पोस्टर वरचे मुख्यमंत्री ट्विटर वर आले पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या “मनातले मुख्यमंत्री” का नाही होऊ शकले??, असा सवाल विचारण्याची वेळ आज लागलेल्या पोस्टर्स आणि ट्विटरमुळे आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान “वर्षा” परिसरामध्ये अजितदादांची “भावी मुख्यमंत्री” अशी पोस्टर्स लागली आणि आताच त्यांनी ट्विटरवर मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली!! म्हणजे अमोल मिटकरी यांनी तसे सदिच्छा दर्शक ट्विट केले आहे.The “Future Chief Minister” on the poster came on Twitter, but why could he not become the “Chief Minister of Mind” in real sense??
पण अजितदादांच्या भावी मुख्यमंत्रीपदाची पोस्टर्स तर राष्ट्रवादी भवन समोर काही महिन्यांपूर्वी देखील लागली होती, पण अजितदादांची पोस्टर्स लागल्याबरोबर तिथेच खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचीही भावी मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स देखील लागली. नंतरच्या काळात बारामतीच्या कऱ्हेपासून ते नाशिकच्या गोदावरी पर्यंत आणि कोल्हापूरच्या पंचगंगेपर्यंत अनेक नद्यांमधून बरेच राजकीय पाणी वाहून गेले आणि अजितदादा हे शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. सत्तेचा वाटा मिळवण्यासाठी अजितदादांना भाजपची वळचण पकडावी लागली.
आज जेव्हा अजितदादा आपला वाढदिवस साजरा करत आहेत, त्यावेळी हे पोस्टर वरचे “भावी मुख्यमंत्री” ट्विटरवर आले आहेत आणि ते नुसते ट्विटरवर आले नसून अजित अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…, असे ट्विट आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. पण प्रश्न हा आहे, की नुसती पोस्टर्स छापून आणि ट्विटरवर शपथ घेऊन मुख्यमंत्री होता येते का?? आणि मुख्यमंत्रीच व्हायचे असते तर जनतेने त्यांना आधीच कौल देऊन मुख्यमंत्री केले नसते का??
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
पवारांना शालजोडीतले
वास्तविक स्वतः अजितदादांनीच राष्ट्रवादीतल्या फुटी पूर्वी हा प्रश्न षण्मुखानंद हॉलमध्ये अखंड राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केला होता. त्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाची एकीकडे स्तुती करताना दुसरीकडे शालजोडीतले देखील हाणले होते. शरद पवार हे ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नवीन पटनाईक, करुणानिधी, जयललिता आदी नेत्यांपेक्षा उजवे म्हणजे अधिक कर्तृत्ववान नेते आहेत. त्यांच्या पंतप्रधान पदाचे सोडा, पण आपण कार्यकर्ते म्हणून पवार साहेबांना कधी राष्ट्रवादीचे बहुमत आणून देऊ शकलो का??, असा सवाल केला होता. आता हाच सवाल अजितदादांना लागू होतो की नाही??
सत्तेसाठी भाजपची वळचण
अजितदादा आज भाजपच्या वळचणीला येऊन उपमुख्यमंत्री झाले आहेत. आत्तापर्यंत ते जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा ते मंत्रिमंडळातल्या दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. पृथ्वीराज चव्हाण ते उद्धव ठाकरे या सर्व मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत ते उपमुख्यमंत्री झाले. पण शिंदे – फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यावर ते दुसऱ्या नव्हे, तर तिसऱ्या क्रमांकाचे नेते झाले आहेत आणि तरी देखील अजितदादांची पोस्टर्स “भावी मुख्यमंत्री” म्हणून वर्षा बंगल्याच्या भोवती लागली आहेतच, आणि अमोल मिटकरी यांच्या ट्विटरवर अजित अनंतराव पवार मुख्यमंत्री शपथ घेतील, असा आशावाद दाखवला आहे.
प्रतापराव भोसलेंची आठवण
या संदर्भात एक जुनी आठवण सहज झाली. ती काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष (कै.) प्रतापराव भोसले यांची आहे. प्रतापराव भोसले शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेविषयी दूरदर्शनशी बोलताना म्हणाले होते, की कोणीही महत्त्वाकांक्षा बाळगाला हरकत नाही. पण दुसऱ्या कोणी पुढे येऊन तुम्ही पंतप्रधान व्हा, असे म्हणायला नको का??, तसे कोणी पवारांना म्हटले आहे का?? असा बोचरा सवाल प्रतापराव भोसले यांनी केला होता. त्यावेळी काँग्रेस अखंड होती. पवार काँग्रेसचे महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते होते. पण प्रतापरावांच्या सवालाला त्यांनी त्यावेळी उत्तर दिले नव्हते. किंबहुना ते उत्तर देऊ शकले नव्हते.
आजही अजितदादांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना फक्त त्यांच्याच निवडक समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची पोस्टर्स लावली आहेत. अमोल मिटकरी यांनी त्यापुढे जाऊन आपण अजितदादांच्या जास्त जवळचे समर्थक आहोत असे दाखवत अजितदादा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे ट्वीट केले आहे.
वास्तव वेगळेच
अशा राजकीय कृती केल्याने अजितदादांचे समर्थक सुखावतील. पण वास्तवात ते अजितदादांना मुख्यमंत्री करू शकतील का?? हा मूलभूत प्रश्न आहे. अजितदादा आज फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्याच मनातले मुख्यमंत्री आहेत. कारण ते खऱ्या अर्थाने “जनतेच्या मनातले मुख्यमंत्री” असते, तर महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्ण बहुमत देऊन अजितदादांनाच काय राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वांच्या मनात असलेल्या नेत्याला केव्हाच मुख्यमंत्री केले असते. पण तसे घडले का??
राष्ट्रवादी काँग्रेस आता 25 वर्षांचा पक्ष झाली आहे. या 25 वर्षांत अखंड राष्ट्रवादीला एकदा तरी बहुमताच्या जवळ जाणे सोडाच, पण आमदारांची 75 तरी गाठ आली आहे का?? आणि तरी देखील पक्ष नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षांची “उसळणी” आणि उजळणी मुख्यमंत्रीपदाची राहिली आहे. खुद्द अजितदादांनी ती बोलून दाखविली आहे.
आपल्याला मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान व्हायचे आहे असे बोलून कोणी मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान होतो, असा भारतीय राजकारणातला अनुभव आहे का??
आणि कोणी मुख्यमंत्री झालेच तर ते आधी आपली मुख्यमंत्री पदाची उमेदवारी जाहीर करून जनतेला उघडपणे सामोरे जाऊन जनतेचा भरघोस पाठिंबा पूर्ण बहुमतानीशी मिळवून झाले आहेत. दक्षिणेतल्या राज्यांमध्ये तसेच ओडिशात नवीन पटनाईक यांची तशी उदाहरणे आहेत.
अखंड राष्ट्रवादीला जे जमले नाही, ते फुटीर राष्ट्रवादीला जमेल का?? हा त्या पुढचा प्रश्न आहे. कदाचित ते जमणार नाही आणि जमलेच तर ते भाजपच्या वळचणीला जाऊन जमेल असे अजितदादांना वाटते आहे का?? आणि मूळात अजितदादांना मुख्यमंत्री करणे ही भाजपची जबाबदारी आहे का?? हा त्यापलीकडचा सर्वांत मोठा कळीचा सवाल आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App