राष्ट्रवादी फुटल्याचा हादरा; भाजपच्या वळचणीला येण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या रांगा!!

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा हादरा; भाजपच्या वळचणीला येण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या रांगा!!, असे आजच्या राष्ट्रीय राजकारणाचे वर्णन करावे लागेल. कारण भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे मुख्य टार्गेट ठेवून काम करतो आहे. त्यासाठी त्यांना जुनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुनरूज्जीवित करायची आहे. भाजपला त्याशिवाय पर्याय नाही. तसे केले नाही, तर भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे, असा नॅरेटिव्ह काही माध्यमे चालवत आहेत.NCP split shake in regional parties, regional leaders run for alliance with BJP

पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती उलटी आहे. भाजपला प्रादेशिक पक्षांची जेवढी गरज आहे, त्यापेक्षा प्रादेशिक पक्षांना भाजपची जास्त गरज आहे. भाजपने आपल्याला बरोबर घ्यावे की नाही हा मुद्दा अलहिदा, पण निदान भाजपने आपला पक्ष फोडू नये, ही भीती प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना आहे आणि म्हणूनच भाजपच्या वळचणीला जाण्याची त्यांनी तयारी चालविली आहे!!



त्यातूनच भाजपने आपल्या दीर्घकालीन व्यापक स्ट्रॅटेजीनुसार प्रादेशिक घराणेशाहीला हादरा देण्यासाठी ठाकरे आणि पवारांच्या पक्षांना सुरुंग लावले. काँग्रेसच्या घराणेशाहीला सुरुंग लावल्यानंतर प्रादेशिकांचा तसा नंबर लागणार होताच, तो भाजपने आत्ता लावला. त्यानुसार राष्ट्रवादीत उभी फूट पाडली. पण या फुटीचे हादरे फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशात बसलेत आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या रांगा भाजपच्या वळचणीला येण्यासाठी लागल्या आहेत.

राष्ट्रवादी फुटल्यानंतर नितेश कुमार यांचा जेडीयू, बादलांचे अकाली दल, वायएसआर काँग्रेस, कर्नाटकातील जेडीएस हे पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अर्थात एनडीए मध्ये सहभागी व्हायच्या तयारीत आहेत.

सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या मागे लागलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आपलाच जदयु पक्ष भाजपच्या वळचणीला बांधायला तयार झाले आहेत. त्यासाठी त्यांनी आपले “दूत” राज्यसभेचे उपाध्यक्ष हरवंश सिंह यांना कामाला लावल्याच्याही बातम्या आल्या आहेत. राष्ट्रवादी सारखा “चाणक्यांचा” पक्ष फुटू शकतो, तर आपली अवस्था त्यापेक्षा बिकट आहे, याची जाणीव नितीश कुमार यांना झाल्यानंतर आपला संपूर्ण संयुक्त जनता दल हा पक्ष एकसंध राखून भाजपच्या वळचणीला नेऊन बांधायला ते तयार झाले आहेत.

 पंजाब मध्ये अकाली दलाची हेकडी काढली

पंजाब मध्ये आम आदमी पार्टी कडून सपाटून मार खाल्ल्यानंतर अकाली दलालाही शहाणपण आले आहे. शरद पवारांपेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या प्रकाश सिंह बादल यांना आपल्या जीवनातल्या अखेरच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्या पराभवानंतर वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तो पराभव त्यांच्या फार जिव्हारी लागला होता. या मोठ्या पराभवातून अकाली दलाने धडा घेतला आहे आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखायच्या एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पण आत्तापर्यंत अकाली दल स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर भाजपशी युती करत होता. आता ती स्थिती उरलेली नाही. आता भाजप स्वतःच्या अटी शर्तींवर अकाली दलाला युतीमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच भाजपच्या नेतृत्वाने हरसिमरत कौर यांच्या ऐवजी खुद्द सुखबीर सिंग बादल यांनाच मंत्री होण्यास सांगितले आहे. यात अकाली दलाची अट आणि शर्त चालणार नाही, तर मोदींच्या भाजपच्या नेतृत्वाची टर्म अँड कंडिशन चालेल, हे अधोरेखित झाले आहे.

