2004 मध्ये शक्य असूनही मुख्यमंत्रीपद सोडलेली राष्ट्रवादी 20 वर्षांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करून निवडणूक लढवेल??

विशेष प्रतिनिधी

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेच्या ताब्याविषयीची लढाई रस्ता ते सुप्रीम कोर्टापर्यंत सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या मुख्यालयासमोर चाललेल्या पोस्टरबाजीतूनया स्पर्धेचा सुगावा लागला आहे. जयंत पाटील, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे हे जणू राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतले फ्रंट रनर्स आहेत असे या निमित्ताने लोकांसमोर आणले जात आहे.Will NCP officially announce chief ministerial candidate to contest 2024 maharashtra assembly elections??

पण मूळात प्रश्न हा आहे, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या राजकीय शैलीचा अनुभव लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेस उघडपणे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवेल का??



2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातल्या चार पक्षांमध्ये सर्वाधिक म्हणजे 72 जागांवर विजय मिळाला होता. हा राष्ट्रवादीचा विधानसभा निवडणुकीतला हायेस्ट परफॉर्मन्स होता. पण तरी देखील काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांच्या डावपेचामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद खेचून घेता आले नव्हते. या विषयावर अजितदादांनी लोकमतच्या मुलाखतीत नुकतीच खंत व्यक्त केली आहे. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद सोडायला नको होते. कारण त्यावेळी संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने होते, अशा शब्दांमध्ये अजितदादांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्या निर्णयावर ठपका ठेवला आहे.

पवारांची राजकारण शैली

शरद पवार यांच्या राजकारण शैलीचा गेल्या 50 55 वर्षांचा अनुभव लक्षात घेतला, तर त्यांनी जाहीरपणे अथवा समोरून कधी राजकारण केल्याचे आढळत नाही. त्यांच्या आधीच्या समाजवादी काँग्रेसने अथवा नंतरच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करून विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही. किंबहुना समाजवादी काँग्रेस किंवा आत्ताची राष्ट्रवादी काँग्रेस यांना 2004 चा अपवाद वगळता महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 70 जागा देखील मिळवता आलेल्या नाहीत. त्यामुळे शरद पवारांचे राजकारण हे नेहमी सत्तेच्या तडजोडीचे आणि पदांच्या देवाण-घेवाणीचेच राहिले आहे. काँग्रेसने या पदांच्या देवाण-घेवाणीत मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत पवारांवर नेहमीच मात केली आहे.

पवार विरोधी गटातलेच काँग्रेसचे मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काँग्रेसचे विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे हे नेते मुख्यमंत्री झाले. यापैकी सुशील कुमार शिंदे वगळले, तर विलासराव, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे कायम शरद पवारांच्या विरोधी गटाचे नेते मानले गेले. म्हणजे ते कोणीही पवारांच्या मनातले मुख्यमंत्री नव्हते. 2014 मध्ये तर देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने भाजपने पवारांच्या मनात अजिबात नसलेला मुख्यमंत्री नेमून त्यांच्यावर मात केली होती. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून पवारांनी महाविकास आघाडीची अडीच वर्षे सत्ता भोगली. पण त्यानंतर त्यांच्या वाट्याला विरोधी बाकच आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1999 नंतर महाराष्ट्रात काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे 4 मुख्यमंत्री झाले. त्यापैकी सगळे मुख्यमंत्री काँग्रेसचेच होते. सुशील कुमार शिंदे यांचा अपवाद वगळला तर बाकीचे मुख्यमंत्री पवारांच्या मनातले नव्हते!! एवढे होऊनही पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा आपल्या मनातला मुख्यमंत्री महाराष्ट्रात अद्याप नेमता आलेला नाही.

 ठाकरे गट संपुष्टात, राष्ट्रवादीला अशा

आता जेव्हा शिवसेनेत निकराचा संघर्ष उफाळला आहे त्यावेळी उद्धव ठाकरेंचा एक गट राजकीय दृष्ट्या संपुष्टात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला आपली “पॉलिटिकल स्पेस” वाढविण्याची आशा वाटत आहे. नेमकी त्याच वेळी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतील नेत्यांची पोस्टर्स लावून महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांद्वारे राष्ट्रवादीतील मुख्यमंत्री पदाची चर्चा घडवली जात आहे. राष्ट्रवादी पुरता तरी सध्या पवारांचा निर्णय अंतिम असल्याचे बोलले जात आहे. जोपर्यंत राष्ट्रवादीतील मुख्यमंत्री पदाची स्पर्धा फक्त पोस्टर पुरती मर्यादित आहे, तोपर्यंत काही अडचण नाही. पण ज्यावेळी ही स्पर्धा पोस्टर मधून बाहेर येऊन प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात येईल, त्यावेळी त्या स्पर्धेचे भवितव्य काय असेल?? आणि त्या स्पर्धेत पवार कोणाला कौल देतील??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!

शरद पवारांच्या मनातील मुख्यमंत्री

मराठी माध्यमांनी अनेकदा खासदार सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या मनातील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत, अशा बातम्या दिल्या आहेत. मग सुरुवातीला जयंत पाटील आणि नंतर अजितदादा पवार यांच्या भावी मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स लावून राष्ट्रवादीतूनच मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला हवा दिली गेली आहे का?? आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांचे पोस्टर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री असे झळकवून हळूच त्यांचे प्यादे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत पुढे सरकवले गेले आहे का?? हेही पाहणे तितकेच किंबहुना जास्त महत्त्वाचे आहे!!

पंचविशीत तिहेरी आकडा गाठण्याचा मनसूबा

शिवसेनेतला ठाकरे गट संपुष्टात आल्यानंतर निर्माण झालेली “पॉलिटिकल स्पेस” ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक परफॉर्मन्स मध्ये भर घालण्याची अपेक्षा नेत्यांना वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या 54 आमदार आहेत. तो आकडा वाढवून 70 – 80 पर्यंत नेण्याचा त्यांचा मनसुबा असू शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसने मध्यंतरी घेतलेल्या त्यांच्या महाराष्ट्रव्यापी अधिवेशनात महाराष्ट्रात 100 जागा निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा पक्ष स्थापनेच्या पंचविशीत करणार आहे, तेव्हा महाराष्ट्र विधानसभेत तिहेरी आकडा गाठण्याचा त्यांचा इरादा आहे. पण तो 145 एवढ्या बहुमताचा आकडा नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व उघडपणे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करून निवडणुकीच्या रण मैदानात उतरणार की शरद पवारांच्या राजकीय शैलीनुसार उघडपणे काही न करता वेगवेगळी राजकीय गणिते जुळवण्याचे जुगाडाचेच राजकारण करणार??, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे!!

Will NCP officially announce chief ministerial candidate to contest 2024 maharashtra assembly elections??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात