प्रियांका वाराणसीतून निवडून आल्या असत्या, पण त्यांना तिकीट द्यायला काँग्रेसमध्ये कोणी आडकाठी आणली होती??

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत “मॅजिक ऑफ 99” साध्य केल्यानंतर आलेल्या उत्साहाच्या उधाणात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी धडाधड दौरे करू लागले आहेत. त्यांनी अमेठी, रायबरेली आणि वायनाडचे दौरे केले. तिथे राहुल गांधींची जोरदार भाषणे झाली. त्यांनी मोदींवर नेहमीप्रमाणे प्रहार केले. मी मोदींप्रमाणे परमेश्वर नाही, मी सामान्य माणूस आहे, परंतु आम्ही सरकारला जेरीस आणणार आहोत, वगैरे इशारे त्यांनी दिले.Who sabotaged priyanka gandhi’s loksabha ticket fortune in the Congress itself??

पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींनी जे एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले, त्यातून काही सवाल तयार झाले आहेत, जे सध्या तरी कोणी माध्यमांमध्ये विचारताना दिसत नाही. राहुल गांधींनी रायबरेली आणि त्यानंतर वायनाड मध्ये केलेल्या भाषणांमध्ये प्रियांका गांधी जर वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभ्या राहिल्या असत्या, तर प्रचंड बहुमताने निवडून आल्या असत्या, असा “जावईशोध” लावला. अर्थात राहुल गांधी अद्याप कुणाचे अधिकृत जावई नाहीत. त्यामुळे त्यांनी नुसताच “शोध” लावला असे म्हणावे लागेल.



पण तरीही राहुल गांधींनी तो “शोध” लावला किंवा नाही, हा भाग थोडा बाजूला ठेवला, तर राहुल गांधींच्या विधानात तथ्य किती आणि “पश्चात बुद्धी” किती??, याचा थोडा आढावा घेतला, तर काँग्रेस मधल्याच अनेक राजकीय विसंगतींचे टोकदार कंगोरे समोर येतील.

मूळात राहुल गांधींना नरेंद्र मोदींचा वाराणसी मध्ये पराभव करण्याचा “कॉन्फिडन्स” केवळ निकालानंतर आला. त्याआधी तो “कॉन्फिडन्स” ना राहुल गांधींच्या भाषणात दिसला, ना प्रियांका गांधींच्या भाषणात दिसला, ना सोनिया गांधींच्या संदेशात दिसला. त्यामुळे उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांच्या साथीने काँग्रेसला जे यश मिळाले, त्यातून राहुल गांधींचा “कॉन्फिडन्स” वाढला आणि त्यांनी थेट नरेंद्र मोदींच्या पराभवाची भाषा सुरू केली आणि त्यामध्ये प्रियांका गांधींचे नाव चतुराईने गुंफले ही “पश्चात बुद्धी” आहे!!

पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींच्या वक्तव्याचा थोडा काँग्रेस अंतर्गत घडामोडींच्या आधारे धांडोळा घेतला, तर मूळात प्रियांका गांधींना निवडणुकीत उतरवायला आणि त्यांना वाराणसी तिकीट द्यायला कोणी आडकाठी गेली होती??, जर प्रियांका गांधींनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असती, तर वाराणसी मध्ये काँग्रेस कडून आपल्याला तिकीट मिळाले पाहिजे, अशी मागणी करण्याची कोणाची हिंमत तरी झाली असती का??, तशी हिंमत कुणी केली असती तर काँग्रेस हायकमांडने त्या नेत्याची हिंमत सहन केली असती का??, या सगळ्या सवालांची उत्तरे नकारार्थी आहेत.

मूळात प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात हिरीरेने निवडणूक लढवायची तयारी दाखवली असती आणि त्यांना तिकीट दिले असते, तर आज वाराणसीतला निकाल जो लागला तो तसाच लागला असता की नाही, हा भाग अलहिदा, पण हा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवला, तरी मूळात प्रियांका गांधींना निवडणूक लढविण्यापासून दूर ठेवले कोणी??, त्यांना तिकीट कोणी दिले नाही?? प्रियांका गांधींना निवडणूक लढवण्यापासून भाजपने दूर ठेवले का??, की काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणातून, त्यातही गांधी परिवाराच्या अंतर्गत राजकीय ताणतणावातून प्रियांका गांधींना निवडणुकीत तिकीट देण्यापासून बाजूला ठेवले गेले??, याचा बारकाईने विचार केला, तर काही वेगळीच तथ्यं त्यातून समोर येतील.

साधा राजकीय हिशेब लावला… जर प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून टक्कर दिली असती, मग भले त्या जिंकल्या असत्या, किंवा हरले असत्या, तरी त्यांची प्रतिमा काँग्रेसमध्ये आणि विरोधी आघाडीमध्ये कितीतरी उंचावली असती… मग तशी प्रतिमा उंचावणे राहुल गांधींच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने त्यांना परवडले असते का?? गेल्या सलग तीन निवडणुकांमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पराभव झाला, तरी देखील राहुलचे नेतृत्व बाजूला सारून प्रियांका गांधींचे नेतृत्व पुढे आणले गेले नाही. याचे कारण काय आहे?? या कारणाचा कोणी खोलवर जाऊन विचार केला आहे का??

त्यातही राहुल गांधींचे म्हणणे खरे असल्याचे मान्य केले आणि प्रियांका गांधी थेट नरेंद्र मोदींविरुद्ध जिंकल्या असत्या, तर त्या भारतातल्या प्रचंड मोठ्या राजकीय भूकंपात राहुल गांधींचे राजकीय नेतृत्वाचे घर वाचले असते का??, मोदींचा पराभव करून लोकसभेत पोहोचलेल्या प्रियांका गांधींच्या नेतृत्वाच्या पासंगाला राहुल गांधींचे नेतृत्व पुरले असते का?? असले गांधी घराण्यातल्या नेतृत्वाचे संघर्षाचे सवाल तयार झाले असते, आणि या सवालांच्या उत्तरातून खुद्द राहुल गांधींचे राजकीय भवितव्य कायमचे धोक्यात आले असते, किंबहुना संपुष्टात आले असते. प्रियांका गांधींचे नेतृत्व इंदिरा गांधींसारखे काँग्रेसमध्ये प्रस्थापित झाले असते. हे सोनिया गांधींना आणि राहुल गांधींना चालले असते का??

पण प्रियांकांना लोकसभा निवडणुकीत तिकीट देणे आणि त्या निवडून येणे यातला खरा राजकीय धोका इतर कोणाच्या नव्हे, पण सोनिया गांधींच्या आणि राहुल गांधींच्या निश्चित ध्यानात आला असणार, त्यामुळे मूळात प्रियांका गांधींना तिकीट न देणे हाच राहुल कॅम्पमधून राजकीय उपाय योजण्यात आला होता, हे उघड दिसते. मग पश्चात बुद्धीने प्रियांका गांधींनी नरेंद्र मोदींचा वाराणसीत पराभव केला असता, हे म्हणणे म्हणजे प्रियांका गांधींच्या नेतृत्वाला थोडासा गुळ लावण्यापलीकडे काही नाही. ही राहुल गांधींच्या वक्तव्यातील वस्तुस्थिती आहे!!

Who sabotaged priyanka gandhi’s loksabha ticket fortune in the Congress itself??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात