भारतीय आर्थिक सुधारणांचे भीष्मपितामह माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दीची आज २८ जून २०२१ रोजी सांगता. राव साहेबांचे पुण्याशी अनोखे नाते होते. हे नाते उलगडणाच्या हा अल्पमती प्रयत्न…!! P. V. Narasimha Rao`s relationship with cultral city of Pune
दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव हे भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक या नात्याने नावाजलेले असले, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक हळवा पैलू होता. मनाच्या त्या कोपऱ्यात त्यांनी आपली शिक्षणभूमी पुण्याशी आपले नाते जपून ठेवले होते. नरसिंह रावांच्या चरित्रकारांनी हे लिहिले आहेच, पण त्यांचे खासगी सचिव राम खांडेकर यांनी लिहिलेल्या आठवणींमधून देखील प्रतिबिंबित झाले आहे. P. V. Narasimha Rao`s relationship with cultral city of Pune
पण नरसिंह रावांच्या खास पुण्यातल्या आठवणी खुद्द त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळालेल्या निवडक भाग्यवानांमध्ये मी एक आहे. केसरीत मुख्य उपसंपादकपदावर कार्यरत असताना नरसिंह राव यांना भेटण्याची संधी मला त्यावेळचे संपादक अरविंद व्यं. गोखले आणि मुख्य उपसंपादक अभय कुलकर्णी यांनी दिली.
राव साहेब २००३ मध्ये कराडच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आले होते. त्यांचे भाषण ऐकण्याची संधी तर मला आणि माझे सहकारी प्रदीप कुलकर्णी यांना मिळालीच. पण त्यानंतर राव साहेब हे पुण्याला ज्येष्ठ नेते मोहन धारिया यांच्याकडे आले होते. तेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायची आणि पुण्यातल्या त्यांच्या रम्य आठवणी ऐकण्याची संधी मिळाली.
राव साहेब त्या दिवशी प्रसन्नचित्त होते. लखुभाई पाठक आणि चंद्रास्वामी केसेसमधून सुटका झाली होती. आणि राजकारणापलिकडचे नरसिंह राव आम्हा मोजक्या मंडळींना अनुभवायला मिळात होते. सकाळचे मुख्य वार्ताहर राजीव साबडे हे देखील गप्पांमध्ये सहभागी झाले होते.
राव साहेब राजकारणाची चर्चा करण्याच्या मूडमध्ये त्या दिवशी नव्हतेच. पण तेवढ्यात पुण्यातल्या एका नाणावलेल्या बिल्डरने त्यांना आर्थिक सुधारणेबद्दल इंग्रजीत प्रश्न विचारला आणि ते काहीसे नाराज झाले. त्यांनी त्या बिल्डरला दोन ती वाक्यांमध्ये उत्तर देऊन उडवून लावले. पण या प्रश्नामुळे वातावरणात थोडा तणाव आला होता. मला त्यावेळी प्रश्न विचारायचे धाडस झाले नाही. पण मी धैर्य एकवटून त्यांना प्रश्न विचारलाच… खरं म्हणजे तो प्रश्न नव्हता, तर आपण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होतात. त्या वेळच्या काही आठवणी आम्हाला सांगा ना, अशी ती विनंती होती.
पण फर्ग्युसनचे नाव काढताच, नरसिंह राव खरंच खुलले आणि त्यांनी आठवणी सांगितल्या होस्टेलमधल्या वास्तव्याच्या आणि पुण्याच्या त्यावेळच्या सांस्कृतिक वातावरणाच्या…!!
त्यांनी महत्त्वाची आठवण सांगितली, ती पुण्याच्या गणेशोत्सवासंबंधी. ते म्हणाले, मी त्यावेळी फर्ग्युसनच्या होस्टेलमध्ये राहात होतो. माझ्याकडे तेव्हा सायकल होती. त्यावेळी गणपती उत्सवात बड्या सुरमांची (हा खास त्यांचा शब्द) गाणी होत असत. मला ही गाणी फार आवडत. ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे ऐकण्यासाठी मी मित्राला सायकलवर डबलसीट घेऊन रास्ता पेठेत जायचो. तेथे रात्री रस्त्यावर झोपायचो. कारण ओंकारनाथांचे गाणे रात्री २.०० वाजता सुरू व्हायचे ते पहाटेपर्यंत चालायचे. आम्ही त्या पहाडी सूरांमध्ये न्हाऊन निघायचो.
राव साहेबांचे हे उस्फूर्त उत्तर ऐकून उपस्थितांना देखील उत्साह आला. अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले. वातावरणातला तणाव दूर झाला होता. सुमारे तास – दीड तास ती आठवणींची मैफल त्यांनी रंगविली होती. ती मला अनुभवायला मिळाली.
नरसिंह राव यांना पुण्याचे आकर्षण होते कारण इथले सांस्कृतिक वातावरण. हे राम खांडेकरांनी लिहून ठेवले आहे. राव पंतप्रधान असताना पुण्याच्या दौऱ्यात वेळात वेळ काढून ते गानहिरा हिराबाई बडोदेकर आणि ज्योत्स्ना भोळे यांना भेटले होते. स्वतः ज्योत्स्नाबाईंनी ही आठवण आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे. पुढच्या वेळी तुमचे मनरमणा ऐकायला येईन, असे राव साहेब मला सांगून गेले. पण त्यांचे येणे झाले नाही, असेही त्यांनी त्या आठवणीत आवर्जून नमूद केले आहे.
राव साहेबांच्या कॉलेज जीवनात ज्योत्स्नाबाई रंगभूमी गाजवत होत्या. त्यांची नाटके राव साहेबांनी पाहिली होती. इतकेच काय पुण्याच्या वास्तव्यात ते मराठी शिकले होते. आणि त्यांचे मराठी एवढे उत्तम झाले, की त्यांनी हरि नारायण आपटे यांची गाजलेली कादंबरी पण लक्षात कोण घेतो, चे तेलुगु आणि मल्याळम या दोन भाषांमध्ये भाषांतरही केले होते.
नरसिंह राव हे पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर एकदा दुर्गाबाई भागवतांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण ती भेट होऊ शकली नव्हती. पुण्याच्या भेटीच्या वेळी नरसिंह रावांनी पु. ल. देशपांडे यांनाही भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण नेमके त्याच दिवशी पु. ल. अन्यत्र जायचे होते म्हणून ही भेट होऊ शकली नाही.
राव साहेबांची पुण्याशी संबंधित आणखी एक मोलाची आठवण आहे, ती केसरीशी निगडीत आहे. पुण्यातले ज्येष्ठ काँग्रेस नेते कै. नरूभाऊ लिमये यांनी नरसिंह रावांना पत्र लिहून, ते पुण्यात आले की त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. नरसिंह रावांनी त्यांना या पत्राचे आवर्जून उत्तर पाठविले होते आणि त्यात लिहिले होते, होय. पुण्यात आलो की केसरीमध्ये आवश्य भेटू…!! यानंतर खरंच नरसिंह राव पुण्यात आले पण दुर्दैवाने नरूभाऊंची आणि त्यांची भेट होऊ शकली नाही. कारण राव साहेबांच्या पुणे दौऱ्यापूर्वी काही दिवस आधी नरूभाऊंचे निधन झाले होते…!!
पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर नरसिंह रावांना गाणे शिकायचे होते. त्यासाठी त्यांनी पुस्तके जमवली होती. मालकंस हा त्यांचा आवडता राग होता, अशी आठवण राम खांडेकरांनी लिहिली आहे. त्यांचा संगीताच्या आवडीची बीजे नक्कीच त्यांच्या पुण्याच्या वास्तव्यात सापडतील. राव साहेबांमध्ये संगीताच्या आवडीचे बीज पुण्यात रूजले आणि बहरले होते.
नरसिंह राव हे पंतप्रधान होते. मंत्री होते. मुख्यमंत्री होते. भारतीय आर्थिक सुधारणांचे ते जनक होते, पण इतर राजकारण्यांसारखे ते रूढार्थाने राजकारणी नव्हते. त्यांचे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे भाषण खूप गाजले. कारण ते खऱ्या अर्थाने बहुभाषा पंडित आणि काव्यशास्त्रविनोदात रमणारे होते. मराठी साहित्याच्या संमेलनांच्या आयोजकांवर राजकीय प्रभाव टाकून अनेक साहित्य संमेलनांचे उद्घाटक म्हणून मिरवणारे आणि दुसऱ्यांनी लिहिलेली भाषणे स्वतःची म्हणून वाचणारे ते नेते नव्हते…!!
त्यांनी “इनसायडर” स्वतः लिहून आपल्या पूर्वायुष्यावर प्रकाश जरूर टाकला. पण या कादंबरीचा उत्तरार्ध त्यांच्याकडून लिहून झाला नाही. भारत एका फार मोठ्या दस्तऐवजाला मुकला. ज्यांनी इतिहास घ़डविला, त्यांच्या हातूनच तो लिहून झाला नाही. इतिहासाच्या उणीवेची ही बोच कायम जाणत्या भारतीयांना डाचत राहील…!!
भारतीय अर्थिक सुधारणांच्या जनकास विनम्र अभिवादन…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App