विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांच्या (IFSC) एकात्मिक नियामक मंडळाचे कार्यालय गांधीनगरला सुरू करण्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कडक पत्र लिहिले असताना त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मात्र हे कार्यालय गांधीनगरला सुरू करण्याबाबत आमची काहीच हरकत नसल्याची टिप्पणी लोकसभेमध्ये ११ डिसेंबर २०१९ रोजी केल्याचा व्हिडीओ पुढे आला आहे.
“तुम्ही मुंबईचा का विचार करीत नाही? पण हे कार्यालय गांधीनगरला नेण्याला आमची काहीच हरकत नाही. जर एखादे दुसरे राज्य (गुजरात) चांगले काम करीत असेल तर आम्हाला आनंदच आहे…कारण शेवटी आपला देश एकच आहे,” अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमधील चर्चेदरम्यान केली.
एवढेच नव्हे, तर त्यांनी IFSC पेक्षा आयटी हब ही संकल्पना रोजगारांच्यासंदर्भात अधिक चांगली असल्याचेही प्रतिपादन केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, “गांधीनगरच्या IFSC ने फक्त दहा हजार जणांची रोजगारनिर्मिती केली आहे. त्या तुलनेने आयटी हबमध्ये (उदाहरणार्थ पुण्यातील हिंजवडीमधील आयटी हब) कितीतरी जास्त रोजगार निर्माण होतो.
IFSC आणि आयटी हब या दोन वेगळ्या संकल्पना असल्या तरीही रोजगार जर आयटी हबमध्ये निर्माण होणार असेल तर आपण IFSC पेक्षा आयटी हबलाच प्राधान्य दिले पाहिजे. तिथे जास्त करसवलती दिल्या पाहिजेत…”
सुळे यांच्या या टिप्पणीने IFSC नियामक मंडळाचे कार्यालय गांधीनगरला नेण्याचा निर्णय हा काही नवा नसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि त्यास संसदेमध्ये कोणताही विरोध केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App