नाशिक : राष्ट्रवादीतल्या सत्ता लालसेची महायुती सरकारला डोकेदुखी, त्यामुळे तिथे कशी लागू करणार मात्र फडणविशी??, असा सवाल तयार झाला आहे.Devendra fadnavis must “manage” NCP’s lust for power
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची साथसंगत सोडून भाजपच्या संगतीत आल्यानंतर देखील अजून त्या पक्षातले मूळ सत्ता लालसेचे संस्कार बदललेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजूनही जुन्याच पद्धतीने वागत आहेत. म्हणून राष्ट्रवादीतली सत्ता लालसा भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे.
एकीकडे छगन भुजबळांनी आपल्या नाराजीचा झेंडा “सागर” बंगल्यावर नेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे फडकवला. त्यामुळे अजित पवारांना “जाग” आल्यानंतर भुजबळांच्या नाराजीचा प्रश्न राष्ट्रवादीतला पक्षांतर्गत विषय आहे. तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, असे म्हणून त्यांनी भुजबळांना चुचकरायचा प्रयत्न केला, पण राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या सत्ता संस्कृतीनुसार राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री आणि छगन भुजबळ यांचे नाशिक मधले प्रतिस्पर्धी माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांवर टीकेचे आसूड ओढले त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला.
या सगळ्यात महायुती सरकारची प्रतिमा पणाला लागली. महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड कौल देऊन देखील सरकार स्थापनेच्या उशिरापासून ते खातेवाटपाच्या उशिरापर्यंत बातम्या आल्याने महायुतीतले बेबनाव महाराष्ट्रातल्या चर्चेचा विषय बनले. त्यात आता नाराजीच्या बातम्यांची भर पडली. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का लागला आहे.
– शिंदेंनी शिवसेनेतली नाराजी केली “मॅनेज”
पण यामध्ये महायुतीला सर्वांत मोठा घटक पक्ष भाजप मधल्या नाराजीच्या बातम्या कमी, पण शिंदे सेना आणि विशेषतः अजितदादांच्या राष्ट्रवादी यांच्या नाराजीच्या बातम्या जास्त आल्या. भाजपने आपल्या 132 आमदारांना शिस्तीचा बडगा दाखविला. भाजपमध्ये बंडाचे झेंडे फडकून काही उपयोग होणार नाही हे आमदारांच्या व्यवस्थित लक्षात आणून दिले गेले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांची नाराजी व्यवस्थित “मॅनेज” केली. अडीच-अडीच वर्षांच्या मंत्रिपदाचा फॉर्मुला देऊन जास्तीत जास्त आमदारांचे समाधान करायचा प्रयत्न केला.
पण अजित पवारांना भुजबळांची नाराजी “मॅनेज” करता आली नाही. इतकेच काय, पण भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यातली नाशिक जिल्ह्यातील प्रतिस्पर्धा देखील “मॅनेज” करता आली नाही. याचा दुष्परिणाम देवेंद्र फडणवीस सरकारच्या प्रतिमेवर व्हायला लागला आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर राष्ट्रवादीतल्या सत्ता लालसेला आवरण्यासाठी किंबहुना लगाम घालण्यासाठी “फडणविशी मात्रा” त्यांना चाटवली पाहिजे, याची निकड निर्माण झाली आहे. अन्यथा राष्ट्रवादीतल्या सत्ता लालसेच्या काट्याचा नायटा होऊन तो अख्ख्या महायुती सरकारलाच बोचायला वेळ लागणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App