Prashant Kishor : प्रादेशिक नेत्यांचा “ट्रोजन हॉर्स” काँग्रेसने आत घेण्यापूर्वीच बाहेर हाकलला!!


2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी आणि प्रशांत किशोर या दोन स्वतंत्र विषयांच्या बातम्या अक्षरश: समसमान पातळीवरून प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे जणू काँग्रेसला स्वतःच्या रणनीती कौशल्याने नंबर 1 वर नेणार किंबहुना भारताची सत्ता नरेंद्र मोदी यांच्याकडून काबीज करून काँग्रेसला बहाल करणार अशी वातावरण निर्मिती प्रशांत किशोर प्रणित प्रसार माध्यमांनी चालवली होती. परंतु काँग्रेस अंतर्गत अशा काही घडामोडी घडल्या की प्रशांत किशोर यांना स्वतःलाच आपण काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे ट्विट करावे लागले.The “Trojan horse” of regional leaders was expelled by Congress before it was taken today

प्रशांत किशोरच्या ट्विट मधली भाषा अर्थात सभ्य सुसंस्कृत पण तितकीच राजकीय चतुराईने भरलेली आहे. काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची विनंती आपण विनम्रपणे नाकारतो. कारण काँग्रेसला माझ्यापेक्षा अधिक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि काँग्रेसला तळापासून आमूलाग्र बदलाची गरज आहे, अशा आशयाचे ट्विट प्रशांत किशोरने केले आहे. या ट्विटची भाषा आधी उल्लेख केल्याप्रमाणे अतिशय सभ्य, सुसंस्कृत आणि विनम्र अशीच आहे. पण त्यातले “बिटवीन द लाईन्स” वाचल्यानंतर सरळ – सरळ प्रशांत किशोर याला काँग्रेसची ऑफर “विशिष्ट जबाबदारी” घेऊन काँग्रेस पक्षाला जिंकून देण्याची होती आणि ती “जबाबदारी घेऊन जिंकून देणे”, ही ऑफर प्रशांत किशोरने नाकारली आहे हे स्पष्ट होते आहे…!! सरळ साध्या मराठी भाषेत बोलायचे झाले तर प्रशांत किशोरने “जबाबदारीचे” झेंगट गळ्यात पडण्यापूर्वीच झटकून टाकले आहे…!! किंबहुना काँग्रेसला जिंकवून देणे आपल्याला जमणार नाही अशी “नम्र” कबुली प्रशांत किशोरने या ट्विट मधून देऊन टाकली आहे…!! (ही अतिशय “कमावलेली नम्रता” आहे आणि ही आतापर्यंत फार थोड्या लोकांना जमलेली आहे…!! ममता – पवार यांच्यासारख्या नेत्यांबरोबर काम केल्याने अशी “नम्रता” कमावता येते…!!)

पण बरोबरच आहे, प्रशांत किशोर याचा 2014 पासून 2022 पर्यंतचा निवडणूक रणनीतीचा इतिहास पाहिला, तर मुळातच जिंकून येणार या नेत्या बरोबर आणि जिंकू शकणाऱ्या पक्षाबरोबर प्रशांत किशोरने “मदतनीसाची” भूमिका बजावून संबंधित पक्षाला जिंकून दिल्याचे दिसते. (याला गोंडस नाव “रणनीतीकार” असे आहे.)

प्रशांत किशोरने “जिंकून दिलेल्या”मध्ये ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, कॅप्टन अमरिंदरसिंग आदी आपापल्या राज्यांमध्ये ग्लॅमर असलेल्या नेत्यांचा समावेश होतो. पण याच प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची युती करूनही या युतीला त्यांना जिंकून देता आलेले नाही. ही फार जुनी निवडणूक नव्हे, तर 2017 ची निवडणूक होती. त्यामुळे प्रशांत किशोरने सरळ – सरळ काँग्रेसने दिलेली “जबाबदारीची ऑफर” झटकली आहे, ही यातली राजकीय वस्तुस्थिती आहे…!!

मात्र, प्रशांत किशोरकडे काहीतरी जादूची कांडी आहे. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होणार नाही म्हणजे त्या पक्षाचे आता काही खरे नाही. त्या पक्षाला 2024 मध्ये निवडणुकीत काही भवितव्य नाही, असे “राजकीय पांडित्य” काही प्रसार माध्यमे पाजळत आहेत. पण यात खरेच तथ्य किती हे तपासावे लागेल.