 आंध्रात जगन मोहन यांची तयारी

आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता निर्माण होताच मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आपल्या वायएसआर काँग्रेसला भाजपच्या वळचणीला नेऊन बांधण्याची तयारी चालवली आहे. भाजप आणि चंद्राबाबू यांची युती झाली, तर विधानसभेत आपल्याला हादरा बसल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र येण्याआधी आपणच भाजपच्या वळचणीला जाऊन थांबलो की आपोआप चंद्राबाबू नायडूंचा पत्ता कापला जातो, असे जगन मोहन रेड्डी यांना वाटत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातला वायएसआर काँग्रेसला असलेला धोका कमी करण्यासाठी ते स्वतःच आपला पक्ष भाजपच्या वळचणीला घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आहेत.

कर्नाटकात व पक्षाचे अस्तित्व वाचवण्यासाठी देवेगौडांचा जेडीएस भाजपशी युती करण्याच्या तयारीत आहे.

वाजपेयी – मोदी भाजप मधला फरक

वाजपेयी आणि मोदींच्या भाजपमध्ये हाच तर मोठा फरक आहे. वाजपेयींच्या काळात भाजप मोठा पक्ष असला तरी पूर्ण बहुमत नसल्याने भाजपला या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या नाकदुऱ्या काढायला लागायच्या. प्रादेशिक पक्षांचे नेते भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना दुय्यम वागणूक द्यायचे. वाजपेयी – आडवाणींना मातोश्रीवर पोहोचावे लागायचे. जयललितांच्या पोज गार्डनला खेटे घालायला लागायचे. ममतांच्या घरी जायला लागायचे. त्यासाठी वाजपेयींना प्रमोद महाजन आणि जॉर्ज फर्नांडिस या दोन्ही त्यांची नियुक्तीच करावी लागली होती.

पण आता ती स्थिती उरलेली नाही. वाजपेयींचा भाजप हा इतिहास आहे, मोदींचा भाजप हे वर्तमान आहे!! त्यामुळे प्रादेशिक घराणेशाही पक्षांची हेकडी काढून मोदी – शाहांचा भाजप त्यांना स्वतःच्या पक्षाच्या वळचणीला आणून बांधत आहे.

मोदी भाजपचा दीर्घ प्लॅन

यात एक बाब महत्त्वाची आहेच, ती म्हणजे मोदींना स्वतःची प्रतिमा भाजप केंद्रित ठेवण्यापेक्षा, देशाचा नेता म्हणून अधोरेखित करायची आहे आणि ती करताना त्यांना प्रादेशिक पक्षांची मदत घ्यायची आहे. आपणही देशाच्या एकतेत विविधतेला मानतो. पण ती विविधतेतील आपल्या अटीशर्तींवर असेल, हे मोदींना अधोरेखित करायचे आहे.

इतकेच नाही तर मोदींच्या पाठीशी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सलग तीन वेळा भाजपची सत्ता केंद्रात आणून काँग्रेसचे रेकॉर्ड ब्रेक करायचे आहे किंवा काँग्रेसच्या रेकॉर्डच्या बरोबरीने येऊन पोहोचायचे आहे. जुन्या काँग्रेसची संघटना जशी संपूर्ण देशातल्या गावागावांमध्ये, शहरा शहरांमध्ये पाय घट्ट रोवून उभी होती, तशीच संघटना भाजपला बांधायची आहे आणि त्या दृष्टीने स्वतःच्या अटीशर्तींवर प्रादेशिक पक्षांशी युती आघाडी करून संघटना विस्तार करायचा आहे.

माध्यमे फक्त 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करीत आहेत. पण भाजप 2026 मध्ये होणाऱ्या मतदारसंघ संख्यावाढीचा विचार करत आहे. त्यावेळी लोकसभेचे 800 पेक्षा जास्त मतदारसंघ, सर्व विधानसभांचे मिळून साधारण 1000 ते 1200 वाढणारे मतदारसंघ यामध्ये तगडे भक्कम उमेदवार मिळवणे, हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. त्याकडे संघ आणि भाजपचे विशेषत्वाने लक्ष आहे.

कारण हा मोदींचा भाजप आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या राजकीय खेळ्या करून ते प्रादेशिक पक्षांची हेकडी मोडत स्वतःच्या वळचणीला आणून बांधत आहेत.

NCP split shake in regional parties, regional leaders run for alliance with BJP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात