2004 मध्ये “इंडिया शायनिंग” फसले, हे खरेच; पण “काळवंडलेला भारत” ही विरोधकांची जाहिरात 2024 मध्ये चालेल??

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाला काटशह देण्यासाठी काँग्रेस सह सगळे विरोधी पक्ष जातनिहाय जनगणनेचा आग्रह धरून देशाचे राजकारण पुन्हा “मंडल”च्या दिशेने नेत आहेत, पण त्याचवेळी ते 2004 चे स्वप्न 2024 मध्ये पूर्ण होण्याची वाट पाहात आहेत. नेमके काय आहे हे स्वप्न?? आणि त्यामागचे राजकीय इंगित काय आहे??, हे समजून घेण्याची गरज आहे.Indian voter always rejected extremes in political campaign of all parties

2004 मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी उभ्या न राहिलेल्या आघाडीने पराभव केला होता. वाजपेयी सरकारची “इंडिया शायनिंग”ची घोषणा फसली. त्याचा आधार घेऊन आज सगळे विरोधक “इंडिया” आघाडी उभी करून 2004 चे स्वप्न 2024 मध्ये पुन्हा प्रत्यक्षात उतरेल, असा दावा करत आहेत.



पण हा दावा करताना काँग्रेस सह सगळ्या विरोधकांनी मोदी सरकारने भारत काळवंडून टाकल्याची जाहिरात चालवली आहे. म्हणजे राहुल गांधींचा सकट सगळ्या नेत्यांनी भारताची पूर्ण नकारात्मक प्रतिमा जनमानसावर ठसविण्याचे काम चालविले आहे. मोदी सरकारने भारतात सगळ्या सरकारी मालमत्ता विकल्या. एकाच उद्योगपतीचे घर भरले. युवक, महिला, दलित, आदिवासी वेगवेगळे जात घटक यांच्याकडे सरकार पूर्ण दुर्लक्ष केले. भारत मनातून तोडला. त्यामुळे त्याला जोडावे लागत आहे, असा सगळा नकारात्मक प्रचार सुरू आहे. मोदी उभ्या करू पाहत असलेल्या सर्वसमावेशक हिंदुत्ववादी राजकारणाला काटशह देण्याचा हा जीवतोड प्रयत्न आहे.

पण इथेच विरोधकांच्या राजकीय अपयशाची खरी बीजे दडली आहेत.

कारण 2004 मध्ये “इंडिया शायनिंग”ची घोषणा फसली. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भाजपचा पराभव केला, ही वस्तुस्थिती आहे, पण त्याला फक्त विशिष्ट आकड्यांचाच आधार आहे. त्या पलीकडे त्यात फारसे काही आजच्या राजकीय परिस्थितीशी साम्य नाही. कारण त्या वेळच्या वाजपेयी सरकारच्या पराभवाकडे आणि काँग्रेसच्या विजयाकडे बारकाईने पाहिले तर त्यातले खरे इंगित समजेल…, ते म्हणजे “इंडिया शायनिंग” या सकारात्मक प्रचाराचा त्यावेळच्या भाजप नेतृत्वाने विशेषतः प्रमोद महाजनांनी अतिरेक केला होता. भारतातल्या सगळ्या समस्या संपल्या. भारत सुजलाम सुफलाम झाला. भारत पूर्ण प्रगत झाला. पूर्ण विकसित झाला, असे चित्र निर्माण केले होते. पण ते वास्तवाला धरून नव्हते. भारत प्रगतीच्या दिशेने निश्चित चालला होता, पण म्हणून भारतातल्या समस्या संपल्या होत्या, असे बिलकुल नव्हते. वाजपेयी सरकारच्या काळात सकारात्मक किंबहुना दमदार पावले निश्चित पडली होती, पण याचा अर्थ जनतेच्या समस्या संपल्या होत्या, असा बिलकुल काढता येणार नव्हता, पण “इंडिया शायनिंग” घोषणा करून भाजपने, विशेषत: प्रमोद महाजन यांनी तसे “परसेप्शन” तयार केले होते आणि इथेच भाजपचे राजकीय गणित फसले.

