वृत्तसंस्था
मुंबई : आधी कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडवरून विधिमंडळात राणा भीमदेवी थाटाची भाषणे… त्यानंतरच्या १२ तासांत उच्च न्यायालयात लेखी माघार… त्यानंतरच्या १२ तासांत उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्रस्ताळ्या प्रतिक्रिया… आणि आता संपूर्ण माघार घेत मेट्रो कारशेडसाठी वांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्समधील जागेची चाचपणी… ती जागाही बुलेट ट्रेनच्या कामासाठी प्रस्तावित असलेली… ठाकरे – पवार सरकारचा हा “माघार प्रवास” दिसतोय. thackeray -pawar govt shifting metro carshed
मेट्रो ३ च्या कारशेडसाठी ठाकरे – पवार सरकार आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जागेची चाचपणी करत असल्याचे समजतेय. आरेमधून कारशेडची जागा हट्टाने कांजूरमार्गच्या मिठागराच्या जागेवर गेल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. मेट्रो कारशेडच्या जागेवर काम करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यापूर्वी ठाकरे – पवार सरकारने लेखी माघार घेतली. thackeray -pawar govt shifting metro carshed
आता कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो ३ चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे, असे उच्चपदस्थ सूत्रांकडून समजते आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
मेट्रोचा हा प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असून यामुळे शहर व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन नागरिकांना सुविधा मिळणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र राज्यात ठाकरे – पवार सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आग्रहातून त्या निर्णयाला स्थगिती देऊन कारशेडची कांजूरमार्गला बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, हे प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने कांजूर येथील कामाला स्थगिती दिली. परवाच पार पडलेल्या अधिवेशनातही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फक्त अहंकारातून मेट्रो कारशेडची जागा ही आरेतून कांजूरमार्गला वर्ग करण्यात आली असा आरोप केला होता. त्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आक्रमक भाषेत उत्तर दिले होते. खासदार संजय राऊत यांनी देखील न्यायालयाच्या निर्णयावर राजकीय शेरेबाजी केली होती.
पण आता कांजूरमार्गच्या मिठागराच्या जागेवर मेट्रो कारशेड होणे शक्य नाही हे दिसू लागल्यावर कारशेड परत आरेमध्ये नेणे ही राजकीय माघार लोकांच्या थेट डोळ्यावर येईल. यात शिवसेनेचे राजकीय नुकसान होईल, हे लक्षात आल्यावर कारशेडसाठी शांतपणे नव्या जागेचा म्हणजे वांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्समधील जागेचा शोध घेऊन त्याची चाचपणी सुरू असल्याचे समजते. त्यातही आता मेट्रो कारशेडसाठी बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित असलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जागेचा विचार होतो आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळते आहे.
न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला वेळ लागू शकतो. तोपर्यंत कारशेड उभारण्यास विलंब लागू नये म्हणून ठाकरे – पवार सरकारकडून पर्यायी जागेची चाचपणी सुरु झाल्याचे समजते आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App