दुचाकी असो वा चारचाकी वाहन, ते नेमके चालते कसे?

दुचाकी असो वा चारचाकी मोटार त्याचे इंधन बदलत गेले आहे, त्यातील सुखसोयी वाढल्या आहेत, असंख्य बदल झाले आहेत आणि होत आहेत; पण ही ती चालण्याची यांत्रिक संकल्पना मात्र अजून तरी फारशी बदललेली नाही. मोटारीच्या चलन यंत्रणेचे तीन मुख्य विभाग असतात. इंजिन, क्लच आणि फ्लाय व्हील तसेच गीयर यंत्रणा. गाडी सुरू करताना आपण आधी इंजिन सुरू करतो. त्यावेळेला इंजिन आणि चाके यांच्यात संपर्क नसतो. त्यामुळेच इंजिन सुरू झाल्याबरोबर गाडी गती घेत नाही. क्लच ही यंत्रणा इंजिन आणि गीयर यांच्यातील दुवा असते; जी आपल्याला हवे तेव्हाच इंजिन आणि गीयर यांच्यातील संपर्क घडवून आणते. जेव्हा क्लच इंजिनाच्या संपर्कात असतो तेव्हाच इंजिनात तयार झालेले वर्तुळाकार चलन क्रँकशाफ्टला जोडलेल्या भरीव चक्राद्वारे क्लचकडे हस्तांतरित केले जाते. क्लचमधून येणारा दांडा गीयर यंत्रणेला जोडलेला असतो. Whether it is a two-wheeler or a four-wheeler, how exactly does it work?

आपण निवडलेल्या गीयर साखळीनुसार गीयरचा दांडा फिरू लागतो. गीयर यंत्रणेमधून पुढे येणारा दांडा डिफरन्शियल व्यवस्थेमधून मोटारीच्या चाकांना जोडलेला असतो. डिफरन्शियलमध्ये असलेले बिव्हेल गीयर गतीची दिशा बदलण्याचे काम करतात आणि त्यांना जोडलेल्या दांडय़ांना असलेली चाके फिरवू लागतात. अशा रीतीने इंजिनात तयार झालेली यांत्रिकी ऊर्जा वाहनाला गती देते. ही यंत्रणा कशी चालते, ते जरा अधिक तपशिलात पाहू. वर सांगितल्याप्रमाणे इंजिनानंतर येणारा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे फ्लाय व्हील आणि क्लच. फ्लाय व्हील इंजिनातील क्रँकशाफ्टला मिळालेली वर्तुळाकार गतिज ऊर्जा साठवण्याचे काम करते आणि जेव्हा क्लच जोडला जातो तेव्हा सातत्य असलेली गती पुरवते.

क्लच इंजिनाला पुढच्या गीयर यंत्रणेपासून हवे तेव्हा अलग करण्याचे काम करतो. हे केल्यामुळे इंजिन चालू असतानासुद्धा वाहनाची चाके स्थिर राहतात. क्लचची चकती फ्लाय व्हीलवर दाबून धरलेली असते. हा दाब त्या चकतीवर असलेल्या दुसऱ्या चकतीमार्फत क्लचमधील यंत्रणा देत असते. जेव्हा क्लचची पट्टी मोकळी असते तेव्हा फ्लाय व्हील आणि गीयर यंत्रणा जोडलेली असते. जेव्हा क्लच दाबला जातो तेव्हा क्लच चकतीवर दाब देणारी चकती मागे सरकते आणि क्लच चकती फ्लाय व्हीलपासून मोकळी होते आणि इंजिनाचा गीयर यंत्रणेशी संबंध राहत नाही. त्यामुळेच वाहन सुरू करताना अथवा गीयर बदलताना क्लच दाबावा लागतो. वाहन जेव्हा न्युट्रल गीयरमध्ये असते तेव्हाही क्लच इंजिनाला जोडलेलाच असतो, पण गीयर यंत्रणेतील दांडा त्यावेळी फिरत नसल्याने चाके फिरत नाहीत.

Whether it is a two-wheeler or a four-wheeler, how exactly does it work?