काँग्रेसचे लोकसभेतील नेते आणि पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अधीर रंजन चौधरी यांनी अखेर न राहून राजकीय मर्मभेद केलाच आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधकांचे ऐक्य साधण्याच्या प्रयत्नांची पुरती पोलखोल केली आहे. congress to face regional leaders and parties first then BJP
ममता बॅनर्जी साधारण गेल्या वर्षभरापासून केंद्रातल्या भाजप सरकार विरोधात आपली सर्व शस्त्रे परजून बोलत आहेत. त्यांनी भाजपशी उभा दावा मांडत राजकीय पंगा घेतला आहे, हे खरेच. पण त्याच बरोबर ममतांनी राजकीय कृती करताना पश्चिम बंगालमधला काँग्रेस पक्ष पुरता नामशेष करून टाकला आहे आणि त्याची पुढची मोहीम म्हणून त्या आसाम आणि गोव्याकडे देखील वळल्या आहेत.
ममतांच्या गोव्याकडे वळण्याच्या ऐन मुहूर्तावर अधीर रंजन चौधरी यांनी ममतांच्या राजकीय खेळीची पोलखोल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर त्यांचे राजकीय साटेलोटे असल्याचा आरोप केला आहे. “दिल्लीत तुम्ही आणि कोलकात्यात आम्ही”, असे हे साटेलोटे असल्याचे अधीर रंजन चौधरी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याला ममतांच्या राजकीय कृत्यांचा निश्चित पुरावा आहे.
अर्थात, आतापर्यंत कोणा काँग्रेस नेत्याला हे कळत नव्हते असे नाही. पण कोणी बोलत नव्हते. ममता बॅनर्जी विरोधकांचे ऐक्य घडवत असतील तर आपण त्यामध्ये खो घालायला नको, असा त्यामागचा होरा असू शकतो किंवा ज्या अर्थी खुद्द सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना दिल्लीत १० जनपथमध्ये भेट दिली आहे हे पाहून कदाचित काँग्रेस नेते आतापर्यंत गप्प बसले असतील.
पण ममतांची काँग्रेस फोडाफोडी फारच असह्य झाल्यावर अधीर रंजन चौधरींनी तो बांध आता फोडला आहे. या निमित्ताने काँग्रेसमध्ये एकूणच प्रादेशिक नेत्यांच्या राजकीय मनोवृत्तीविषयी चिंतन होईल आणि काही कृती होईल अशी अपेक्षा आहे. एकट्य़ा ममताच काय, पण जगनमोहन रेड्डी, चंद्रशेखर राव, आणि महाराष्ट्राचे जुने जाणते नेते शरद पवार यांचा राजकीय इतिहास तपासून पाहिला तर या सर्वांनी काँग्रेस संघटना फोडून तिच्या बळावरच आपापले प्रादेशिक राजकीय पक्ष परिपुष्ट केले आहेत. इतकेच नाही, तर काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीतला मोठा वाटा आतापर्यंत प्रादेशिक पक्षांनीच अधिक पळविलेला आहे.
उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, बिहारमधला राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे “व्होटर बेस” पाहा आणि त्यांना मिळणारी मतांची टक्केवारी अभ्यासा… सगळे लक्षात येईल…!!
फक्त ममता बॅनर्जी आणि वर उल्लेख केलेल्या बाकीच्या नेत्यांमध्ये फरक आहे, की जगनमोहन, चंद्रशेखर राव आणि शरद पवारांची राजकीय महत्त्वाकांक्षा प्रादेशिक राहिली आहे, तर ममतांची महत्त्वाकांक्षा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय होत चालली आहे. संपूर्ण काँग्रेस संघटनेलाच पर्यायी ठरणारी तृणमूळ काँग्रेसची संघटना उभी करण्याचाच ममता बॅनर्जी यांचा मनसूबा आहे. नेमका हा मनसूबा अधीर रंजन चौधरींनी ओळखून त्या फुग्याला टाचणी लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आज अधीर रंजन चौधरी यांचा इशाऱ्यावर कदाचित कोणी काँग्रेस नेते बोलले नसतील पण त्यांना त्याचे गांभीर्य माहिती नसेल असे म्हणवत नाही. काँग्रेसची आजची संघटनात्मक अवस्था बिकट असली, तरी सगळे काँग्रेस नेते राजकारणात जुन्या लोणच्या सारखे मुरलेले आहेत.
त्यांना ममतांनी भाजपला तोंडी विरोध करून राजकीय कृतीतून प्रत्यक्षात काँग्रेसला निर्माण केलेले आव्हान नक्की समजते. प्रश्न फक्त हा आहे, की काँग्रेसचे नेते आणि हायकमांड या आव्हानावर तोडगा कसा काढणार? राहुल आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या राजकीय समजाच्या पातळीनुसार अशा प्रकारच्या आव्हानाला तोडगा काढला आहे. त्यांनी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणींसारखे तरूण नेते काँग्रेसमध्ये आणले आहेत.
राजकीय क्षेत्रातून किंवा पत्रकारितेतून कितीही टीका टिपण्या झाल्या तरी प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी आपापली राजकीय पोझीशन काँग्रेसमध्ये बळकट करून घेतली आहे आणि आगामी पाच राज्यांच्या निवडणूकीत आघाडीवर राहुन नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अन्य कोणाला मान्य असो अथवा नसो, प्रियांका गांधी गांभीर्याने आणि ठामपणे उत्तर प्रदेशात आपले नेतृत्व पुढे आणायचे प्रयत्न करताना दिसत आहेत. लखीमपूर सारख्या प्रकरणात त्यांनी राजकीय टायमिंग चांगले साधले आहे. भाजपशी पंगा घेताना त्यांनी प्रादेशिक पक्षांचे आव्हान देखील स्वीकारल्याचे त्यांच्या राजकीय कृतीतून दिसते आहे.
राहुल आणि प्रियांका यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला एका जरी राज्यात काही यश मिळाले तरी त्या दोघांच्या नेतृत्वासाठी आणि काँग्रेससाठी ती राजकीय संजीवनी ठरणार आहे. कदाचित उत्तर प्रदेशापेक्षा ती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहराज्य गुजरातमध्ये मिळण्याची शक्यता अधिक आहे. तोपर्यंत वाट पाहण्याची परिपक्वता राहुल आणि प्रियांका या दोघांनी दाखविली तर काँग्रेस संघटनेसाठी देखील ते उत्तम ठरेल आणि एकाच वेळी भाजपशी आणि प्रादेशिक नेत्यांशी लढण्याचे चंद्रबळ काँग्रेसला मिळेल. फक्त यासाठी थोड्या संयमाची आणि चिकाटीने टिकून राहण्याची गरज आहे. ती राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका गांधी या दाखविताना सध्यातरी दिसत आहेत.
अधीर रंजन चौधरींनी ममता बॅनर्जी यांच्या भाजप विरोधाची पोलखोल करून निदान काँग्रेसला खऱ्या अर्थाने लढायचेय नक्की कोणाशी, हे दाखवून द्यायला सुरूवात तरी केली आहे. येत्या ११ महिन्यांमध्ये वेळोवेळी त्याचे परिणाम दिसून येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App