
वृत्तसंस्था
मुंबई : म्युकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीचे प्रमाण राज्यात वाढत आहे. आतापर्यत ७ हजारावर लोकांना हा आजार झाला असून आजपर्यंत ७२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. Till now, there are 7,998 cases of Mucormycosis including 729 deaths in Maharashtra
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यात म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले. कोरोनातून मुक्त झालेल्या आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला हा आजार होतो, असे आढळले आहे. त्यामध्ये काळ्याबरोबर पांढरी आणि पिवळ्या बुरशीचा प्रभाव वाढत असल्याचे उघड झाल्याने चिंतेत भर पडली आहे. रुग्णांना डॉक्टरानी कोरोना उपचार करताना स्टिरॉईड दिल्यामुळे हा रोग नंतर बळावला आहे.
काही दिवसांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी रुग्णसंख्या होती. ती आता ७ हजारांवर गेली आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. असे असताना राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढलं असून, राज्यात आजपर्यंत म्युकरमायकोसिसचे ७ हजार ९९८ रूग्ण आढळले असून, ७२९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार ३९८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, २ हजार ७५५ रूग्ण बरे झाले आहेत.
‘म्युकर’वरील ९ हजारांवर इंजेक्शन्सचा पुरवठा
राज्याला म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी ९ हजार ३७४ अँफोटेरेसिन बी या इंजेक्शनचा १० ते १५ जूनदरम्यान पुरवठा केला आहे. यातील ९६ इंजेक्शन शिल्लक असल्याची माहिती केंद्र शासनाच्या वतीने असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली आहे.