त्यावेळी प्रत्यक्ष निवडणूक काळात किंवा त्याआधी अनेकांना या गोष्टीची निश्चित जाणीव देखील होती, की “इंडिया शायनिंग”चा प्रचार हा पुरेसा परिणामकारक होणार नाही. याचा इशारा अरुण शौरींसारख्या पत्रकारांनी त्यावेळी इंडिया टुडे मध्ये सावधगिरीचा लेख लिहून दिलाही होता, पण त्यावेळी भाजप प्रमोद महाजनांच्या निवडणूक स्ट्रॅटेजीच्या एवढ्या प्रभावाखाली होता, की आपल्याला निर्णायक पातळीवर “इंडिया शायनिंग” घोषणेचा तोटा होईल याचा अंदाजच नेतृत्वाला आला नाही आणि अंदाज आला असला तरी प्रत्यक्षात काही त्यावर काही उपाय योजण्यात आल्या नाहीत. त्याचा परिणाम भाजपच्या पराभवात झाला.

… पण तो काँग्रेसचा विजय ठरला असे मानणे अर्धसत्य ठरेल.

कारण त्यावेळेस भाजप आणि काँग्रेस यांच्या जागांमधील तफावत फक्त 7 जागांची होती. म्हणजे भाजपला त्यावेळी 138 तर काँग्रेसला 145 जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर काँग्रेसने राजकीय चतुराईने स्वतंत्र आघाडी तयार केली. तिला युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स असे नाव देऊन सत्ता मिळवली. सोनिया गांधींचे ते राजकीय कर्तृत्व होते हे निश्चित!! पण तो भाग प्रत्यक्ष निवडणुकीनंतरचा होता.

आता जेव्हा काँग्रेस प्रणित “इंडिया” आघाडीतले सगळे नेते 2004 चे “ते” स्वप्न पाहत आहेत, तेव्हा ते एका बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत, ती म्हणजे भाजपने जसा “इंडिया शायनिंग” प्रचाराचा अतिरेक केला होता, तसाच अतिरेक “इंडिया” आघाडीतले नेते “काळवंडलेला भारत” या प्रचाराचा करत आहेत!! केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीतले नेते भारताचे संपूर्ण नकारात्मक चित्र मतदारांसमोर उभे करत आहेत… आणि हेच भारतीय मतदाराला अमान्य असणार आहे.

याला कारण भारतीय मतदाराची मानसिकता हे आहे. भारत मतदाराची मानसिकता कायम समन्वयवादी राहिली आहे. भारतीय मतदार एखाद्या पक्षाचा ठरवून पराभव जरूर करतो, पण भावनेच्या भरात अतिरेक करून तो एखाद्या पक्षाला एकाच निवडणुकीत कधी संपवत नाही. याचा अर्थ भारतीय मतदारसंघाची मूलभूत काहीशी नेमस्त आहे.

भारतीय मतदाराला आक्रमक प्रचार जरूर भावतो. इंदिरा गांधींचा, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा आक्रमक प्रचार भारतीय मतदाराला भावला देखील आहे. त्याची उदाहरणे इतिहासात नमूद आहेत, पण ज्यावेळी एखाद्या नेत्याच्या विजयासाठी किंवा पराभवासाठी प्रभावासाठी संपूर्ण देशाचे चित्र अतिरेक करून सकारात्मक किंवा नकारात्मक रंगविले जाते ते देशातल्या मतदारांना मान्य होत नाही, हा इतिहास आहे.

1971 च्या निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येऊन इंदिरा हटाओची घोषणा दिली होती. त्यावर इंदिरा गांधींनी विरोधकांना मला हटवायचे आहे, पण मला लोकांची गरीबी हटवायची आहे, असे म्हणून गरिबी हटाओची घोषणा दिली होती. लोकांनी गरिबी हटाओच्या बाजूने कौल दिला. 2004 ची निवडणूक ही देखील त्याचीच एक झलक होती. इंडिया शायनिंग प्रचाराचा अतिरेक त्यावेळी भाजपला नडला. 2024 मध्ये होत असलेला “काळवंडलेल्या भारत” प्रचाराचा अतिरेक काँग्रेस सह सर्व विरोधकांना नडणार आहे.

भले 2004 ची स्वप्नपूर्ती 2024 मध्ये पुन्हा होण्याची विरोधक वाट पाहत असतील, पण भारताविषयी फार नकारात्मक बोलल्याने त्यांचा स्वप्नभंग होण्याचीच दाट शक्यता आहे!!

Indian voter always rejected extremes in political campaign of all parties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात