तरूण तुर्कांचा धक्का; काँग्रेसचे तरूण नेते जितीन प्रसाद भाजपमध्ये दाखल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – काँग्रेसमध्ये जी – २३ वरिष्ठ नेते अस्वस्थ असतानाच त्या अस्वस्थतेची लाट तरूण आणि मध्यम वयाच्या नेत्यांपर्यंतही पोहोचली असून काँग्रेसचे राहुल गांधींच्या बरोबरीचे नेते जितीन प्रसाद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. जी – २३ नेत्यांपाठोपाठ काँग्रेसच्या तरूण तुर्कांनी पक्ष नेतृत्वाला दिलेला हा धक्का आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जातो. Congress leader Jitin Prasada joins BJP in the presence of Union Miniter Piyush Goyal, at the party headquarters.

जितीन प्रसाद हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. जितेंद्र प्रसाद यांचे चिरंजीव आहेत. जितेंद्र प्रसाद हे माजी पंतप्रधान कै. राजीव गांधींचे निकटवर्ती होते. त्यांच्या निधनानंतर त्यांनी काही काळ नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात देखील काम केले होते. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या सुरूवातीच्या कारकिर्दीत ते सोनियांच्या निकटवर्तीयांपैकी एक नेते मानले जात होते. पण नंतर त्यांनी सोनिया गांधी यांना आव्हान दिले होते. त्यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती.

जितीन प्रसाद हे जितेंद्र प्रसाद यांचा वारसा घेऊन काँग्रेसमध्ये काम करीत होते. २००८ ते २०१४ या काळात ते केंद्रीय मंत्री राहिले आहेत. उत्तर प्रदेशातील धौरहरा मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले होते. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यांच्या बरोबर जितीन प्रसाद यांच्याकडेही काँग्रेसचे तरूण नेतृत्व म्हणून पाहिले जात होते. यापैकी ज्योतिरादित्य शिंदे आधीच बाहेर पडले आहेत. सचिन पायलटांची राजकीय अस्वस्थता मध्यंतरी बाहेर आली होती. आता जितीन प्रसाद हे काँग्रेसच्या बाहेर पडले आहेत.

-मी राष्ट्रीय पक्षात प्रवेश केलाय – जितीन प्रसाद

प्रसाद घराण्याच्या तीन पिढ्यांनी काँग्रेसची सेवा केली आहे. पण गेल्या ८ – १० वर्षांमधला अनुभव आणि बऱ्याच दिवसांच्या विचारविनिमयानंतर मी काँग्रेस सोडण्याचा आणि भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला, असे जितीन प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या ८ – १० वर्षांमधला भारतीय राजकारणाचा पट पाहिला, तर आपल्या लक्षात येईल की फक्त भाजप हाच राष्ट्रीय पक्ष उरलाय. बाकीचे प्रादेशिक पक्ष राजकारणात आहेत. मला राष्ट्रीय राजकारणात काम करायचे असल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय उंचीचा नेता कोणत्याही पक्षात नाही, असा दावाही जितीन प्रसाद यांनी केला.

ज्या पक्षात राहुन लोकांचे हित जपता येत नाही, त्या पक्षात राहण्याला अर्थच उरत नाही. म्हणून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जितीन प्रसाद यांनी स्पष्ट केले. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी जितीन प्रसाद यांचे भाजपमध्ये स्वागत केले.

Congress leader Jitin Prasada joins BJP in the presence of Union Miniter Piyush Goyal, at the party headquarters.