शिवसैनिकांच्या पाहऱ्यात, राणा दांपत्य घरात; पण तरीही टीकेचे तोफगोळे मुख्यमंत्र्यांच्या दारात…!!, अशी आजची महाराष्ट्रातील राजकीय अवस्था आहे. ज्या राणा दांपत्याला अमरावतीतच जखडून ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी जंगजंग पछाडले ते राणा दाम्पत्य शिवसैनिकांचा डोळा चुकून शिताफीने अमरावती बाहेर पडून मुंबईत पोहोचले. विमानतळावर अथवा रेल्वे स्टेशनवर त्यांची नाकाबंदी शिवसैनिक करू शकले नाहीत. शेवटी राणा दाम्पत्याच्या खारच्या घराभोवती शिवसैनिकांनी पहारा लावला. शिवसैनिक राणा दाम्पत्याच्या घरापर्यंत पोहोचले, पण एवढे करूनही शिवसेनेला अपेक्षित फायदा मिळवता आला का??, याचे उत्तर अजूनही “हवेत” आहे. कारण शिवसैनिकांच्या पहाऱ्यात राणा दांपत्य घरात, पण तरीही टीकेचे तोफगोळे मुख्यमंत्र्यांच्या दारात…!! अशीच अवस्था आहे ना…!! Navneet Rana: Under the watchful eye of Shiv Sainiks, at the Rana couple’s house; Still cannons of criticism at the door of the Chief Minister !! … what exactly will happen … ??
राणा दाम्पत्याला शिवसैनिकांनी त्यांनीच आधी जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 9.00 वाजता घराबाहेर पडू दिले नाही. राणा दाम्पत्य मातोश्री पर्यंत पोहोचू शकले नाही. पण म्हणून मुख्यमंत्र्यांवर असा टीकेचा जोर त्यांनी कमी केला असे घडले नाही. उलट शिवसैनिकांच्या पाहऱ्यात घरात बसून राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांवर तिच्या एकापाठोपाठ एक फैरी झाडल्या आहेत.
शिवसेनेचे मुख्यमंत्री आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली आहे. त्या साडेसातीतून सोडविण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचणार होतो. मुख्यमंत्र्यांच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्याच शिवसैनिकांनी ढासळवली आहे, असे टीकेचे बाण राणा दाम्पत्याने सोडले आहेत. आज बाळासाहेब असते एकदाच काय शंभर वेळा हनुमान चालीसा वाचण्याची परवानगी त्यांनी दिली असती असे पुन्हा एकदा राणा दांपत्याने शिवसेनेला डिवचले आहे.
राणा दाम्पत्याच्या एकूणच राजकीय हल्ल्यामुळे शिवसेना मातोश्री भोवती संघटित झाली हे खरे आहे, पण हीच शिवसेना राणा दाम्पत्याने अमरावतीत मात्र विस्कळीत करून टाकल्याचे दिसून येत आहे…!!
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आणि पुरस्काराने नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव केल्यानंतर सुनियोजित पद्धतीने शिवसेनेला अंगावर घेतले, त्याचाच आज मातोश्री भोवतीचा एक राजकीय अंक आज पार पडताना दिसत आहे. यात राणा दाम्पत्याला मातोश्री पर्यंत पोहोचू दिले नाही, ही शिवसैनिकांची सरशी झाली हे खरे, पण त्याच वेळी अमरावतीत मात्र राणा दांपत्य “हिरो” झाले असेल तर त्याचा तोटा शिवसैनिकांना सहन जरूर करावा लागणार आहे. अमरावतीत शिवसेना संघटित करण्याचे फार मोठे आव्हान यानिमित्ताने राणा दाम्पत्याने शिवसैनिक पुढे वाढवून ठेवले आहे, ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही.
राणा दांपत्य आणि शिवसेना यांच्यात टोकाच्या संघर्षाचा निकाल काय लागायचा ते लागो… पारडे इकडून तिकडे फिरत राहो… राणा दांपत्याची अंतिम लढाई अमरावतीत आहे, तर शिवसेनेची अंतिम लढाई मुंबई महापालिकेत आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आपापले बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी शिवसैनिक आणि राणा दांपत्य लढाईच्या मैदानात आले आहेत ही यातली राजकीय वस्तुस्थिती आहे. या पलिकडे काही नाही…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App