विशेष प्रतिनिधी
मुंबई:राज्यातील 18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने आज सुधारणा केली आहे.
अत्यावश्यक सेवा नसलेली दुकानं, शॉपिंग मॉल्स, इतर अस्थापना, ऑफिसेस, सलून, स्पा, जिम, उद्यानं हे सगळं उघडण्यात आलं आहे. कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून हे सगळं सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. शॉपिंग मॉल्सही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. यासंदर्भातली नवी नियमावली आता सरकारने जाहीर केली आहे.
काय आहे शॉपिंग मॉलसंदर्भातली नवी नियमावली?
महाराष्ट्रातील सर्व शॉपिंग मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा
शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी यांचे तसंच मॉलमधे प्रवेश करणाऱ्या नागिरकांचे कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस आणि ते घेऊन 14 दिवस झालेले असणं आवश्यक
लसीकरण प्रमाणपत्र व त्यासह फोटो आयडी मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखवणं गरजेचं
18 वर्षांच्या खालील वयोगटातील मुला/मुलींना मॉलमध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेलं शाळा अथवा महाविद्यालयाचं ओळखपत्र दाखवणं बंधनकारक असणार आहे
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस आणि चौदा दिवस पूर्ण होणं हीच अट रेल्वे प्रवासासाठीही लागू होती. आता ती मॉलमध्येही लागू करण्यात आली आहे. मात्र मॉलमध्ये `18 वर्षांखालील मुलांना प्रवेश करायचा असेल तर त्यांना ओळखपत्र दाखवणं आवश्यक असणार आहे असं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
हॉटेल्स आणि रेस्तराँबाबत काय आहेत नियम?
उपाहारगृहे (रेस्तराँ) यांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याला जास्तीत जास्त 200 संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये 50 टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा 100 या पेक्षा जास्त नाही.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सर्व हॉटेल्स, दुकानं आणि रेस्तराँ ही आता रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहेत. कोव्हिड प्रोटोकॉल पाळणं हे मात्र बंधनकारक असणार आहे. हॉटेलच्या मालकांनी, कर्मचाऱ्यांनी आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांनी कोव्हिड प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसं न आढळून आल्यास कारवाई केली जाईल असाही इशारा देण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App