खरे तर काँग्रेस पक्ष 125 वर्षांपेक्षा जुना आणि सत्तेवर वर्षानुवर्षे खेळणारा पक्ष राहिला आहे. त्यात नक्की काही मोठ्या उणिवा शिरल्या आहेत. त्यावर “मोठे ऑपरेशन” करण्याचीही गरज आहे, यात कोणतीही शंका नाही. पण म्हणून “ऑपरेशन” करण्याची “क्षमता” असणारा “सर्जन” ही जी बिरूदावली प्रशांत किशोरला प्रसार माध्यमांनी लावली आहे ना ती मात्र तद्दन खोटी आहे…!!

कारण प्रशांत किशोरने आपल्या 600 पानांच्या प्रेझेंटेशन मध्ये ज्या सूचना केल्या होत्या ना, त्या सरळ – सरळ प्रादेशिक पक्षांची सुपारी घेऊन काँग्रेसमध्ये “ट्रोजन हॉर्स” सारखे शिरून काँग्रेसला पोखरणाऱ्या होत्या…!!

काय होत्या या सूचना…?? म्हणे, यूपीए चेअरपर्सन दुसऱ्या नेत्याला करावे. काँग्रेस सोनिया गांधींनी फक्त काँग्रेसचे अध्यक्ष राहावे. राहुल गांधींनी संसदीय पक्षाचे नेते व्हावे. प्रियंका गांधींनी सरचिटणीस व्हावे, वगैरे सूचना प्रशांत किशोरने केल्या होत्या. याचा उघड – उघड अर्थ असा की सोनिया गांधींनी स्वतःहून काँग्रेस पक्ष आजही संसदेतला सर्वात मोठा विरोधी पक्ष असला तरी छोट्या प्रादेशिक पक्षाच्या एखाद्या नेत्याकडे यूपीए चेअरपर्सन पद द्यावे… म्हणजे हे ममता बॅनर्जी अथवा शरद पवारांना द्यावे असेच त्यांना सुचवायचे होते…!! यालाच सरळ-सरळ प्रादेशिक पक्षांची सुपारी घेऊन काँग्रेस साठी काम करणे असे म्हणतात. अशा स्थितीत काँग्रेस पक्ष प्रशांत किशोरच्या कोणत्या अटी आणि का मान्य करेल…?? यातूनच प्रशांत किशोरचे आणि काँग्रेस यांच्यात फाटले असे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे आणि त्यात तथ्य जरूर आहे.

ममता – पवार यांना पंतप्रधान पदाचे धुमारे

स्वतः ममता बॅनर्जी शरद पवार आणि आता नव्याने केसीआर चंद्रशेखर राव यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले आहेत. यांचे पक्ष आपापल्या प्रदेशांत पुरते मर्यादित आहेत, तरीही त्या पक्षांच्या नेत्यांना यूपीएससी चेअरपर्सन करावे या सुचने मध्ये कोणते असे रॉकेट सायन्स दडले आहे की ज्यामुळे खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या बलाढ्य भाजपला काँग्रेस पक्ष आणि विरोधकांची आघाडी पराभूत करू शकेल…??

त्यामुळे एकूण राजकीय परिस्थिती पाहता प्रशांत किशोरने प्रादेशिक पक्षांची सुपारी घेऊन काँग्रेसला 600 पानांच्या प्रेझेंटेशनचा फार्मूला सुचवला होता, असे म्हणणे भाग आहे. आणि काँग्रेस हायकमांडने नेमका हाच “ट्रोजन हॉर्स” डाव ओळखून प्रशांत किशोरला एक प्रकारे “जबाबदारी” घेऊन जिंकून देण्याची ऑफर दिली आणि नेमकी ती “जबाबदारी” गळ्यात येतेय हे पाहताच प्रशांत किशोरचा “ट्रोजन हॉर्स” मागे फिरला आहे. कारण संपूर्णपणे पराभूत असलेल्या पक्षाला विजयी करण्याचे कौशल्य प्रशांत किशोर कडे अजिबात नाही, ही यातली राजकीय वस्तुस्थिती आहे…!! बाकी माध्यमांचे “प्रशांत किशोरी” डांगोरे पिटणे अजून काही दिवस चालू राहणार आहे…!!

The “Trojan horse” of regional leaders was expelled by Congress before it was taken today

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”