तिसऱ्या आघाडीतून काँग्रेसला वगळून पवार स्वतःचे नेतृत्व दिल्लीत स्थापित करताहेत की मोदींच्या नेतृत्वालाच बळ देताहेत…??


नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रणनीतीकार प्रशांत किशोरांच्या मदतीने तिसऱ्या आघाडीची मोट बांधताहेत. पण यातून ते काँग्रेसला वगळून स्वतःचे नेतृत्व दिल्लीत स्थापित करताहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वालाच अप्रत्यक्ष बळ देण्याचे काम करताहेत… हा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे.sharad pawar Rashtra manch will it be proved in favour of narendra modi or damaging congress??

सर्व विरोधी पक्षांची मोदींविरोधात मोट बांधण्याची पवारांची महत्त्वाकांक्षा कितीही वाखाणण्यासारखी असली, आणि त्या महत्त्वाकांक्षेला मराठी पत्रकारांनी कितीही हवा दिलेली असली, तरी पवारांनी आघाडीतून काँग्रेसला वगळून आपल्या राष्ट्रमंचाची राजकीय ताकद स्वतःहून मर्यादित करून ठेवली आहे. देशव्यापी पसरलेल्या काँग्रेसला वगळून कोणतीही आघाडी कधीही राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाल्याचा गेल्या ७० वर्षांमधला इतिहास नाही. जनता पक्षापासून अगदी विश्वनाथ प्रताप सिंगांचा ते उत्तर प्रदेशातील असूनही जनमोर्चा देखील मर्यादेबाहेर यशस्वी झाल्याचे उदाहरण नाही. अशा स्थितीत शरद पवार सगळ्या सिंगल डिजिट पक्षांना एकत्र आणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपला आव्हान निर्माण करणार ही बातमी वरवर पाहता कितीही आकर्षक वाटली तरी राजकीयदृष्ट्या ती परिणामकारक नाही ही वस्तुस्थिती आहे.

ज्या १५ पक्षांच्या प्रतिनिधींना उद्याच्या राष्ट्रमंचाच्या बैठकीला बोलावले आहे, त्या पक्षांची नुसती नावे जरी पाहिली तरी त्यांचा देशाच्या राजकीय मंचावरचा राजकीय वकूब लक्षात येतो. राजद, तृणमूळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगु देसम, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमूक, वायएसआर काँग्रेस आदी पक्षांची ताकद नुसतीच मर्यादित नाही, तर ती लोकसभेपुरती बोलायची झाली, तर सिंगल डिजिट पक्षांची आहे. त्यांचे लोकसभेतले बळ अतिशय मर्यादित राहिलेले आहे. याला फारतर तृणमूळचा अपवाद म्हणता येईल की जो वाजपेयींचा काळ वगळला तर कायम भाजपच्या विरोधात राहिलेला आहे आणि लोकसभेत डबल डिजिट जागा मिळवत राहिलेला आहे. बाकीच्या पक्षांच्या मूळ भूमिकांविषयीच संदिग्धता आहे.

शिवाय उद्या पवारांनी बोलावलेल्या बैठकीला १५ पैकी नेमके किती पक्षांचे प्रतिनिधी हजर राहणार हे देखील महत्त्वाचे आहे. यापैकी काही पक्ष हे एकदा पवारांच्या राष्ट्रमंचाच्या बैठकीला हजर राहून नंतर एनडीए किंवा यूपीएच्या दिशेने जाऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रमंचाच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागू शकते ही राजकीय वस्तुस्थिती आहे. अगदी नेमक्या शब्दांमध्ये बोलायचे झाले, तर ज्या राष्ट्रमंचाचे शरद पवार हे संयोजक होऊ इच्छितात, त्या पवारांचीच भूमिका संदिग्ध किंबहुना अविश्वासार्ह राहिलेली आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीच्या बातम्या जोरदार येतील. मराठी माध्यमांमध्ये तर जणू काही आता पंतप्रधान मोदींना पायउतार व्हावेच लागणार असे वातावरण निर्मिती करणाऱ्या बातम्या दिल्या जातील. पण प्रत्यक्षात या सिंगल डिजिट पक्षांचा मोदींवर किती परिणाम होईल, हे सांगायला ज्योतिषाची गरज लागणार नाही.



राष्ट्रमंचाच्या व्यासपीठावर भले मोदी सरकारविरोधातील घोषणा मोठ्या अक्षरांमध्ये लिहिली असेल, तिचा हेतू काँग्रेसला राजकीय अडथळा निर्माण करण्याचाच राहणार आहे हे उघड आहे. राष्ट्रमंचाच्या बैठकीला हजर राहणाऱ्या किंवा न राहणाऱ्या पक्षांची भूमिका भाजपविषयी संदिग्ध राहिली असेल, पण त्यांचा काँग्रेस विरोध पक्का आणि ठळक आहे. १५ प्रादेशिक पक्षांपैकी बहुतेकांच्या राज्यांमध्ये ते काँग्रेसचा पराभव करून सत्तेवर आले आहेत. काँग्रेस विरोध ही त्यांची राजकीय गरज आहे. हे विसरून चालणार नाही.

येथेही शरद पवार हे अन्य प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांपेक्षा अपवाद राहिले आहेत. त्यांना ठामपणे काँग्रेस विरोधकही मानता येत नाही आणि भाजप विरोधकही…

अशा बेभरवशी पवारांच्या भरवशावर राष्ट्रमंच उभा राहतोय…मग तो मोदींना परिणामकारक विरोध करणारा राहील की काँग्रेसला… याचे उत्तर पवारांना माहिती आहे… पण ते देणार नाहीत…!! ते त्यांच्या नादी लागणाऱ्या प्रादेशिक पक्षांना मिळवावे लागेल… पण तो पर्यंत उशीर झाला नाही म्हणजे मिळवलीन…!!

sharad pawar Rashtra manch will it be proved in favour of narendra modi or damaging congress??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात