पवारांच्या घरात दोन आमदार आणि तीन खासदार, तरीही राष्ट्रवादी अस्वस्थ आणि बेजार!!

Pawar family

नाशिक : पवारांच्या घरात दोन आमदार आणि तीन खासदार, तरीही राष्ट्रवादी अस्वस्थ आणि बेजार!!, हीच राजकीय वस्तुस्थिती आज महाराष्ट्रासमोर आहे. कारण पवारांच्या घरात दोन आमदार आणि तीन खासदार असले तरी त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रवादीची खरी राजकीय सूत्रे आज कुठल्याच पवारांच्या हातात खऱ्या अर्थाने उरलेली नाही त्या सूत्रांमध्ये एक तर भाजपने आणि दुसरा त्यांच्याच राष्ट्रवादीतल्या भाजपला अनुकूल असलेल्या नेत्यांनी पक्का शिरकाव केलाय.Pawar family remains only people’s representative, but without owning self power

राष्ट्रवादीची खरी राजकीय सूत्रे आज भाजपच्या हातात आहेत. कारण शरद पवारांना वाटत असलेल्या दर्पानुसार राष्ट्रवादीचे प्राण सत्तेच्या पोपटात आहेत, पण तो पोपट भाजपच्या मालकीचा आहे आणि तो भाजपच्या पिंजऱ्यात अडकलाय. म्हणून तर रोहित पवारांसारखे पवारांच्या घरातले आमदार रोज तडफडून पत्रकार परिषदा घेताहेत, अजित पवारांच्या अपघाताबद्दल FIR नोंदवायला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जातायेत, पण त्यांची कुणी दाखल घेताना दिसत नाही.



– राष्ट्रवादीच्या नाड्या भाजपच्या हातात

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सूत्रे सुद्धा अशीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातात आहेत आणि या दोन्ही नेत्यांची राजकीय सूत्रे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या हातात आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री असून सुद्धा त्यांना अगदी “पवार बुद्धीने” सुद्धा चालता येत नाही आणि कुठली राजकीय कृती करता येईनाशी झाली आहे.

– सगळे भाजपच्याच परवानगीने

सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पार्थ पवारची राज्यसभेवर वर्णी जरूर लावली, पण त्यासाठी त्यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांची परवानगी घ्यावी लागली. शरद पवारांना महाविकास आघाडीने राज्यसभेची उमेदवारी जरूर दिली, पण त्यासाठी त्यांना सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांना काँग्रेसच्या नेत्यांच्या दारात आणि मातोश्रीच्या दारात पाठवावे लागले. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अगदी शेवटच्या दिवशी शरद पवारांची उमेदवारी मंजूर केली, म्हणूनच ते महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार बनू शकले.

– पवारांच्या चाणक्यगिरीचे ढोल

एरवी शरद पवार बोले आणि महाराष्ट्राचे राजकारण हाले अशी राजकीय स्थिती काही वर्षे होती. त्यातही मराठी माध्यमांनी शरद पवारांच्या चाणक्यगिरीचे एवढे ढोल पिटले होते, की त्यांचे नसलेले कर्तृत्व सुद्धा चाणक्यगिरीच्या नावाखाली मराठी माध्यमे उजळून दाखवत होती. पण एकेकाळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या शरद पवारांना काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या नाकदुऱ्या काढून राज्यसभेचा उमेदवार व्हावे लागले. त्यासाठी सुद्धा त्यांच्या गटनेत्यांना भाजपच्या अदृश्य शक्तीच्या मागल्या दारांनी हालचाली कराव्या लागल्या. भाजपच्या अदृश्य शक्तीच्या दबावामुळेच काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी “बहाल” केली. अन्यथा भाजपच्या अदृश्य शक्तीने त्यांना दुसऱ्या नंबरची मते देऊन राज्यसभेवर पाठविले असते ही भीती काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना वाटली. याचा अर्थच शरद पवारांना स्वतःची राज्यसभा सीट टिकवण्यासाठी एकाच वेळी भाजपला डोळा मारावा लागला आणि त्याचवेळी आपण महाविकास आघाडीचे नेते आहोत, असे दाखवावे लागले.

– विलीनीकरणाची वातावरण निर्मिती फोल

एवढे करूनही राष्ट्रवादीची सूत्रे आज खऱ्या अर्थाने पवार कुटुंबीयांच्या हातात आहेत, अशी राजकीय स्थिती बिलकुल नाही. उलट अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या गटाने विलीनीकरणासाठी जंग जंग पछाडले. त्यांच्या गटातल्या नेत्यांनी रोज पत्रकार परिषदांचा रतीब घातला. “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी विलीनीकरणासाठी मोठी वातावरण निर्मिती केली, पण भाजपच्या नेत्यांच्या दबावाखाली सुनेत्रा पवार आणि अगदी शरद पवार सुद्धा विलीनीकरणाचा निर्णय घेऊ शकले नाहीत. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण भाजपच्या दबावामुळे टाळायचे ते टळलेच. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना चांडाळ चौकडी ठरवून पवार कुटुंबीय दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण घडवून आणू शकले नाहीत.

– रोहित पवारांच्या पत्रकार परिषदा फोल

रोहित पवार सुद्धा रोज पत्रकार परिषदा घेऊन अजित पवारांच्या अपघाता संदर्भात भाजपच्या केंद्रीय नेत्यांना वाकवू शकले नाहीत, पण त्या पलीकडे जाऊन भाजपच्या सत्तेतला तुकडा सुद्धा मिळू शकले नाहीत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकी संदर्भात सुप्रीम कोर्टाने हाणलेली चपराक रोहित पवारांना चांगलाच दणका देऊन गेली. त्यांना अजूनही क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर पवारांना हवा तसा तोडगा काढता आलेला नाही.

– नुसत्याच आमदारक्या आणि खासदारक्या

वर उल्लेख केलेल्या सगळ्या बाबी केव्हा घडल्या?, तर शरद पवारांच्या घरात दोघांची आमदारकी आणि तिघांची खासदारकी असताना घडल्या. पण नुसती खासदारकी आणि आमदारकी असून उपयोग नाही. त्यासाठी खरी राजकीय सूत्रे आपल्या मतानुसार आणि मनानुसार हलवण्यासाठी खरे बळ लागते. ते बळ आता कुठल्याच पवारांकडे उरलेले नाही. म्हणून त्यांच्या राष्ट्रवादीतले नेते प्रचंड अस्वस्थ आणि बेजार आहेत.

Pawar family remains only people’s representative, but without owning self power

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात