विशेष प्रतिनिधी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. च्या हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आणि एज्युकेशनल कॅम्पसची पायाभरणी आणि कोनशिला अनावरण संपन्न झाले. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यात विकासाची पेरणी झाली.Sowing development in Naxal-affected Gadchiroli; Health revolution along with industry, education and employment!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सिरोंच्यामध्ये 350 खाटांचे आधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे काम रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. करत आहे, ही गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बाब आहे. पुण्यातील नामांकित आणि उच्च तांत्रिक सुविधा असलेल्या रुबी हॉल क्लिनिकचा अनुभव आता सिरोंचा येथे उपलब्ध होणार आहे. नागपूर, पुणे आणि मुंबईसारखी दर्जेदार मल्टीस्पेशालिटी उपचार सुविधा आता या भागातील नागरिकांना मिळेल. तसेच शेजारील राज्यांतील रुग्ण देखील उपचारासाठी येथे येऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.
राज्यातील प्रत्येक नागरिकाला महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ₹5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, सध्या 2400 आजारांवर मोफत उपचार देत आहोत. हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित झाल्यावर महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आयुष्मान भारत योजना तसेच इतर कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या आरोग्य योजना येथे लागू होतील. त्यामुळे या परिसरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
– अहेरीत स्त्री आणि बाल रुग्णालयाचे उद्घाटन
गडचिरोलीच्या अहेरी येथे आज स्त्री आणि बाल रुग्णालयाचेसुद्धा उदघाटन होत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवा व्यवस्थेत आजचा दिवस एक क्रांती आणणारा दिवस आहे. गडचिरोलीमध्ये हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज तसेच पहिली ते बारावीपर्यंतची शैक्षणिक सुविधा असलेले शैक्षणिक संकुल उभारले जाणार आहे. विशेषतः नर्सिंग कॉलेजमुळे ग्रामीण भागातील मुलींना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
गडचिरोलीच्या विकासाचे चित्र आज बदलत आहे. लॉयड्सद्वारे काली अम्माल हॉस्पिटल सुरु झाले असून तिथेही मल्टीस्पेशालिटी सेवा उपलब्ध होत आहेत. अलीकडेच ₹500 कोटींचे नवे रस्ते जिल्ह्यासाठी मंजूर केले आहेत व त्यांची कामे देखील आपण सुरु करत आहोत. पायाभूत सुविधांच्या प्रगतीबरोबरच गडचिरोली देशातील स्टील हब बनत आहे. तसेच वन संवर्धनासाठी 5 कोटी झाडे लावण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी 40 लाख झाडे लावली आहेत. विकास हा जल, जंगल आणि जमीन यांचे संवर्धन करून आपल्याला करायचा आहे. गडचिरोलीची ओळख ‘ग्रीन स्टील हब’ अशी असणार आहे, ज्या ठिकाणी कोणतेही प्रदूषण होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याच्या दुर्गम भागांना सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होण्यासाठी ‘स्टारलिंक’ कंपनीसोबत शासनाने करार केला आहे. यामुळे आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि मूलभूत सुविधा दुर्गम भागातील जिल्ह्यांपर्यंत पोहोचतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि.चे संचालक राणा सूर्यवंशी आणि डॉ. परवेझ ग्रांट आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App