सावरकरांचा सन्मान असो की राष्ट्रहिताचा निर्णय त्यासाठी सावरकर स्मारक लढाई लढतच आहे यापुढेही लढणार आहे. पण सर्व समविचारी संस्था, व्यक्ती एकत्र येऊन अशी ताकद उभी राहिली पाहिजे जी समोरच्याला धडकी भरवेल. आज राष्ट्रहितासाठी ते अत्यंत आवश्यक आहे.
मंजिरी मराठे
स्वातंत्र्यवीर सावरकरांना सातत्याने बदनाम करण्याची मोहीम चालविणाऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारा लेख छापल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने ‘द विक’ चे व्यवस्थापन आणि स्वत:ला अभ्यासक, लेखक म्हणवणाऱ्या निरंजन टकले यांना कोर्टात खेचलं होतं. बऱ्याच वर्षांच्या न्यायालयातील लढयानंतर अखेर ‘द विक’च्या व्यवस्थापनला उपरती झाली. काही महिन्यांपूर्वी त्यांनी सावरकर स्मारकात येऊन स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ‘माफी’ मागण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि आता तसे जाहीरही केले आहे.
स्वत:च्या प्रसिद्धीसाठी, टीआरपीच्या गणितांसाठी, घाणेरड्या राजकारणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान देशभक्तावर, देशहितासाठी सारे आयुष्य वेचलेल्या एका भारतरत्नावर सतत चिखलफेक करणाऱ्या सर्वांनाच त्यामुळे पुन्हा एकदा चपराक बसली आहे. एबीपी माझा, एबीपी माध्यम समुहाने असाच आगाऊपणा केल्यानंतर त्यांनाही सावरकर स्मारकाने नाक घासायला लावल्यानंतर आता ‘द विक’ने ‘माफी’ मागितली आहे. ‘यह तो सिर्फ झांकी है, बहुत सारे बाकी है |’ सोनिया गांधी, राहुल गांधी, निरंजन टकले यांच्यावरील तक्रारी न्यायालयात प्रलंबित आहेतच. यापुढेही सावरकरांविरुध्द वावगा शब्द उच्चारण्याना असाच धडा शिकवला जाईल.
अर्थात हे यश स्मारकाचे असले तरी विजय सावरकर विचारांचा आहे. पण ही लढाई इथेच संपणार नाही. राजकारणात अडचणीत सापडल्यावर विरोधकांच्या हातातलं ते शस्त्र झालं आहे. ते शस्त्र जरी बोथट असलं तरी अशी बदनामी करणाऱ्यांच्या मागे पैशाचं पाठबळ आहे, राजकीय पाठबळ आहे. आपलं एकूणच दुर्दैव असं की कुठल्याही चुकीच्या मुद्यासाठी एकत्र येणाऱ्या विरोधी शक्तीचं संख्याबळ खूप मोठं आहे, त्यांची ताकद मोठी आहे. तात्विक चर्चा करणारे आपण मात्र कधी एकत्रही येत नाही आणि रस्त्यावरही उतरत नाही. आजच्या दुनियेत तुमचं अस्तित्व दाखवून द्यावं लागतं आणि तिथेच आपण राष्ट्रहित जपणारे हिंदू कमी पडतो.
सावरकरांनी ज्या संघटन कार्यासाठी आयुष्य वेचलं त्यांच्यासाठी संघटित होण्याशिवाय आता पर्याय नाही. सावरकरांनी कायमच उपयुक्ततावादाचा पुरस्कार केला. त्यामुळे ते म्हणाले असते, माझ्यासाठी संघटित झाला नाहीत तरी चालेल, या हिंदुराष्ट्राच्या भल्यासाठी तरी एकत्र या.
अर्थात स्वातंत्र्यवीरांचे विचार आजही देशाला तारून नेणारेच आहेत. त्यामुळेच स्वातंत्र्यवीरांच्या सन्मानासाठी आणि ज्या देशासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलं त्या आपल्या देशासाठी, राष्ट्रहितासाठी संघटित होऊ या. वंदेमातरम्!
(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सचिव आहेत.)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App