अजितदादांचा त्यांचेच समर्थक पुरता “पवार” करणार; कसे ते वाचा!!


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांचेच समर्थक पुरता “पवार” करणार!!, असे म्हणायची वेळ त्यांच्याच समर्थकांनी आणली आहे. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला त्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावली आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली पुन्हा एकदा सुरू झाली.Political ambitions of sharad pawar and ajit pawar will remain unfulfilled forever!!

वास्तविक अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा नवी नाही. अजितदादा हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते, तेव्हापासून त्यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायची महत्त्वाकांक्षा होती आणि आजही आहे. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी ती अखंड राष्ट्रवादीत बोलूनही दाखवली होती. पण दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातल्या सर्व नद्यांमधून खूप मोठे राजकीय पाणी वाहून गेले आणि ते मुंबईतल्या नव्हे, तर “दिल्लीच्या महासमुद्राला” मिळाले!! राष्ट्रवादी फुटली. राष्ट्रवादीतल्या आमदारांनी “त्यांच्या नैसर्गिक न्यायानुसार” अजितदादांच्या राष्ट्रवादीला कौल दिला आणि ते महाराष्ट्राच्या विकासासाठी अजितदादांबरोबर भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसले. पण म्हणून अजितदादांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा शमली नाही. पण असे म्हणण्यापेक्षा अजितदादा समर्थकांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा शमली नाही, असे म्हणावे लागेल. कारण अजितदादांच्या समर्थकांनी त्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावली आणि त्यांच्या आमदारांनी अजितदादा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे ट्विट केले. भाजपची पॉलिटिकल कमिटमेंट

हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेला आहे शेवटी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि महाराष्ट्रातले मंत्री गिरीश महाजन यांना सूचक इशारा द्यावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आले आणि पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणारे ट्विट मराठीत केले. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहतील ही बाब अधोरेखित झाली. तसेही भाजप विश्वासार्हतेच्या उणिवेचे राजकारण करत नाही. उद्धव ठाकरेंनी मोठा एपिसोड घडवून देखील भाजपने आपली मूळ भूमिका सोडली नाही. कारण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांची करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे शिवसेना उभी फुटली आणि त्यानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. एकदा मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांना वर्षभरातच बाजूला करणे हे भाजपच्या “पोलिटिकल कमिटमेंट” मध्ये बसणारे नाही. त्यामुळे भाजपची कमिटमेंट आणि अजितदादांचे महत्त्वाकांक्षा या मधला हा “पोलिटिकल क्लॅश” आहे.

पण त्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने अधोरेखित होतो, तो म्हणजे भाजप अजितदादांना मुख्यमंत्री करणे ही भाजपची जबाबदारी आहे का?? यावर सविस्तर विवेचन झाले आहे आणि ती भाजपची मूळातच जबाबदारी नाही, हे देखील स्पष्ट आहे.

 पवारांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा

पण त्याही पलीकडे एक मुद्दा आहे, तो म्हणजे अजितदादांचा त्यांचेच समर्थक पुरता “पवार” करणार हा आहे. शरद पवारांना त्यांच्या समर्थकांनी नेहमीच “उच्च स्थानी” पाहिले. पवार हे केवळ पंतप्रधान व्हायचे राहिले आहेत किंबहुना पवारांनी पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगून 30 वर्षे उलटून गेली, तरी देखील ते कायम “भावी पंतप्रधान” राहिले आणि त्यांच्या समर्थकांचे हे स्वप्न आजही अपुरेच राहिले आहे. पण या स्वप्नाची पवार समर्थक नेहमी आठवण करून देत असतात. अगदी प्रफुल्ल पटेल, कै. राहुल कुमार बजाज वगैरे अति वरिष्ठांनी देखील पवारांना पंतप्रधान पदाची स्वप्ने दाखवली आणि त्या वारंवार बोलूनही दाखवली. त्यामुळे पवारांची पोस्टर्स संपूर्ण महाराष्ट्रभर भावी पंतप्रधान म्हणून लटकली. पण पवारांच्या पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा हा दिल्लीच्या राजकारणात नंतर खिल्लीचा विषय ठरला. कारण पवारांच्या पिढीतले अनेक जण पंतप्रधान होऊन गेले पण पवार तिथेच राहिले!!

