सुमारे दोनच महिन्यांपूर्वी पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाम या तीन राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेअंतर्गत 50 किलोमीटर पर्यंत सुरक्षाविषयक कारवाई करण्याचे अधिकार सीमा सुरक्षा दल अर्थात BSF बीएसएफला देण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला. त्यावेळी पंजाब आणि पश्चिम बंगाल या अनुक्रमे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस शासित राज्यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. दोन्ही राज्यांच्या पोलिसांच्या अधिकारांवर बीएसएफची पर्यायाने केंद्र सरकारची गदा येते, अशा स्वरूपाचे आरोप पंजाब आणि बंगाल सरकार यांनी केले होते.Major lapse in PM’s security : Importance of BSF jurisdiction increase up to 50 KM in border area
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जेथे मोठी त्रुटी आढळली. सुरक्षा व्यवस्थेचे मोठे उल्लंघन झाले ते स्थळ पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला गावाजवळ 10 किलोमीटरवर आहे. हुसैनीवाला हे गाव पंजाब मध्ये पाकिस्तान सीमेजवळ आहे. याच हुसैनीवाला गावात स्वातंत्र्यपूर्व काळात प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी फासावर लटकवले होते आणि म्हणून 1947 च्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेले गाव 1961 मध्ये त्यावेळच्या केंद्र सरकारने पाकिस्तानशी करार करून भारताला जोडून घेतले होते. हुसैनीवाला गावाच्या बदल्यात 1947 मध्ये भारतात राहिलेली 12 गावे पाकिस्तानला देण्यात आली होती.
पंतप्रधानांचा ताफा काल हुसैनीवाला गावाच्या अलीकडे उड्डाणपुलावर अडकला होता ते ठिकाण पाकिस्तानपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे. या अंतरावर पंजाब पोलिसांचा सुरक्षाविषयक गलथानपणा उघडा पडला आहे, तो देखील सर्वसामान्य घटनेमध्ये नव्हे, तर थेट पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याने आणि सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन झाल्याने…!!
पंजाब पोलिसांचा गलथानपणा उघडा पडणे गंभीर आहे. पंजाबचे जे सरकार पोलिसांच्या अधिकारावर बीएसएफची म्हणजे पर्यायाने केंद्र सरकारची गदा येते असे म्हणत होते त्या सरकारच्या नियंत्रणाखालील पोलिसांची सुरक्षा व्यवस्थेतील ही ढिलाई आहे आणि ती देखील पाकिस्तान पासून 10 किलोमीटरच्या अंतरावर उघडी पडली आहे…!!
येथेच केंद्र सरकारने पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाम यांच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून 50 किलोमीटरपर्यंत बीएसएफला सुरक्षा विषयक कारवाई करण्याचे दिलेले अधिकार या विषयाचे महत्त्व पटते…!! BSF कडे हे अधिकार प्रदान करताना केंद्र सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेश येथून होणाऱ्या दहशतवादी कारवाया, घुसखोरी, ड्रोन हल्ले, शस्त्रे, ड्रग्जचे स्मगलिंग आदी महत्वाचे सुरक्षाविषयक धोके लक्षात घेतले आहेत.
पण काल हुसैनीवालाच्या उड्डाणपुलावर जे घडले, ते वर लिहिलेल्या धोक्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक धोकादायक होते. थेट पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेशीच “खिलवाड” करणारे होते. याचे गांभीर्य सर्वसामान्य सुरक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक होते.
पंजाब पोलिसांना पंतप्रधानांच्या दौऱ्याची पूर्वकल्पना असूनही पोलिसांना प्रोटोकॉल नुसार सुरक्षाव्यवस्था पुरवता आली नाही. यासंदर्भात काँग्रेस विरुद्ध भाजप या राजकीय चष्म्यातून बघण्यापेक्षा त्या पलिकडे जाऊन देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था धोक्यात येते आणिती देखील पाकिस्तानच्या सीमेपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या उड्डाणपुलावर धोक्यात येते ही बाब अतिगंभीर आहे…!! या मुद्द्यामुळेच सीमेअंतर्गत 50 किलोमीटर पर्यंतची सर्व सुरक्षा व्यवस्थाच ही सीमा सुरक्षा दलासारख्या BSF अद्ययावत सैन्य दलाकडे सोपविण्याचे महत्त्व अधोरेखित होते…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App