डॉ. भारती पवार : राजकीय भविष्याची पेरणी वैयक्तिक आणि पक्षाची देखील!!

विनायक ढेरे

एखाद्या राजकीय नेत्याच्या कारकीर्दीत असे काही वळण येते की ते नेते स्थानिक पातळीपासून एकदम केंद्रीय पातळीवर झेप घेतात. तिथे कामाची मोहर उमवटतात आणि आपल्या राजकीय कारकिर्दीत शिरपेचात मानाचा तुरा खोवतात. Dr. Bharti Pawar: The sowing of political future is personal

अशीच अनमोल संधी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीच्या भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार यांना मिळाली आहे. भारती ताईंना आपल्या पेशानुसार केंद्रात राज्यमंत्रीपद मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना केंद्रीय आरोग्य राज्य मंत्रीपदी नेमले आहे आणि नेमकी हीच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आलेली सर्वात मोठी संधी आहे.

डॉ.भारती ताई यांची राजकीय कारकीर्द ज्येष्ठ नेते कै. ए. टी. नाना पवार यांच्या घराण्यातून सुरु झाली हे खरे. शिवाय त्या देखील स्थानिक जिल्हा परिषद सदस्य या पदापासून वरच्या पदांवर गेल्या हेही खरे, पण सध्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आलेले वळण मात्र अनोखे मानले पाहिजे. कारण एका जिल्हा परिषद सदस्याला लोकसभेची उमेदवारी मिळणे दुर्मिळ. ती त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने 2014 मध्ये दिली होती. पण त्यावेळी मोदी लाटेत भारती ताईंना अपयश आले. त्यांचे वय राजकारणाच्या दृष्टीने तरुण होते. त्यामुळे पुढच्या पाच वर्षांत त्यांनी स्वतःची राजकीय आणि सामाजिक पेरणी चालू ठेवली. त्याचाच लाभ त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यांनी आपल्या पवार घराण्याचा परंपरेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी जरूर मागितली होती. परंतु ती त्यांना नाकारण्यात आली आणि त्यांनी भाजपचे कमळ हातात धरले. ही संधी खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी सुवर्णसंधी ठरली. नाशिक जिल्हा परिषदेतून डॉ. भारती ताई एकदम लोकसभेत पोहोचल्या आणि पुढच्या दोनच वर्षात म्हणजे 2021 मध्ये त्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे.
ही त्यांच्या वैयक्तिक राजकीय कारकिर्दीसाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी उत्तर महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने राजकीय पेरणी आहे.

भाजपमध्ये सोशल इंजिनीरिंग इंजिनीअरिंगचा डंका पिटून कोणतीही पदे वाटली जात नाहीत. भारती ताईंची सर्व सामाजिक पार्श्वभूमी आणि उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांना केंद्रात आरोग्य राज्यमंत्री पद देण्यात आले आहे हे उघड आहे. नेमका याचाच वापर सेवा आणि समर्पण या भावनेने भारतीय जनता पार्टीच्या राजकीय संस्कृतीनुसार केला तर त्यांचे वैयक्तिक आणि पक्ष म्हणून भाजपचे राजकीय भवितव्य उत्तर महाराष्ट्र मध्ये घडविण्याची त्यांच्यापुढे संधी चालून आली आहे, असे मानावे लागेल. भारती ताईंनी आरोग्य राज्यमंत्री पदाची सुरुवात तर उत्तम केलेली दिसते आहे. केंद्रीय पातळीवरच्या बैठकांमध्ये आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्याची चुणूक दिसते आहे.

त्यांचा स्वभाव मुळातच विनम्र असल्याने भारतीय जनता पार्टीच्या राजकीय संस्कृतीशी त्यांनी उत्तम रित्या जुळवून घेतले आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पक्षाची नवी बांधणी करण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पक्ष उपयोग करून घेण्याच्या स्थितीत आहे. त्या स्वतःदेखील यासाठी अनुकूल भूमिका घेण्याच्या स्थितीत आहेत.

इथेच खर्‍या अर्थाने त्यांची वैयक्तिक कारकीर्द आणि पक्ष म्हणून भाजपची कारकीर्द उत्तर महाराष्ट्रात फुलेल अशी आशा करायला वाव आहे.

Dr. Bharti Pawar: The sowing of political future is personal

महत्त्वाच्या बातम्या