 

इतकेच नाही तर पवारांपेक्षा 10 वर्षांनी लहान असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊन 9 वर्षे उलटली. 2024 मध्ये जनतेचा कौल मिळवून ते तिसरी टर्म पंतप्रधान होऊ शकतात, अशी अवस्था आहे, तरी पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जसेच्या तसे कायम आहे आणि त्यांचे समर्थक आजही पवारांना भावी पंतप्रधान म्हणून पोस्टर्स वर लटकवत आहेत.

पोस्टरवर लिहून किंवा नुसती मनात महत्त्वाकांक्षा बाळगून पंतप्रधान होता येत नाही तसेच मुख्यमंत्रीही होता येत नाही, याची पक्की जाणीव अनुक्रमे शरद पवारांनी अजित पवारांना आहे. तरी देखील आपल्या समर्थकांचा हुरूप टिकवण्यासाठी ते पंतप्रधान पदाची आणि मुख्यमंत्री पदाची चर्चा घडू देतात. पण पण या चर्चेनेही आता मर्यादा ओलांडली आहे. तिचा अतिरेक होऊन अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा हा पवारांच्या पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षे सारखाच राजकीय खिल्लीचा विषय ठरतो आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य दोष

शिवाय या दोन्ही नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांमध्ये फार मोठा राजकीय अयब म्हणजे दोष आहे, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेचा संपूर्ण कौल कधी मिळू शकलेला नाही. तेवढे राजकीय कर्तृत्व महाराष्ट्रात शरद पवारांना कधी दाखवता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कायम सत्तेच्या वळचणीला राहावे लागणे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा स्वभाव बनला आहे.

आणि सत्तेच्या वळचणीला राहणारा माणूस कधीही सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर बसू शकत नाही हा राजकारणातला निसर्गाचा न्याय आहे!!

त्यामुळे पवार दिल्लीच्या मर्जीने केंद्रीय मंत्री अथवा मुख्यमंत्री झाले आणि आज अजितदादा देखील दिल्लीच्याच मर्जीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेत. यापलीकडे अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेविषयी फारसे “बिटवीन द लाईन्स” काही नाही!!… तरी देखील त्यांचे समर्थक उद्याही आशेने अजितदादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावत राहतील आणि अजितदादा हे शरद पवारांसारखेच यापुढील काळात राजकीय खिल्लीचा विषय बनत राहतील हीच दाट शक्यता आहे.

 अजितदादा भाजपच्या वळचणीला का गेले?

पण मूळात अजितदादा हे मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेलेत का?? हा खरा सवाल आहे. कारण त्यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर असणाऱ्या ईडी केसेस, त्यांचा आवळत चाललेला फास यांनी ते अस्वस्थ होते. देवगिरी बंगल्यातून निघणारी वाट आर्थर रोड कडे जाणारी होती आणि त्या भीतीनेच अजितदादा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले, असे त्यांच्याच गोटात गेलेल्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे राजकीय गुलदस्त्यात राहिलेले नाही.

आर्थर रोड कडे जाणारी वाट

त्यामुळे अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा भाजपने पूर्ण करणे तर दूरच, त्यांची वाट देवगिरी बंगल्याकडून निघून आर्थर रोड कडे गेली नाही, म्हणजे मिळवले!! तेवढेच अजितदादांसाठी पुरेसे आहे. त्या पलीकडे काही नाही!!… पण तरी देखील अजितदादांचे समर्थक यांची भावी मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स लावत राहतील आणि त्यातूनच ते अजितदादांचा पुरता “पवार” करतील, हे मात्र निश्चित!!… पवारांना त्यांच्या समर्थकांनी “कायम भावी पंतप्रधान” केले. अजितदादांना त्यांचे समर्थक “कायम भावी मुख्यमंत्री” करत राहतील… या अर्थाने अजितदादांचा त्यांचे समर्थक पुरता “पवार” करतील!!, हे मात्र निश्चित!!

Political ambitions of sharad pawar and ajit pawar will remain unfulfilled forever!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात