चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. काही मंडळी दररोज व्यायाम करतात. तर बहुतांश लोक याचा कंटाळा करतात. मुंबईसारख्या शहरात बराचसा वेळ प्रवासात जातो. तर पावसाळ्यात घराबाहेर पडणे धोक्याचे वाटते. मात्र आता अगदी एक मिनिटात व्यायाम करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होऊ शकते. ६० सेकंदांचा म्हणजेच एक मिनिटाचा व्यायाम शरीरासाठी कसा आरोग्यदायी आहे, ह्यावर परदेशात चर्चा सुरू आहे.Even a minute of intense exercise is important for good health
या संबंधी बरेच संशोधनही तिथे झाले आहे. गेल्या काही वर्षांत असे लक्षात आले आहे, की बराच वेळ सतत कसरत करण्यापेक्षा कमी वेळ थोडा थोडा व्यायाम म्हणजे दहा मिनिटे, सात मिनिटे, सहा मिनिटे किंवा चार मिनिटेदेखील व मध्ये विश्रांती घेतल्यास फिटनेसमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते. एका नवीन अभ्यासानुसार, सुलभ १० मिनिटांच्या व्यायामापैकी एक मिनिट कडक कसरत केल्याने फिटनेस आणि आरोग्य सुधारू शकते.
अत्यंत व्यग्र असणाऱ्या तरुण पिढीसाठी एक मिनिटाचा प्रखर व्यायाम हा शरीर उत्तम व सशक्त ठेवण्यासाठी चांगला पर्याय आहे. कॅनडामधील ओंटारिओच्या हॅमिल्टन येथील मॅकमास्टर विद्यापीठातील संशोधकांनी असे सिद्ध केले आहे, की केवळ ६० सेकंदांच्या तीव्र व्यायामांनी तुम्ही शरीराची क्षमता वाढवू शकता. इतकेच नाही, तर ज्येष्ठ व्यक्तींना होणारा मधुमेह (टाईप २) रोखू किंवा टाळू शकता. या पद्धतीने कसरत करणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांचा रक्तदाब नियंत्रित असल्याचेही आढळून आले आहे.
त्यांची शारीरिक क्षमता वाढल्याचे दिसून आले असून त्यांच्या शरीरातील स्नायू अधिक बळकट होतात असेही निरीक्षणास आले आहे. झटपट व्यायामाची तुलना नेहमीच्या व्यायामाबरोबर करणे शक्य नाही. नेहमीचा व्यायाम हा अनेक बाबतीत झटपट व्यायामापेक्षा चांगला असतो. झटपट व्यायामामुळे वजन फारसे कमी होत नसले, तरी शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App