आणि हे दोनच पर्याय तरूण नेत्यांपुढे असतील, त्यांनी चोखाळलेली भाजपची नवी वाट चुकीची कशी म्हणता येईल…?? या सवालाचे उत्तर ज्येष्ठ नेत्यांकडे नाही.

काँग्रेसची संघटना म्हणून ही अवस्था खरोखर दयनीय अशीच झाली आहे. “तरूणांची अस्वस्थता; ज्येष्ठांची हतबलता आणि पक्षश्रेष्ठींची स्थितप्रज्ञता”, या शब्दांपलिकडे काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेचे वर्णन करता येत नाही.

young leaders in the congress thinks that they have no political future in the party